औंध आयटीआयमध्ये अल्पसंख्यांक तरुणांना मोफत प्रशिक्षण

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
  अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा घेता येणार लाभ
अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा घेता येणार लाभ

 

कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अल्पसंख्याक समाजातील युवक- युवतींसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे १३ मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे.


अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शिख, जैन, पारसी, ख्रिश्चन तसेच बौद्ध, नवबौद्ध, हिंदू-महार या घटकातील काही कारणास्तव पूर्णवेळ किंवा दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, असे बेरोजगार युवक, युवती किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. सुरुवातीला अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये फील्ड टेक्निशियन- एसी, सीएनसी सेटर कम ऑपरेटर टर्निंग, ड्राफ्ट्समन- मेकॅनिकल, क्यूसी इन्स्पेक्टर लेव्हल ४, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन लेव्हल ३, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शील्डेड मेटल आर्क वेल्डिंग वेल्डर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यापैकी फील्ड टेक्निशियन- एसी हा अभ्यासक्रम १३ मार्च २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे.


प्रवेश पात्रता

- वयोमर्यादा - १८ ते ४० वर्षे

- शिक्षण - इयत्ता आठवी ते दहावी उत्तीर्ण

- प्रवेश देताना युवतींना प्राधान्य


अभ्यासक्रमाबद्दल -

- प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३०

- अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने


प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे

- गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाइड सर्टिफिकेट, आधार कार्डची छायांकित प्रत, अल्पसंख्याक उमेदवारांसाठी अल्पसंख्याक असल्याचा पुरावा, दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक रमाकांत भावसार यांनी केले आहे.