डॉ. तारा भवाळकर
दिल्ली येथे नियोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. २१, २२ आणि २३ फेब्रुवारीला दिल्लीत हे संमेलन होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. ६) पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. भवाळकर या साहित्य संमेलनाच्या इतिहासातील अवघ्या सहाव्या महिला संमेलनाध्यक्ष ठरल्या आहेत. यापूर्वी कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष आणि डॉ. अरुणा ढेरे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. डॉ. अरुणा ढेरे यांनी २०१९ मध्ये यवतमाळ येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर पाच वर्षांनी महिला साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदावर निवडल्या गेल्या आहेत.
संमेलनाध्यक्षपदासाठी यंदा डॉ. भवाळकर यांच्यासह कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे आदींची नावे चर्चेत होती. यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी यांनी भूषवले होते.
आगामी संमेलनासाठी त्याच तोलामोलाचे आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या साहित्यिकाची निवड करण्याचे आव्हान महामंडळासमोर होते. तसेच, दिल्लीतील संमेलनाचे अध्यक्ष निवडताना वादग्रस्त नसतील आणि सर्वांची संमती असेल, असे अध्यक्ष निवडण्याची भूमिका महामंडळाची होती. त्यातून डॉ. भवाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter