हिंदू व्यक्तीच्या सुटकेसाठी केरळमधील मुस्लीमबहुल गावाने जमा केले ४६ लाख रुपये

Story by  पूजा नायक | Published by  Pooja Nayak • 6 Months ago
दिवेश यांच्या कुटुंबियांसोबत आययूएमएल राज्यप्रमुख पनक्कड सय्यद मुनाव्वर अली शिहाब थांगल
दिवेश यांच्या कुटुंबियांसोबत आययूएमएल राज्यप्रमुख पनक्कड सय्यद मुनाव्वर अली शिहाब थांगल

 

केरला स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर केरळबद्दल गैरसमज तयार होतोय. पण केरळचे प्रतिनिधित्व अशा घटना करत नाहीत. तर मानवसेवेने प्रेरित झालेले लोक आणि संस्था खऱ्या केरळचे प्रतिनिधित्व करतात.

 

दिवेश लाल हा केरळातील मलप्पुरम येथील २८ वर्षीय तरुण.त्याचीघरची परिस्थिती बेताचीच. त्याने स्थानिक बँकेकडून १० लाखांचे गृहकर्ज घेतले होते. त्याची परतफेड करण्यासाठी नोकरी आवश्यक होती. नोकरीच्या शोधात तो कतार या देशात गेला. तिथे तो ड्रायव्हर म्हणून काम करू लागला.

 

८ जानेवारी २०२३ रोजी दिवेश नेहमीप्रमाणे कामावर गेला. काही वस्तू घेण्यासाठी टँकर कडेला उभा करून तो जवळच्या दुकानात गेला. मात्र टँकर हळूहळू मागे जाऊ लागले आहे हे कोणाच्या लक्षात ही आले नाही. दुर्दैवाने तो टँकर एका इजिप्शियन व्यक्तीला जाऊन धडकला. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. टँकरचालक दिवेशच्या हलगर्जीपणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दिवेशला तुरुंगात टाकण्यात आले. कुवेतच्या कायद्यानुसार त्याच्या समोर दोन पर्याय ठेवण्यात आले - मृताच्या कुटुंबाला पैसे देऊन (ब्लड मनी) स्वतःची सुटका करणे किंवा तुरुंगवास भोगणे.

 

केरळमधील मुस्लिम युथ लीगचे (आययूएमएल) राज्यप्रमुख पनक्कड सय्यद मुनाव्वर अली शिहाब थांगल यांनाही बाब समजली. दिवेशचा जीव कसा वाचवता येईल याची त्यांनी चाचपणी सुरु केली. रक्कमही थोडी थोडकी नव्हती. नुकसानभरपाई म्हणून तब्बल ४६ लाख रुपये भरावे लागणार होते. दिवेशकडे इतके पैसे नव्हते. त्याला नोकरीवर ठेवणाऱ्या मालकानेही हात वर केले होते. अडचणीत सापडलेल्या दिनेशला मुक्त करण्यासाठी लोकसहभागातून पैसे उभारण्याचा मार्ग सय्यद मुनाव्वर अली यांना सुचला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दिवेशला वाचवण्यासाठी पैसे उभारण्याचे काम सुरु केले.

 

दिवेशची सुटका करून त्याला स्वगृहीपरत आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यांनी मदतीचे आवाहन करताच हजारो केरळी हात मदतीला धावून आले. बघता बघता ४६ लाख रुपये जमा झाले. पैसे जमवण्यात आपण सर्वजण यशस्वी झालो आहोत. आता ही मोहीम थांबत आहोत, या आशयाची पोस्ट सय्यद मुनाव्वर अली यांनी नुकतीच फेसबुकवर टाकली.

 

आययूएमएलशी जोडल्या गेलेल्या कतारस्थित मल्याळी व्यावसायिकाने दिवेशच्या सुटकेसाठी १६ लाख रुपयांची देणगी दिली. तर आखाती देशातल्याकेरळ मुस्लिम सांस्कृतिक केंद्राने ४ लाख रुपयांची मदत केली. कतारस्थित मलप्पुरममधील अनिवासी समूहाने ६ लाख रुपये दिले. तर उर्वरित २० लाख रुपये मलप्पुरममधून देणग्यांद्वारे गोळा करण्यात आले. अवघ्या तीन दिवसांतइतकी मोठी रक्कम जमा झाल्याचे आययूएमएलचे नेते आणि पेरिंथलमन्ना ब्लॉक पंचायत स्थायी समितीचे अध्यक्ष अजीज पट्टिकड यांनी टेलिग्राफला सांगितले. निधीची जमवाजमव करणे आणि ती कतारला हस्तांतरित करणे यासाठी आययूएमएलने वल्लीकुन्नूचे आमदार अब्दुल हमेद मास्टर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती स्थापन केली होती.

 

सध्या कतारमध्ये दिवेशच्या मुक्ततेसाठी कायदेशीर सोपस्कार सुरू आहेत. देवेशच्या रिलीज ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृत इजिप्शियन नागरिकाच्या नातेवाईकांना हे पैसे मिळतील अशी तरतूद केली जाईल, असे अजीज पट्टिकड यांनी सांगितले.

 

रमजान महिन्यामुळे देवेशची तात्पुरती सुटका झाली होती. तत्पूर्वी त्याने ७४ दिवस तुरुंगात घालवले. आता तो २० मे रोजी तुरुंगात परतला. “त्याला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही यासाठी आम्ही लवकरात लवकर सर्व औपचारिकता पूर्ण करू” असेही अजीज पट्टिकड म्हणाले.

 

“केरळमध्ये अनेक शतकांपासून हिंदू अमी मुस्लीम समाज गुण्यागोविंदाने राहात आहे. संकटकाळी एकमेकांच्या मदतीला धावून जात आहे. मात्र आमच्याराज्याची आणि इथल्यालोकांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणार्‍यासाठी द्वेषपूर्ण मोहिमा राबवणाऱ्या मंडळींना ही आमची कृती एक सणसणीत चपराक आहे.”हे सांगण्यास मुस्लिम युथ लीगचे (आययूएमएल) राज्यप्रमुख सय्यद मुनाव्वर अली विसरले नाहीत.

 

आययुएमएल आणि मलप्पुरममध्ये बहुसंख्येने असलेला मुस्लिम समुदाय यांची ही कृती केरळी परंपरेला साजेशीच आहे. एका सिनेमामुळे चर्चेत आलेल्या केरळची ही दुसरी (आणि खरी) बाजू म्हणूनच जोरकसपणे मांडणे आवश्यक आहे.