विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२४'ची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा हा सन्मान महाराष्ट्रातील आघाडीच्या पत्रकार आणि लेखिका हिनाकौसर खान यांना जाहीर करण्यात आला आहे. पंधरा हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रा. बेन्नूर यांच्या पुस्तकांचा संग्रह असे या सन्मानाचेचे स्वरूप असणार आहे.
प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पार पडलेल्या सन्मान समितीच्या बैठकीत हिनाकौसर खान यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला. या बैठकीत समितीचे विश्वस्त प्रा. डॉ. यूसुफ बेन्नूर, सरफराज अहमद, डॉ. मुस्तजीब खान, कलीम अजीम, रेणुका कड, प्राचार्य फारुख शेख, उल्हास वेदपाठक हे उपस्थित होते.
हिनाकौसर खान यांच्या साहित्यिक, वैचारिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही समितीकडून सांगण्यात आले आहे.
सन्मानार्थी हिनाकौसर खान यांच्याविषयी…
हिनाकौसर खान गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. संवेदनशील पत्रकार आणि लेखिका म्हणून महाराष्ट्रभर त्या ख्यातकिर्त आहेत. मुस्लिम समाजाचे अंतरंग लेख, मुलाखती, ललित कथांच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तिहेरी तलाक विरोधात लढा देणाऱ्या मुस्लीम महिलांच्या व्यथा मांडणारा ‘तीन तलाक विरुद्ध पाच महिला’ ही अभ्यासपूर्ण पुस्तिका, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांशी संवाद साधून ‘धर्मारेषा ओलांडताना’ हा मुलाखतींचा संग्रह या त्यांच्या महत्त्वाच्या कृतींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
अलीकडेच त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. हिंदू-मुस्लिमांना शांततामय सहजीवनाचा सम्यक मार्ग दाखवणाऱ्या या पुस्तकाचे नाव ‘इज्तिहाद’ असे आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली 'इत्रनामा' ही त्यांची कादंबरीही सध्या गाजते आहे. त्यांच्या एकूणच साहित्यिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊनच त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोण होते प्रा. फकरुद्दीन बेन्नूर?
फकरुद्दीन बेन्नूर (२५ नोव्हेंबर १९३८ - १७ ऑगस्ट २०१८) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख लेखक विचारवंत होते. सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये १९६६ सालापासून अध्यापन सुरू केले. इतिहास, साम्राज्यवाद, जागतिकीकरण, इतिहासशास्त्र, भांडवलशाही, गांधीवाद, साम्राज्य़वाद, साम्यवाद, हिंदुत्व, इस्लाम आणि अरब देश हे त्याच्या अभ्यासाचे विषय होते. सोलापूरमधील कामगार चळवळ तसेच डाव्या चळवळीतही त्यांनी दीर्घकाळ काम केले.
मुस्लिम मराठी साहित्य परिषद,मुस्लिम ओबीसी संघटना यांसारख्या संस्थांच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांची मराठी, हिंदी आणि उर्दूतून अशी एकूण १३हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. यांतील बहुतांश पुस्तके मुस्लिम समाजाचे अंतरंग दर्शवणारी आहेत. फकरुद्दीन बेन्नूर हे महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. विविध सामाजिक चळवळी आणि संस्थांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.