दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने केवळ राजधानीची शांतताच भंग केली नाही, तर शेकडो किलोमीटर दूर असलेल्या अनेक घरांमधील आनंदही कायमचा हिरावून घेतला आहे. या कुटुंबांना त्यांच्या प्रियजनांच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन होत नाहीये.
श्रावस्ती आणि देवरियाच्या शांत गल्ल्यांपासून ते मेरठ, अमरोहा आणि शामलीच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत, या भयंकर कार स्फोटातील बळी सामान्य लोक होते. यात टॅक्सी आणि ई-रिक्षा चालक, सौंदर्यप्रसाधनांचे दुकानदार, डीटीसी बस कंडक्टर अशा लोकांचा समावेश होता. हे सर्व जण आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी आणि चांगल्या आयुष्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत होते.
या बळींमध्ये श्रावस्ती जिल्ह्यातील गणेशपूर गावचा ३२ वर्षीय दिनेश मिश्रा याचाही समावेश आहे. तो दिल्लीच्या चावडी बाजार येथील एका छापखान्यातकाम करून आपल्या पत्नी आणि तीन मुलांचा सांभाळ करत होता.
त्याचे वडील, भुरे मिश्रा, दिनेश दिवाळीत घरी आला होता, त्या आठवणी सांगतात. "तो खूप मेहनती माणूस होता. त्याला आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते. तो आता आमच्यात नाही, यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही," असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला. आजूबाजूचे शेजारी कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी जमले होते. जिल्हाधिकारी अश्विनी पांडे यांनी सांगितले की, दिनेशचा मृतदेह श्रावस्तीला परत आणला जात आहे आणि तो मंगळवार संध्याकाळपर्यंत पोहोचेल. "आम्ही कुटुंबाशी बोललो आहोत आणि त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे," असे त्यांनी पीटीआयला सांगितले.
मेरठमध्ये, एका कुटुंबावर दुःखासोबतच आणखी एका वेदनादायक वादामुळे संकट कोसळले. मोहसीन (३२), जो ई-रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दिल्लीला गेला होता, त्याचा प्रवाशांना घेऊन जात असताना स्फोटात मृत्यू झाला.
जेव्हा त्याचा मृतदेह लोहिया नगर येथील त्याच्या गावी पोहोचला, तेव्हा त्याची पत्नी सुलताना आणि त्याचे आई-वडील यांच्यात त्याच्या दफनविधीवरून भावनिक वाद झाला. सुलतानाची इच्छा होती की, त्याचे दफन दिल्लीत व्हावे, जिथे ते स्थायिक झाले होते आणि त्यांची मुले शिकत होती. तर, त्याच्या आई-वडिलांचा हट्ट होता की, त्याला मेरठमध्येच दफन करावे.
दोन्ही बाजू अश्रू ढाळत असताना शेजारी आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. "स्फोटाने मोहसीनला हिरावून नेले, पण आता कुटुंबही विभागले गेले," असे एका शेजाऱ्याने सांगितले. अनेक तासांच्या तणावानंतर आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर, सुलताना अखेर मृतदेह दफनविधीसाठी घेऊन गेली.
शामली येथील अठरा वर्षीय नौमान अन्सारी हा त्याच्या दुकानासाठी सौंदर्यप्रसाधने (कॉस्मेटिक्स) खरेदी करण्यासाठी दिल्लीला गेला होता, तेव्हा या स्फोटाने त्याचे आयुष्य संपवले. "नौमानचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ अमन जखमी झाला असून, त्याच्यावर दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत," असे त्याचे काका फुरकान यांनी पीटीआयला सांगितले.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ काम करणारा नातेवाईक सोनू म्हणाला, "आज सकाळी मला माझ्या काकांचा फोन आला की नौमान आता नाही, आणि त्यांनी मला एलएनजेपी हॉस्पिटलला पोहोचायला सांगितले."
अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर येथील डीटीसी कंडक्टर अशोक कुमार (३४), दिल्लीतील नोकरीतून आपल्या कुटुंबाचा आणि आई-वडिलांचा सांभाळ करत होता. त्याच्या पश्चात पत्नी सोनम, आठ आणि पाच वर्षांच्या मुली आरोही आणि काव्या, आणि तीन वर्षांचा मुलगा आरव असा परिवार आहे. "अशोक हाच कुटुंबाचा एकमेव कमावता होता," असे पंचायत सदस्य पिंटू भाटी यांनी सांगितले.
हसनपूर येथील खत विक्रेते लोकेश कुमार अग्रवाल (५८) यांचाही या घटनेत मृत्यू झाला. ते दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल असलेल्या एका नातेवाईकाला पाहण्यासाठी गेले होते. "लोकेश एक दयाळू माणूस होता, जो प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असे," असे त्यांचे शेजारी यशपाल सिंग म्हणाले.
देवरिया येथील २२ वर्षीय शिवा जयस्वाल, जो भालुआनी शहरात एक छोटे रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवत होता, तो या स्फोटात जखमी झाला. सणांसाठी नवीन माल खरेदी करण्यासाठी तो दिल्लीला गेला असताना स्फोटात सापडला.
त्याची बहीण, पौर्णिमा जयस्वालने पीटीआयला सांगितले की, शिवाचा त्या दिवशी आधी फोन आला होता. त्याने सांगितले की, खरेदी झाली आहे आणि घरी परतण्यापूर्वी तो त्यांच्या मावशीला भेटायला जाईल. "मग आम्ही टीव्हीवर स्फोटाबद्दल ऐकले आणि त्याचा फोन लागेनासा झाला. नंतर आम्हाला कळले की त्याला एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले आहे," ती म्हणाली.
शिवाची आई, माया जयस्वाल, ज्या भाजप महिला मोर्चाच्या स्थानिक कार्यकर्त्या आहेत, म्हणाल्या की, त्यांचा मुलगा जिवंत आहे याचा त्यांना दिलासा आहे, पण हे संकट इतक्या जवळून गेल्याने त्या हादरल्या आहेत. "तो यावेळी नशीबवान ठरला," त्या हळू आवाजात म्हणाल्या.
या घटनेतील आणखी एक मृत, २२ वर्षीय पंकज साहनी, बिहारमधील आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी राजधानीत टॅक्सी चालवत होता.
त्याच्या काकांनी, रामदेव साहनी यांनी सांगितले की, त्यांना दिल्लीतील कोतवाली पोलीस स्टेशनमधून फोन आला आणि त्याच्या मृत्यूची बातमी समजली. "तो तीन वर्षांपासून टॅक्सी चालवत होता. आम्हाला सांगण्यात आले की, त्याच्या डोक्याचा मागील भाग पूर्णपणे उडाला होता. वॅगनआर कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती," असे साहनी यांनी शवगृहाबाहेर वाट पाहत असताना सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या मते, या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास आता 'राष्ट्रीय तपास संस्था' दहशतवादी हल्ला असल्याच्या शक्यतेने करत आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह त्याच्या शेजारील राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -