दहशतवादाच्या नेटवर्कवर घाव; काश्मीरमध्ये २५ संशयित ताब्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) 'काउंटर-इंटेलिजन्स काश्मीर' (CIK) ने गुरुवारी संपूर्ण काश्मीर खोऱ्यात एकाच वेळी १६ ठिकाणी छापे टाकले. या मोठ्या कारवाईत सुमारे २५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, २० हून अधिक डिजिटल उपकरणे (मोबाईल फोन, लॅपटॉप आणि स्टोरेज ड्राईव्ह) जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही छापेमारी या आठवड्यात 'राज्य तपास संस्था' (SIA) आणि 'सीआयके-सीआयडी'कडे नोंदवलेल्या दोन प्रकरणांशी संबंधित आहे.

नुकत्याच झालेल्या दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील कार स्फोटाचा (ज्यात १३ ठार आणि २० जखमी झाले) सुरू असलेला तपास, अनेक जिल्ह्यांमध्ये दहशतवादी प्रचाराचे पोस्टर लावणे आणि "डॉक्टर टेरर मॉड्यूल" शी संबंधित फरिदाबाद येथील स्फोटक प्रकरणाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

बुधवारी दोन नवीन एफआयआर नोंदवल्यानंतर अनंतनाग, कुलगाम, शोपियान, बारामुल्ला आणि श्रीनगर या जिल्ह्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या संशयितांची "सतत चौकशी" सुरू आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे (terror financing), लॉजिस्टिक सपोर्ट पुरवणे आणि ऑनलाईन प्रचार करणे यामध्ये त्यांची संभाव्य भूमिका तपासली जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सीआयकेने नोंदवलेला नवीन एफआयआर प्रामुख्याने श्रीनगरमधील नौगाम आणि बडगाम जिल्ह्यातील मागाम येथे एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेने लावलेल्या धमकीच्या पोस्टरवर केंद्रित आहे.

'स्लीपर सेल' (sleeper cells) पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि सोशल मीडिया व रस्त्यावरील मेसेजिंगद्वारे लोकांमध्ये भीती पसरवण्यासाठी हा प्रचार एका नियोजित कटाचा भाग होता, असा तपास संस्थांना संशय आहे.

पोलीस सूत्रांच्या मते, गुरुवारची ही कारवाई अलिकडच्या काही महिन्यांतील सीआयकेची सर्वात मोठी आणि सुनियोजित कारवाई होती. या कारवाईत सीआयके पथकांना पोलीस आणि सीआरपीएफनेही मदत केली. ताब्यात घेतलेल्यांमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या सहानुभूतीदारांचा (sympathisers) समावेश असल्याचे समजते.

"दहशतवाद्यांचे प्रत्यक्ष (physical) आणि डिजिटल नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. "तपासात असे दिसून आले आहे की, प्रचार, भरती आणि लॉजिस्टिकचे काम आता मोठ्या प्रमाणावर एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन केले जात आहे."

जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांचे विश्लेषण सुरू असून, पुढील काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.