हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील 'सलोख्याचे प्रदेश'

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 11 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

त्र्यंबकेश्वरमधला वाद असो किंवा गेल्या काही काळात राज्यात वेगवेगळ्या भागात झालेल्या दंगली असोत; यांतून हिंदू मुस्लिमांमधलं अंतर वाढतंय का, याची भिती वाटते. पण मुळचा भारत असा आहे का असा विचार केला तर त्याचं उत्तर येतं... नाही! हिंदू देवतांची भक्ती करणारे मुस्लीम असो की दोन्ही धर्मांचं पालन करणारी माणसं. सर्वधर्मसमभावाची अनेक उदाहरणं देशात पहायला मिळतात. याच उदाहरणांचं सध्याचा काळात प्रत्येकानेच वाचलं पाहिजे असं पुस्तक म्हणजे सलोख्याचे प्रदेश.

-प्राची कुलकर्णी

सबा नक्वी पत्रकार म्हणून काम करत असतानाच बाबरी मशीद पाडली गेली. बाबरीनंतर सलोख्याच्या कहाण्या लिहिल्या जात होत्या आणि अशाच एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही आणि तुमचे पती हिंदु मुस्लीम आहात तर बाबरीच्या प्रश्नावरुन तुमच्यामध्ये वाद होतात का? या प्रश्नाचा म्हणावं तर तिटकारा यावा. पण त्यांना मात्र या प्रश्नाने कामाला लावलं. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि जेएनयूमधल्या प्राध्यापकांकडून आर्थिक सहाय्य घेत त्या बाहेर पडल्या ते देशभ्रमंती करायला. त्यांना शोध घ्यायचा होता तो अशा भागांचा जिथे एकजूटीच्या खुणा सापडतील. या प्रवासात त्यांना सापडले ते हे सलोख्याचे प्रदेश.

या प्रवासात त्यांना भेटली ती अशी माणसं जी एकाच वेळी हिंदू आहेत आणि मुस्लिम सुद्धा. पश्चिम बंगाल मध्ये असं अख्खं गावच दोन धर्मांची ओळख घेत गुण्यागोविंदाने नांदतय. पटचित्रका समाजाचं हे गाव आणि त्यातले लोक आडनाव लावतात ते फक्त चित्रकार हेच. अर्थात दोन्ही धर्मांच्या ओळखी जपत हिंदू देवतांची चित्र काढण्याची आपली कला जपणाऱ्या या माणसांनाही आपली ‘ओळख’ सिद्ध करावी लागतेच. 

पश्चिम बंगालमधल्या याच प्रवासात त्यांना बोनबीबीदेवीची पूजा करणारी लोकं भेटली. सुंदरबनचं रक्षण करणारी देवी म्हणून जिला मानलं जातं ती ही देवी आहे एक मुस्लीम देवता. एकीकडे बंगालच्या या कहाण्या तर दुसरीकडे भगवान विष्णूची मुस्लीम सखी असं काही म्हणलं तरी आपल्याकडे कपाळावर आठ्या आणि तोंडावर 'काहीही काय'चे भाव येतील. पण तमिळनाडूतल्या त्रिचीमधल्या श्रीरंगम मंदिरात मात्र ही परंपरा पाळली जाते. या झाल्या भारतातल्याच दुरच्या राज्यांमधल्या कथा.

पण आपल्या महाराष्ट्रातही ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतानाही आवेश येतो त्या शिवाजी महाराजांचे सुफी संतांबरोबर असलेले उत्तम संबंध. संशोधकांच्या मते मालोजीराजेंची शाह शरीफ या नगर जिल्ह्यातल्या संतांवर श्रद्धा होती. आणि त्यांनी आपल्याला मुलं व्हावी यासाठी त्यांचे आशीर्वादही घेतले होते. स्वत: शिवाजी महाराज देखील सुफी संत सय्यद याकूब यांना मानत असत आणि त्यांचा सल्लाही घेत असत, असं सांगितलं जातं.

या झाल्या नक्वी यांनी लिहिलेल्या काही कहाण्या. इतिहास आणि वर्तमानही सांगणाऱ्या अशा अनेक कथा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला अनुवादासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती समकालीन प्रकाशन घेऊन आलं आहे. सध्याच्या वातावरणात सहिष्णू भारताचा शोध घेणारं सलोख्याचे प्रदेश शोधणारं हे पुस्तक वाचायलाच हवं.

(सौजन्य - साम टीवी ब्लॉग)
 

पुस्तकाचे नाव : सलोख्याचे प्रदेश

लेखिका : सबा नक्वी  

अनुवादक : प्रमोद मुजुमदार

प्रकाशक : समकालीन प्रकाशन

प्रकाशन वर्ष : २०१६

किंमत : २२५ रुपये मात्र