बिहार निवडणूक निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये NDA बहुमतापार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (शुक्रवार, १४ नोव्हेंबर) आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमधील कल हाती येत असून, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) बहुमताचा आकडा (१२२) आरामात पार केल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कलानुसार, एनडीए सुमारे १३० ते १५० जागांवर आघाडीवर आहे, तर विरोधी 'महागठबंधन' (MGB) पिछाडीवर पडले आहे.

महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे राघोपूर मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत आघाडीवर आहेत. मात्र, राजदचे उमेदवार आणि भोजपुरी गायक खेसारी लाल यादव हे छपरा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत, तर भाजपच्या उमेदवार आणि गायिका मैथिली ठाकूर या अलीनगरमधून आघाडीवर आहेत.

कालच आयोगाने केला होता 'विक्रमी' मतदानाचा दावा

विशेष म्हणजे, मतमोजणीच्या एक दिवस आधी, गुरुवारी (१३ नोव्हेंबर) भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमध्ये अत्यंत यशस्वीपणे निवडणूक प्रक्रिया राबवल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली होती.

आयोगाने काल जारी केलेल्या पत्रकात म्हटले होते की, बिहारमध्ये ६७.१३ टक्के मतदान झाले, जे १९५१ नंतरचे सर्वोच्च मतदान आहे.

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण राज्यात एकाही मतदान केंद्रावर 'शून्य फेरमतदान' (Zero Repolls) झाले. राज्यातील २,६१६ उमेदवार किंवा १२ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांपैकी कोणीही फेरमतदानाची मागणी केली नाही. तसेच, अंतिम मतदार यादीबाबत (ज्यात ७,४५,२६,८५८ मतदार होते) एकाही पक्षाने किंवा जिल्ह्यातून कोणतीही तक्रार (Zero Appeals) दाखल केली नाही, असा दावा आयोगाने केला होता.

अशी सुरू आहे मतमोजणी प्रक्रिया

आज सकाळी ८ वाजता प्रथम टपाली मतपत्रिकांची (Postal Ballots) मोजणी सुरू झाली. त्यानंतर साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएम (EVM) मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपूर्वी टपाली मतमोजणी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

  • मतमोजणी केंद्रे: सर्व २४३ मतदारसंघांमध्ये.

  • कर्मचारी: २४३ रिटर्निंग ऑफिसर्स (ROs) आणि २४३ मतमोजणी निरीक्षक.

  • टेबल्स: मतमोजणीसाठी एकूण ४,३७२ टेबल्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहायक आणि एक मायक्रो-ऑब्झर्व्हर तैनात आहे.

  • एजंट: उमेदवारांनी नियुक्त केलेले १८,००० हून अधिक एजंट या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

VVPAT पडताळणी कशी होणार?

ईव्हीएममधील मते मोजताना, कंट्रोल युनिटमधील मते आणि 'फॉर्म 17C' मधील नोंदी यांची पडताळणी (cross-verify) केली जात आहे. यात कोणताही फरक आढळल्यास, त्या मतदान केंद्रावरील VVPAT स्लिप्सची मोजणी अनिवार्यपणे केली जाईल.

संपूर्ण मतमोजणी संपल्यानंतर, प्रत्येक मतदारसंघातील ५ मतदान केंद्रे यादृच्छिकपणे (randomly) निवडून, तेथील VVPAT स्लिप्स आणि ईव्हीएममधील मते जुळवून पाहिली जातील.

अधिकृत निकालासाठी येथे लक्ष ठेवा

मतमोजणीच्या फेऱ्यांनुसार आणि मतदारसंघनिहाय निकाल संबंधित रिटर्निंग ऑफिसरकडून निवडणूक आयोगाच्या अधिकृत रिझल्ट पोर्टलवर उपलब्ध केले जात आहेत.

आयोगाने नागरिकांना आणि माध्यमांना केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवरील माहितीवर विश्वास ठेवण्याचे आणि कोणत्याही अफवा किंवा अनधिकृत स्त्रोतांवर अवलंबून न राहण्याचे आवाहन केले आहे.