मुंबई हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानीच; अजूनही फिरताहेत मोकाट : जावेद अख्तर

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
javed aktar
javed aktar

 

'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं...' शहेंशाह सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला हा संवाद लिहिला होता जावेद अख्तर यांनी. खऱ्या आयुष्यातही जावेद साहेबांचा अॅट्टिट्युडही असाच आहे, याची प्रचिती वारंवार येते. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यासाठी बरेचदा त्यांना टीकेला आणि रोषाला सामोरे जावे लागते. पण विवेकवादी दृष्टीकोन असणारे जावेद साहेब त्याची तमा बाळगत नाहीत. 
 
फैझ अहमद फैझ यांच्या स्मरणार्थ पाकिस्तानच्या लोहार येथे 'फैझ फेस्टिव्हल 2023' चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांना आमंत्रित करण्यात आले. जावेद अख्तर यांनीही आमंत्रण स्वीकारले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या तीन दिवसीय फेस्टिव्हलनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तानमधील साहित्य, कला आणि इतर क्षेत्रांतील गणमान्यांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली. 
 
जावेद अख्तर यांच्यासाठी तिथे मेहफिलीचे आयोजनही करण्यात आले. अनेक पाकिस्तानी गायक - गायिका, शायर आदींनी जावेद साहेबांसमोर आपली कला सादर केली. जावेद साहेबही केवळ दाद देऊन थांबले नाहीत, तर ते त्यात सहभागी झाले आणि कलाकारांसोबत त्यांनी गाणी आणि कविता म्हटल्या. 
 
लाहोरमध्ये सुरू असलेल्या फैझ फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी जावेद अख्तर यांचा 'खिताब'चे म्हणजे भाषणाचे अयोजन करण्यात आले.  बऱ्याच काळानंतर भारतातील कुणी मोठा कलाकार पाकिस्तानमध्ये आल्यामुळे प्रेक्षकांची संख्याही लक्षणीय होती. सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आपल्या 'बेबाकी'साठी म्हणजे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे जावेद अख्तर इथेही त्याच बेबाकीने बोलले. पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. ऐकणारे बहुसंख्य पाकिस्तानी असूनही त्यांनी जावेद साहेबांच्या वक्त्याव्यांवर टाळ्यांचा गजर करत दाद दिली.  
 
तर घडले असे... 
 
पाकिस्तानामधील लाहोर येथे आयोजित फैझ फेस्टिवलमध्ये आयोजित  संवादादरम्यान जावेद अख्तर उपस्थित पाकिस्तानी मान्यवरांना उद्देशुन म्हणतात, 'आम्ही (भारताने) नुसरत फतेह अली खान, मेहदी हसन यांच्यासारख्या पाकिस्तानी कलावंतांच्या कितीतरी कार्यक्रमांचे सन्मानपूर्वक आयोजन केले. तुमचा देश मात्र लता मंगेशकरांचा एकही कार्यक्रम आयोजित करू शकला नाही. दोन्ही देशांमध्ये सध्या वाहणारे असंतोषाचे वादळ निश्चितच शमले पाहिजे, पण एक बाब मी नोंदवू इच्छितो. आम्ही मुबंईचे रहिवासी आहोत, आम्ही पाहिलंय आमच्या शहरावर किती भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार काही नॉर्वेवरून किंवा इजिप्तवरून आलेले नव्हते. ते तुमच्याच देशातले होते, आणि ते अजूनही इथे मोकळेपणाने फिरत आहेत. भारतीयांमध्ये याविषयी नाराजी आणि राग असेल तर तुमची त्याविषयी तक्रार असता कामा नये." 
 
या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मिडियावर, विशेषतः ट्विटरवर व्हायरल होऊ लागला असून, भारतात जावेद अख्तरांच्या कृतीचे कौतुक होताना दिसत आहे.