महाराष्ट्रातील मुस्लीम संघटनेच्या रक्तदान शिबिरात विक्रमी रक्तदान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
'युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र'तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
'युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र'तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

 

रक्तदानाला महादान म्हणतात कारण ते इतरांना नवजीवन देऊ शकते. सामान्यत: लोक रक्तदान करण्यास संकोच करतात. कारण अनेकांच्या मनात समज असतो की रक्तदान केल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते, अशक्तपणा येतो तसेच इंफेक्शन होऊ शकते. परंतु रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव तर वाचतोच, पण ते रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. 

रक्तदानाबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक मुस्लीम संस्था रक्तदान शिबीरासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. 'युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र' या संस्थेच्या वतीने ईद मिलाद-उन-नबीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने महिनाभर चाललेल्या या उल्लेखनीय उपक्रमाविषयी संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव मोहम्मद तेहसीन यांच्याकडून जाणून घेऊया…

या उपक्रमाविषयी बोलताना मोहम्मद तेहसीन म्हणतात, “मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम राबवायचे ठरवले. प्रेषित मोहम्मद यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानवसेवेला प्रथमस्थानी ठेवण्याची प्रेरणा दिली आहे. इस्लामने दिलेल्या शिकवणीनुसार समाजासाठी जो कामी येईल तोच सर्वात मोठा कर्मयोगी आहे. त्यामुळे प्रेषितांच्या जन्मदिनी आम्ही हे नेक काम करण्याचे ठरवले.”

युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र ही संस्था मागील १७ वर्षांपासून रक्तदान शिबीराचे आयोजन करत आहे. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहोम्मद रफीक आणि शेख अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे चालणारा हा उपक्रम यावर्षी सुद्धा संस्थेकडून मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला. या राज्यस्तरीय मेगा ब्लड डोनेशन मोहिमेचे आयोजन महाराष्ट्र राज्यात ५० ठिकाणी करण्यात आले होते. राज्यभरातून तब्बल ८०७२ रक्ताच्या पिशव्यांचे वाटप महाराष्ट्र सरकारी-ओ-नीम या सरकारी संस्थानात करण्यात आले.

अनेकांचा जीव वाचवणाऱ्या रक्तदानाला सामाजिक दृष्टीकोनातून फार महत्व आहे. परंतु रक्तदानाशी निगडित अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. या गैरसमजामुळेच रक्तदान हे उत्तम असतं हे माहीत असूनही ते करायला लोकांचे मन धजावत नाही. मग हीच बाब लक्षात घेऊन रक्तदानाशी निगडित असलेले गैरसमज खोडून काढण्यासाठी या संस्थेने अनेक विविध उपक्रम राबवले. 

संस्थेने समाजात रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शिबिरे घेतली. याविषयीची अधिक माहिती देताना मोहम्मद तेहसीन म्हणतात, “२००७ पासून आम्ही रक्तदान मोहीम सुरु केली. तेव्हापासूनच आम्ही याविषयीची जनजागृती सुरु केली. लोकांमध्ये रक्तदानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभरात शिबिरे घेतली. त्याठिकाणच्या स्थानिक राजकीय नेत्यांना या संकल्पनेबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या मदतीने हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. तरुणांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले. त्यांना थॅलेसीमिया आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मुलाखती दाखवल्या त्यांच्याशी चर्चा घडवून दिली आणि अशा पद्धतीने आम्ही लोकांना रक्तदानाचे महत्व पटवून देण्यात यशस्वी झालो.”

मोहम्मद पुढे म्हणतात, “आमचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने तेव्हा यशस्वी झाला, जेव्हा केवळ मुस्लीम समाजातूनच नाही तर इतर समजातून सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे इतर धर्मातील स्त्रिया आणि पुरुष सुद्धा या रक्तदान मोहिमेत आघाडीवर होते. त्याचबरोबर पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळींनी सुद्धा रक्तदान केले.” 

रक्तदानाविषयी मिळालेल्या प्रेरणेबद्दल बोलताना मोहम्मद सांगतात, “निस्वार्थीपणानं केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. रक्तदान हे असंच निस्वार्थी दानापैकी एक समजलं जातं. आजचा रक्‍तदाता हा उद्याचा रक्‍त घेणारा असू शकतो किंवा आज रक्‍त घेतलेला रुग्‍ण बरा झाल्‍यावर भविष्‍यात रक्‍तदाता असू शकतो. काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्‍तदान हे जीवनदान आहे. त्यामुळे आम्ही हा उपक्रम अशाच पद्धतीने सुरु ठेवणार आहोत.”
 

'युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र' संस्थेविषयी…
जमात-ए-इस्लामी हिन्द या संघटनेची उपसंस्था म्हणून युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहे. मुस्लीम तरुणांना समाजकार्यात आणण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेद्वारे समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले जातात. हिंदू -मुस्लीम एकतेसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम संस्थेद्वारे घेतले जातात. देशाचे भविष्य घडवणाऱ्या तरुण पिढीला या संस्थेद्वारे समाजकार्याविषयीचे समुपदेशन केले जाते. 

‘ऑनलाइन जुवा हटाओ, देश का युवा बचाओ’
सध्या युवकांकडून सोशल मिडियाचा अतिरिक्त वापर होताना दिसतो. यामुळे तरुण वर्ग ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्रच्या वतीने ‘ऑनलाइन जुवा हटाओ, देश का युवा बचाओ’ ही मोहीम राबवली जाते. या उपक्रमाविषयी सांगताना मोहम्मद तेहसीन म्हणतात, “इंटरनेटमुळे आणि सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे देशातील तरुण व्यसनाच्या अधीन होत आहे. देशाचे भविष्य असणारी युवा पिढी ऑनलाइन गेमिंगमुळे भरकटली जात आहे. ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी आम्ही ‘ऑनलाइन जुवा हटाओ, देश का युवा बचाओ’ हा अभिनव उपक्रम राबवत आहोत.”
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter