जावेद मात्झी
पाऊस, पूर, भूस्खलन, दगडी कोसळण्यामुळे जम्मू-काश्मीरचे जनजीवन विस्कळित झाले होते. राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद ठेवल्याने मालवाहतुकीवर परिणाम झाला होता. याचा फटका सफरचंद उत्पादकांना बसला आहे. यात आणखी एका संकटाची भर पडली आहे. तोडणीचा हंगाम बहरत असताना सफरचंदांच्या बागांमधून मोठ्या प्रमाणात फळगळती होऊ लागली आहे.
सुरुवातीला पावसाची प्रतीक्षा, नंतर गारपीट, वेगवान वारे आणि किटकांचा प्रादुर्भाव अशी संकटे सफरचंद उत्पादकांपुढे उभी राहिली होती. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे महामार्ग बंद ठेवल्याने फळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुरवठा उशिरा होत असल्याने मालवाहतुकीच्या खर्चात वाढ झाली. आता तोडणीचा हंगाम बहरात आल्यानंतर अचानक फळगळतीचे नवेच संकट उत्पादकांपुढे उभे राहिले आहे.
सफरबंदाचे पीक हे काश्मीरमधील फलोत्पादनचा कणा आहे. पण फळगळतीमुळे सफरचंदाचे उत्पादन संकटात आले आहे. लाखो लोकांना रोजगार देणारा आणि अर्थव्यवस्थेत हजारो कोटींचे योगदान देणारा हा उद्योग आधीच वाहतुकीतील अडथळे आणि वाढत्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत आला आहे.
शोपियांतील बागायतदार अब्दुल रशीद म्हणाले, "माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी झाडांवरून सफरचंद अशा प्रकारे पडताना पाहत आहे. आम्ही वर्षभर खूप कष्ट केले. कीड आणि कोरडया हवामानाशी झुंज दिली, पण आता कापणीच्या काळात सुरू झालेल्या पावसामुळे फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली आहेत. हे खूप निराशाजनक आहे."
झाडांवरून होणाऱ्या गळतीमुळे सफरचंदांची गुणवत्ता खालावते. निकृष्ट दर्जामुळे बाजारात त्यांना कमी भाव मिळतो, असे उत्पादकांचे म्हणणे आहे. पुलवामातील उत्पादक गुलाम नबी यांनी म्हटले की, "आम्हाला यापूर्वीही लहरी हवामान आणि किडींमुळे नुकसान सोसावे लागले आहे. पण अचानक सुरू झालेली फळगळती नवी आहे. हे असेच चालू राहिले तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते. आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे या बागांवर अवलंबून आहे. अशा नुकसानीमुळे आमचे जगणे धोक्यात येऊ शकते."
फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. शबीर अहमद डर म्हणाले की, "पावसामुळे झाडांवर ताण येतो. माती आणि हवेतील आर्द्रतेचे असंतुलन फळधारणेच्या क्षमतेवर थेट परिणाम करते. भविष्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विभागनिहाय सर्वेक्षणाची आवश्यकता आहे."