स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लीम नेत्यांनी ‘वंदे मातरम्’ला कधीच मानले नाही धर्मविरोधी

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

साकिब सलीम

आजचे राजकीय वातावरण पाहता एका गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जाईल. ती गोष्ट म्हणजे १९२० च्या दशकात खुद्द मुस्लीम समाज 'वंदे मातरम' गात असे. त्या काळात तुर्कस्तानच्या खलिफाला वाचवण्यासाठी 'खिलाफत चळवळ' सुरू होती. या चळवळीच्या सभांची सुरुवातच मुळात 'वंदे मातरम'ने होत असे.

२४ जानेवारी १९२० चा एक सीआयडी रिपोर्ट पाहा. महात्मा गांधींच्या मेरठ भेटीचे वर्णन त्यात आहे. रिपोर्ट म्हणतो, "गांधीजी सकाळी साडे नऊ वाजता मोटारीने मेरठला पोहोचले. देवनागरी शाळेत जमलेल्या प्रचंड जमावाने त्यांचे जोरदार स्वागत केले. स्वयंसेवकांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी केली होती. या तुकड्या इजिप्त, अरबस्थान आणि तुर्कस्तानचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्या तरुणांनी त्या-त्या देशाचे कपडे घातले होते. प्रत्येकाच्या कपड्यावर चंद्रकोर होती. 'गांधी की फौज' नावाची स्वयंसेवकांची एक विशेष तुकडी तिथे होती. एक गोष्ट विशेष नमूद करण्यासारखी आहे. ती म्हणजे तेथील सर्व मुस्लीम स्वयंसेवकांनी कपाळावर चंदन लावले होते. दुसरीकडे पंडित घासी राम (एम. ए.) यांनी इंग्रजीतून मानपत्र वाचले. मोहम्मद अस्लम सैफी यांनी उर्दूमध्ये मानपत्र वाचले. दोन कविताही सादर झाल्या. चार बंगाली तरुणांनी 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत गायले."

ही सभा खिलाफत चळवळीचा भाग होती आणि तिथे बहुसंख्य उपस्थिती मुस्लिमांची होती. ही काही एकच घटना नव्हती.

२२ एप्रिल १९२० च्या आणखी एका सीआयडी रिपोर्टमध्ये शौकत अलींच्या सभेचा उल्लेख आहे. रिपोर्ट सांगतो, "१४ एप्रिलला मौलाना शौकत अली आणि त्यांच्या दोन सिंधच्या समर्थकांनी सोलापूरच्या ईदगाह मैदानात सभा घेतली. ही सभा स्थानिक खिलाफत समितीने आयोजित केली होती. अनेक धार्मिक गाणी आणि 'वंदे मातरम' झाल्यानंतर विजापूरच्या एका खाटीक समाजातल्या व्यक्तीने इंग्रजीतून मानपत्र वाचले. त्यानंतर अब्दुल हक अब्दुल रजाक (अध्यक्ष, सोलापूर खिलाफत कमिटी) यांनी त्याचे उर्दू भाषांतर केले. जे. एम. सामंत या वकिलांनी त्याचे मराठीत भाषांतर केले. शौकत अली आणि त्यांचे भाऊ मोहम्मद अली यांनी भारतातील मुस्लिमांच्या राजकीय जीवनाला नवसंजीवनी दिली आहे, असा त्या मानपत्राचा सारांश होता."

खिलाफत चळवळीच्या काळात शौकत अलींनी तर महात्मा गांधींना एक सूचना केली होती. ते म्हणाले होते, "फक्त तीनच घोषणांना मान्यता असावी. पहिली 'अल्लाहू अकबर', जी हिंदू आणि मुस्लीम दोघांनी आनंदाने द्यावी. यातून ईश्वर एकच आणि महान आहे हे दिसेल. दुसरी घोषणा 'वंदे मातरम' किंवा 'भारत माता की जय' असावी. तिसरी घोषणा 'हिंदू-मुसलमान की जय' असावी. याशिवाय भारताचा विजय अशक्य आहे आणि ईश्वराची महतीही दिसणार नाही."

अनेकदा असा युक्तिवाद केला जातो की भारतीय मुस्लिमांना सुरुवातीपासूनच 'वंदे मातरम'बद्दल अडचण होती. पण हे सीआयडी रिपोर्ट वेगळेच सांगतात. ज्या खिलाफत चळवळीत मुस्लिमांचा दबदबा होता, तिथे हे गाणे गायले जात होते. खुद्द अली बंधू त्या घोषणा देत होते.

काही अभ्यासकांनी असे लिहिले आहे की १९२३ च्या काकिनाडा काँग्रेस अधिवेशनात मौलाना मोहम्मद अली यांनी या गाण्याला हिंदू गाणे म्हणून विरोध केला होता. पण हे खरे आहे का?

मोहम्मद अली या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यसैनिक असफ अली यांनी या घटनेबद्दल लिहिले आहे. ते म्हणतात, "प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर अधिवेशनाला उपस्थित होते. त्यांना 'वंदे मातरम' गाण्यासाठी आमंत्रित केले गेले. अध्यक्षस्थानावरून मोहम्मद अली यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या धर्मात संगीत वर्ज्य (Haram) आहे, हे त्यांनी कारण दिले. उपस्थित नेते गोंधळून गेले. विष्णू दिगंबर संतापले आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, 'हे राष्ट्रीय व्यासपीठ आहे, ही काही मशीद नाही की जिथे संगीताला आक्षेप घेतला जाईल. अध्यक्षांच्या मिरवणुकीत वाजतगाजत स्वागत चालते, मग इथेच आक्षेप का?' अध्यक्षांना गप्प करून त्यांनी वंदे मातरम पूर्ण गायले."

मोहम्मद अलींचा आक्षेप 'वंदे मातरम' या गीताला नव्हता, तर संगीताला होता. त्यांच्या मते इस्लाममध्ये संगीताला मनाई आहे. पलुस्करांनी त्यांना समजावल्यावर ते शांत राहिले. जेव्हा गाणे गायले गेले, तेव्हा ते इतर नेत्यांसोबत उभेही राहिले.

विशेष म्हणजे, पुढच्याच वर्षी बेळगाव काँग्रेस अधिवेशनात मोहम्मद अली त्यांची पत्नी अमजदी बेगम आणि भाऊ शौकत अली यांच्यासह उपस्थित होते. तिथे गंगूबाई हनगळ यांनी 'वंदे मातरम' गाऊन झाल्यावर कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासह शेकडो मुस्लीम तिथे हजर होते.

मग हा वाद कधी निर्माण झाला? १९३५ मध्ये 'हिंदुस्तान टाईम्स'ने सरकारचे एक सर्क्युलर फोडले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' गाण्यावर पाळत ठेवण्याचे आदेश त्यात होते. लोकांचा रोष पाहून ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली. जुन्या सरकारी फाईल्स बघितल्या की सत्य समजते. आनंदमठ कादंबरीत हे गाणे आहे आणि त्यात मुस्लीम विरोधी सूर आहे, असा समज मुस्लिमांमध्ये पसरवण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली होती. खुद्द ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मत होते की गाण्यात आक्षेपार्ह काहीच नाही, पण मुस्लिमांना हे हिंदूंचे भजन आहे असे सांगायला हवे.

अनेक प्रांतांमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली. त्यानंतर १७ ऑगस्ट १९३७ रोजी व्हाईसरायने बॉम्बेच्या गव्हर्नरला एक पत्र लिहिले. त्यात तो चिंतेने म्हणतो, "वंदे मातरमवरील आक्षेपाचा मूळ आधार त्याचा जहालवादाशी असलेला जुना संबंध आहे. आता तो मुद्दा तितका महत्त्वाचा उरलेला नाही. पण आता काँग्रेसच्या दोन-तीन प्रांतांच्या असेंब्लीमध्ये हे गाणे गायले जाते. युरोपियन गटासह संपूर्ण सभागृह गाण्याच्या वेळी उभे राहते, असे मला समजले आहे. माझे स्पष्ट मत आहे की, या गाण्यावरून आपण मोठे राजकीय भांडण उभे करू नये. तसे केले तर आपण डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या हातात आयते कोलीत दिल्यासारखे होईल. ज्या गोष्टीला फारसे महत्त्व नाही, त्यावरुन गोंधळ नको. पण या गाण्याला 'राष्ट्रगीत' म्हणून मान्यता देण्यास माझा सक्त विरोध आहे. आपण याला फक्त एक देशभक्तीपर गीत मानावे. गाणे सुरू असताना उभे राहणे हे केवळ सौजन्य म्हणून करावे."

या संकटात ब्रिटिशांच्या मदतीला कोण धावून आले? अर्थातच मुस्लीम लीग आणि मोहम्मद अली जिना! त्यांनी 'वंदे मातरम'चा मुद्दा उचलून धरला. व्हाईसराय लिनलिसगोने २७ ऑक्टोबर १९३७ ला सेक्रेटरी झेटलँडला पत्र लिहिले. तो म्हणतो, "तुम्ही रिपोर्ट्समध्ये वाचले असेलच. 'वंदे मातरम'ला राष्ट्रगीत बनवण्याविरोधात मुस्लिमांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या मुस्लीम लीगच्या परिषदेत तसे ठरावही झाले आहेत. हे आपल्या दृष्टीने खूप चांगले आहे. हा विरोध सरकारकडून येण्यापेक्षा स्वतंत्र गटाकडून आलेला कधीही चांगला. इतिहासाचा संदर्भ देऊन मुस्लीम आता या गाण्याचे महत्त्व ओळखू लागले आहेत, याचा मला आनंद आहे. काँग्रेसच्या ध्वजाबद्दलही लवकरच असाच विरोध होईल, अशी मला आशा आहे."

येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. २८ ऑक्टोबर १९३७ ला काँग्रेस वर्किंग कमिटीने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, 'वंदे मातरम'ला क्रांतिकारक राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात एका मुस्लिमाचाच मोठा वाटा होता. त्या निवेदनात म्हटले होते, "एप्रिल १९०६ मध्ये बारीसाल येथे बंगाल प्रांतीय परिषद झाली होती. अध्यक्षस्थानी श्री. ए. रसूल होते. त्यावेळी प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. त्यांनी लावलेले 'वंदे मातरम'चे बॅच बळजबरीने ओरबाडून काढले. काही प्रतिनिधींना तर इतके मारले की ते बेशुद्ध पडले, तरीही त्यांच्या तोंडून 'वंदे मातरम'चा जयघोष थांबला नाही. गेल्या तीस वर्षांत देशभरात असे असंख्य प्रसंग घडले. 'वंदे मातरम' म्हणत अनेक स्त्री-पुरुषांनी मृत्यूला कवटाळले. बंगालमध्ये आणि भारतात हे गीत ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधातील संघर्षाचे प्रतीक बनले."

मौलाना अबुल कलाम आझाद यांचा समावेश असलेली काँग्रेस समिती स्थापन झाली. त्यांनी स्पष्ट केले की गाण्याच्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये मुस्लीम विरोधी किंवा हिंदू समर्थक असे काहीही नाही. फक्त पहिली दोन कडवीच का? समितीने म्हटले, "हळूहळू पहिल्या दोन कडव्यांचा वापर इतर प्रांतांमध्ये पसरला. त्यांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. उरलेले गाणे क्वचितच वापरले जायचे आणि आजही ते फार थोड्या लोकांना माहित आहे. पहिल्या दोन कडव्यांमध्ये मातृभूमीचे सौंदर्य आणि तिने दिलेल्या वरदानांचे वर्णन आहे. धार्मिक किंवा इतर कोणत्याही दृष्टीकोनातून आक्षेप घेण्यासारखे यात काहीही नाही."

३० ऑक्टोबर १९३७ ला जवाहरलाल नेहरू म्हणाले, "आम्ही हे निदर्शनास आणून दिले आहे की गाण्याचा भाग, म्हणजे पहिली दोन कडवी अशी आहेत की त्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. ज्यांच्या मनात आधीच द्वेष आहे, त्यांचा प्रश्न वेगळा."

१९ ऑक्टोबर १९३७ ला रफी अहमद किडवाई यांनी म्हटले, "मिस्टर जिना 'वंदे मातरम'ला इस्लाम विरोधी गाणे म्हणतात. पण जिना अनेक वर्षे काँग्रेसचे आणि 'ऑल इंडिया काँग्रेस कमिटी'चे निष्ठावान सदस्य होते. दरवर्षी काँग्रेस अधिवेशनाची सुरुवात याच गाण्याने व्हायची. दरवर्षी ते मंचावर एका भक्तासारखे हे गाणे ऐकताना दिसायचे. त्यांनी कधी निषेध केला का? जिनांनी काँग्रेस सोडली ती 'वंदे मातरम'मुळे नाही, तर नागपूर काँग्रेसमध्ये ध्येयधोरणात जो बदल झाला, त्याला त्यांचा विरोध होता म्हणून. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी पूर्ण स्वराज्य हे ध्येय त्यांना मान्य नव्हते."

इतिहासाची पाने चाळली तर दिसते की 'वंदे मातरम'वरून वाद १९३५ नंतरच सुरू झाला. कोणताही कायदा न करता या गाण्याची लोकप्रियता आजमावण्याचा तो ब्रिटिश सरकारचा प्रयत्न होता.

मुस्लीम लीगने लोकांना भडकवले आणि हे गाणे इस्लाम विरोधी असल्याचा प्रचार केला. हकीम अजमल खान, एम. ए. अन्सारी, मौलाना अबुल कलाम आझाद, अली बंधू, अमजदी बेगम, बी अम्मा, हसरत मोहानी, सैफुद्दीन किचलू हे सर्वजण काँग्रेस अधिवेशनांना हजर असायचे. तिथे 'वंदे मातरम' गायले जायचे. तरीही ते काही कमी मुसलमान झाले नाहीत.

(लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)