गोवा अग्निकांडातील मुख्य आरोपी फरार

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 4 h ago
सौरभ लुथरा
सौरभ लुथरा

 

पणजी / नवी दिल्ली

गोव्यातील अर्पोरा येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असतानाच आता एक संतापजनक माहिती समोर आली आहे. क्लबमध्ये मृत्यूचे तांडव सुरू असतानाच क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांनी तिथून पळ काढला आणि थेट थायलंडला पलायन केले.

गोवा पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमार यांनी सोमवारी हा धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर अवघ्या ३ तासांत लुथरा बंधू दिल्ली विमानतळावर पोहोचले. तिथून रविवारी पहाटे ५.३० वाजता इंडिगोच्या विमानाने ते थायलंडमधील फुकेतला पळून गेले. "पोलीस तपासापासून वाचण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले आहे," असे डीजीपींनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर दिखावा

विशेष म्हणजे, एकीकडे पोलीस तपासाला घाबरून देश सोडून पळून गेल्यानंतर सौरभ लुथरा याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने ‘अतीव दुःख’ व्यक्त केले.

सौरभने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आम्ही मृतांच्या कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या कठीण काळात त्यांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे वचन व्यवस्थापन देत आहे." एका बाजूला जबाबदारी सोडून पळून जायचे आणि दुसरीकडे सोशल मीडियावर सहवेदना दाखवायची, हा प्रकार संतापजनक ठरत आहे.

इंटरपोलची मदत घेणार

गोवा पोलिसांच्या विनंतीवरून 'ब्युरो ऑफ इमिग्रेशन'ने सौरभ आणि गौरव लुथरा यांच्याविरुद्ध 'लूक आऊट नोटीस' जारी केली आहे. डीजीपी कुमार यांनी सांगितले की, या दोघांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस आता इंटरपोलशी समन्वय साधणार आहेत.

गोवा पोलिसांचे एक पथक अटक वॉरंट घेऊन रविवारीच दिल्लीला पोहोचले होते. त्यांनी लुथरा बंधूंच्या घरी आणि ऑफिसवर छापे टाकले, पण तिथे कोणीच सापडले नाही. तसेच अजय गुप्ता नावाच्या आणखी एका भागीदाराचा पोलीस दिल्लीत शोध घेत आहेत.

कर्मचाऱ्यांना अटक

क्लबचे कामकाज पाहणाऱ्या भरत कोहलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला गोव्यात आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवला आहे. तसेच रविवारी अटक करण्यात आलेले जनरल मॅनेजर राजीव मोडक, गेट मॅनेजर प्रियंशु ठाकूर, बार मॅनेजर राजवीर सिंघानिया आणि जनरल मॅनेजर विवेक सिंग या चार कर्मचाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तीन अधिकाऱ्यांचीही अंजुना पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.

कशी लागली आग?

शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास जेव्हा ही घटना घडली, तेव्हा क्लबमध्ये १५० हून अधिक पर्यटक उपस्थित होते. गोवा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासानुसार, एका इव्हेंट दरम्यान फोडण्यात आलेले 'इलेक्ट्रिक फटाके' क्लबच्या लाकडी छताला लागल्याने ही आग भडकली.

या दुर्घटनेतील २५ मृतांपैकी २० जणांचे शवविच्छेदन गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण झाले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.