केंद्रीय GST विभागाने तिरुअनंतपुरमच्या पद्मनाभस्वामी मंदिर व्यवस्थापन समितीकडे १.५ कोटी रुपयांच्या थकबाकी GSTची मागणी केली आहे. CGST ने मंदिर समितीला मागील सात वर्षांचा १.५७ कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस बजावली आहे.
कर विभागाने व्यवस्थापन समितीचे स्पष्टीकरण नाकारले आहे. मंदिर व्यवस्थापन समिती विविध माध्यमातून येणाऱ्या महसुलावर जीएसटी पाठवत नसल्याचे कर विभागाने म्हटले आहे. यामध्ये भाड्याचे उत्पन्न, भक्तांना दिलेले कपडे, फोटोंची विक्री आणि मिरवणुकीसाठी हत्ती भाड्याने घेणे यांचा समावेश आहे.
कर थकबाकीबाबत केंद्रीय जीएसटी विभागाकडून प्राप्त झालेल्या या नोटीसवर मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्याने या नोटिशीला उत्तर देताना आपली बाजू मांडणार असल्याचे माध्यमांना सांगितले. मथिलकम कार्यालयात तपासणी केल्यानंतर, जीएसटी विभागाने सांगितले की, समितीने सेवा आणि उत्पादनांवर जीएसटी गोळा केला परंतु तो जमा केला नाही.
दुसरीकडे, मंदिर व्यवस्थापन समितीने सांगितले की, विविध सूट दिल्यानंतर केवळ १६ लाख रुपयेच बाकी आहेत. जीएसटी विभागाने समितीचे उत्तर फेटाळले आणि १.५७ कोटी रुपयांच्या कर थकबाकीसाठी नोटीस बजावली. समितीने चूक केल्यास १००% दंड आणि १८% व्याज भरावे लागेल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या रकमेत केंद्र आणि राज्य सरकारांना देय असलेल्या जीएसटीच्या ७७ लाख रुपये आणि पूर उपकराच्या ३ लाख (Flood Tax) रुपयांचा समावेश आहे. मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते नोटीसला योग्य उत्तर देतील.
देशातील दुसरे सर्वात श्रीमंत मंदिर
केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे असलेले पद्मनाभस्वामी मंदिर हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. अहवालानुसार, मंदिराच्या ६ तिजोरीत २० अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे, मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या भगवान विष्णूच्या सोन्याच्या मूर्तीची किंमत ५०० कोटी रुपये आहे. याशिवाय मंदिराच्या खजिन्यात हिरे आणि सोन्याचे दागिने आणि शिल्पे आहेत.