"केंद्रातील भाजप सरकारने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार अमलात आणले असते तर जम्मू- काश्मीर सध्या ज्या स्थितीत आहे, ती परिस्थिती नसली असती." असे मत मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले.
गेल्या दहा वर्षांत निधन झालेल्या ५७ लोकप्रतिनिधींना विधानसभेत आज आदरांजली वाहण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने पाच ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि लडाख आणि जम्मू आणि काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचे तुकडे झाले, हा संदर्भ देत काश्मीरमधील सुधारणेसाठी वाजपेयी यांनी यांनी केलेल्या कार्याचे स्मरण अब्दुल्ला यांनी केले. ते म्हणाले, "वाजपेयी हे ते महान द्रष्टे होते. त्यांचे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. लाहोर बस सुरू करून ते १९९९ मध्ये मिनार- ए-पाकिस्तानला गेले होते. असे पाऊल उचलणे सोपे नव्हते. पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाही हे ते वारंवार सांगत असत. वाजपेयी यांची 'झमुरियत, कश्मीरियत आणि इन्सानियत'ची घोषणा त्यांचा दूरदृष्टी दर्शविणारा होता. अशी घोषणा देणारे ते कदाचित पहिले आणि शेवटचे नेते होते."
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी नेहमीच प्रयत्न केले, असे सांगत अब्दुल्ला म्हणाले, की जम्मू-काश्मीरच्या नागरिकांशी त्यांनी वैयक्तिक पातळीवर संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने वाजपेयी यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांचे धोरण मध्येच सोडण्यात आहे व माणसे जोडण्याऐवजी त्यांच्यांत दुरावा निर्माण केला जात आहे, अशी टीका अब्दुल्ला यांनी सध्याच्या भाजपवर केली.
देवेंद्रसिंह राणा यांना श्रद्धांजली
उमर अब्दुल्ला यांनी त्यांचे माजी सल्लागार देवेंद्रसिंह राणा यांना श्रद्धांजली वाहिली. "माझ्या मित्राच्या आरोग्याबद्दल मला कल्पना नव्हती. आयुष्यातील महत्त्वयाचा काळ आम्ही एकत्र चालविला असून ते माझे चांगले मित्र होते. देवेंद्र यांच्या निधनाने मला सर्वाधिक दुःख झाले." असे ते म्हणाले.
उमर अब्दुल्लांची मुले सभागृहात
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची दोन्ही मुले झहीर आणि झमीर ही आज प्रथमच विधानसभेत उपस्थित होती. त्यांच्याबरोबर आई आणि उमर यांची विभक्त राहणारी पत्नी पायल नाथ याही होत्या. सभागृहात आज दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहिली. त्या वेळी झालेली भाषणे या दोघांनी ऐकली. अब्दुल्ला घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे झहीर आणि झमीर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नासीर अस्लम वणी यांच्या शेजारी बसले होते.