युक्रेनमधील युद्धाच्या बाबतीत अमेरिकेने मर्यादा ओलांडू नये, असा इशारा आज रशियाने दिला आहे. तसेच, संयम बाळगण्याची अमेरिकेची संवेदना लोप पावत असल्याचा टोमणाही रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी या वेळी लगावला.
एका मुलाखतीदरम्यान लाव्हरोव्ह यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली. ‘‘युक्रेनला शस्त्रपुरवठा करून अमेरिकेने त्यांची स्वत:ची लाल रेषा (मर्यादा) ओलांडली आहे. मात्र, आम्ही इतरांसाठी ओढलेली लाल रेषा त्यांनी पार करू नये. या लाल रेषेच्या ते किती जवळ आहे, हे त्यांना माहिती आहे.
कुठे थांबायचे, याची अमेरिकेची समज कमी होत चालली असून हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे,’’ असे लाव्हरोव्ह म्हणाले. रशियामध्ये खोलवर हल्ले करण्याची क्षमता असलेल्या शस्त्रांची युक्रेनला पुरवठा करण्याची गरज असल्याचे मत अमेरिकेच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, अशी शस्त्रे युक्रेनला देण्याचे काय परिणाम भोगावे लागतील, याची अमेरिकेला कल्पना असेल, असा इशाराही लाव्हरोव्ह यांनी यावेळी दिला.
दरम्यान, आम्ही मित्रांचा आदर करतो. संघर्ष सोडविण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करत आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्होलोदीमिर पुतीन यांनी म्हटले. या मित्रांच्या यादीत भारताचे नाव असून चीन आणि ब्राझीलचाही यादीत समावेश आहे. संघर्ष सोडविण्यासाठी या तिघांच्या संपर्कात आहोत, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले आहे.
झेलेन्स्की अमेरिकी नेत्यांना भेटले
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाची तीव्रता सध्या वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज अमेरिकेच्या वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आणि सुमारे ५० मित्रदेशांशी संवाद साधत अधिक शस्त्रे पुरविण्याची मागणी केली. रशियाविरोधातील युद्ध महत्त्वाच्या टप्प्यावर असून अशावेळी शस्त्रे न मिळाल्यास मोठी हानी होईल, असे झेलेन्स्की यांनी सर्वांना सांगितले.
अमेरिकेने युक्रेनला २५ कोटी डॉलरची शस्त्रे देण्याचे मान्य केले असले तरी अद्याप ती शस्त्रे दिलेली नाहीत. दुसरीकडे, युक्रेनने रशियामध्ये हल्ला करत कुर्स्क प्रांताच्या काही भागाचा ताबा मिळविला असला तरीही रशियाने युक्रेनमधील पोक्रोस्क शहराचा ताबा मिळविण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter