मलिक असगर हाश्मी
नैराश्य (depression), चिंता (anxiety), किंवा व्यक्तिमत्व विकार (personality disorder) यांसारख्या शब्दांवर एकतर हसले जाते किंवा ते लज्जास्पद मानले जातात. भारतात लोक आजही मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उघडपणे चर्चा करण्यास संकोच करतात.
२९ वर्षीय फॅशन स्टायलिस्ट सहर हाश्मीने केवळ स्वतःच्या मानसिक आजारावर मात केली नाही, तर दिल्लीत शांतपणे हे दुःख सहन करणाऱ्या इतरांसाठीही ती आशेचा किरण बनली आहे.
एकेकाळी सहर हाश्मी क्लिनिकल डिप्रेशन आणि बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरशी झुंजत होती. उपचारांदरम्यान तिला खूप एकटे, असहाय्य आणि वेगळे पडल्यासारखे वाटत होते. तिच्या याच संघर्षाने तिला मानसिक आरोग्यावर काम करण्याची प्रेरणा दिली.
"मी संकल्प केला आहे की, कोणत्याही व्यक्तीला त्या एकटेपणातून जावे लागू नये. मला वाटले की माझ्या मानसिक समस्यांवर जर कुणी माझ्याशी उघडपणे चर्चा केली असती, तर कदाचित मी लवकर बरी झाले असते. त्यामुळे मी याविषयी आणखी सजग झाले."
एप्रिल २०२५ मध्ये सहरने "ब्रेकिंग स्टिग्मा: वन माईल ॲट अ टाइम" (Breaking Stigma: One Mile at a Time) ही मोहीम सुरू केली. तिने दिल्ली ते काश्मीर असा २,७७९ किमीचा बाईक प्रवास केला. हा प्रवास केवळ भौगोलिक सीमा ओलांडणारा नव्हता, तर मानसिक आरोग्यावरील कलंक आणि त्यावर समाजाच्या मौनाविरुद्ध केलेला तो एक भावनिक प्रवास होता.
२० एप्रिल रोजी सहर सामाजिक कार्यकर्ते देव देसाई यांच्यासोबत रॉयल एनफिल्ड बाईकवरून दिल्लीहून काश्मीरला निघाली. त्यानंतर, महाराष्ट्रातील गायिका आणि कार्यकर्ती नाझनीन शेख, मध्य प्रदेशातील चित्रपट निर्माता समान्यु शुक्ला आणि काश्मीरमधील वैद्यकीय पदवीधर मेहराजुद्दीन भट हे तिच्या प्रवासात सामील झाले.
समान्यु आणि मेहराज यांनी या मोहिमेचे चित्रीकरण केले. या माहितीपटाने सहरची कहाणी आणि तिचा संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोलाची मदत केली.
२० दिवसांच्या प्रवासात सहरने अनंतनाग, बारामुल्ला, चंदीगड, दिल्ली, जालंधर, जम्मू, कांगडा, कुपवाडा, लुधियाना, मुकेरियन, रोहतक, श्रीनगर, सोपोर आणि पट्टन या २१ शहरांमध्ये ३०हून अधिक संवादात्मक कार्यशाळा (interactive workshops) घेतल्या.
यात सहरने ३,५००हून अधिक तरुण, विद्यार्थी, गावकरी आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी तिने केवळ तिचे अनुभवच सांगितले नाहीत, तर सहभागींनाही बोलण्यास प्रोत्साहित केले.
या कार्यशाळा संवादाचे एक व्यासपीठ म्हणून तयार केल्या होत्या. तिथे सहरने तिची कहाणी सांगितली. यानंतर, सहभागींनाही त्यांच्या कथा सांगण्याचा विश्वास आणि प्रोत्साहन मिळाले. लोकांच्या मनातून मानसिक आजाराशी जोडलेली लाज काढून टाकण्याचा आणि 'मदत मागणे म्हणजे कमकुवतपणा नाही' हा विचार रुजवण्याचा उद्देश साध्य झाला.
सहरचा हा प्रवास अर्थातच सोपा नव्हता. त्यात अनेक आव्हाने होती. २० एप्रिल रोजी रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे महामार्ग बंद झाला. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि २ मे रोजी पुन्हा एकदा भूस्खलनामुळे महामार्ग बंद झाला.
मात्र या आव्हानांनी सहरच्या टीम नाउमेद झाली नाही. त्यांनीने राजौरी, शोपियान आणि पीर पंजाल खिंडीमार्गे आपला प्रवास पूर्ण केला.
विशेष म्हणजे या मोहिमेला सोशल मीडियावरही प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी सहरच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि तिच्या प्रवासाला एक चळवळ म्हटले. एका युजरने लिहिले, "तुमचे वैयक्तिक दुःख इतक्या उघडपणे मांडणे हे एक धाडसी कृत्य आहे." तर दुसऱ्या युजरने म्हटले, "प्रवासापूर्वीची सहर आणि नंतरची सहर यांच्यात स्पष्ट फरक दिसतो. तिने आशेचा नवे किरण पसरवले आहे."
सहरच्या मोहिमेची 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'नेही दखल घेतली. तिला ‘मानसिक आरोग्यावर सर्वाधिक सेमिनार आयोजित करण्याचा’ विक्रमी खिताब देण्यात आला. सीएसआयआर-निस्पर (CSIR-NIScPR) चे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा. सुरजित डबास यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, या कार्यशाळेत सहभागी झालेल्या ३,५०० लोकांपैकी सुमारे ४२.३० टक्के असे होते ज्यांच्या जवळची एखादी व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त होती.
सहर आणि देव यांचे असे उपक्रम कोविड काळापासून सुरू आहेत. महामारीच्या काळातही त्यांनी मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि थेरपिस्ट यांची ९० सदस्यांची एक टीम तयार केली होती. ही टीम मोफत ऑनलाइन समुपदेशन (counselling) देत होती. आज या नेटवर्कमध्ये १४० व्यावसायिक समुपदेशक जोडले गेले आहेत. या टीमने आतापर्यंत ३००हून अधिक गरजूंना मदत केली आहे.
आज सहर केवळ एक फॅशन स्टायलिस्ट आणि प्रेरक वक्ता नाही, तर ती मानसिक आरोग्याची प्रणेती बनली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्यावरील अभ्यासक्रम समाविष्ट केले जावेत आणि तरुणांना ‘मेंटल हेल्थ फर्स्ट एड’चे (Mental Health First Aid) प्रशिक्षण दिले जावे, अशी तिची इच्छा आहे. आपण मानसिक आरोग्याच्या समस्यांवर गप्प राहिलो तर ही शांतता समाजाला आतून हळूहळू पोखरून टाकेल, अशी भीती ती व्यक्त करते.
सहरचा प्रवास एक मोठा संदेश देतो: तुमचा हेतू चांगला आणि आशावाद दुर्दम्य असेल तर वैयक्तिक दुःखसुद्धा सामाजिक बदलाची मोठी ताकद बनू शकते. तिची ‘कलंक तोडना: एक मील एक बार’ ही केवळ एक मोहीम नव्हती, तर ती आतापर्यंत गप्प राहिलेल्या लाखो पीडितांचा हुंकार होती.
सहर, देव आणि टीमने हे सिद्ध केले आहे की, भारताच्या गावागावांत आणि शहरांमध्ये मानसिक आरोग्याविषयी बदलाची लाट आणणे शक्य आहे. गरज आहे फक्त शाश्वती देण्याची की ‘तुम्ही एकटे नाही आहात!’
(लेखक ‘आवाज द व्हॉइस हिंदी’चे संपादक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -