आपण सर्व एकच! हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी आमची - मुहम्मद युनुस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

"सरकारच्या भूमिकेबद्दल कोणताही निष्कर्ष काढण्याआधी थोडा धीर, धरा," असे आवाहन बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी मंगळवारी केले. युनूस यांनी येथील हिंसाचारात होरपळलेल्या हिंदू नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचप्रमाणे त्यांनी येथील ढाकेश्वरी देवीच्या मंदिरालाही भेट दिली.
 
आपण सर्व एकच! हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी आमची... 
"बांगालादेशात सर्वांना समान अधिकार आहेत, त्यामुळे आपापसांत भेदभाव करू नका. आमच्या सरकारला सहकार्य करा, थोडा धीर धरा आणि त्यानंतर आम्ही काय करू शकलो आणि काय नाही याबाबत निष्कर्ष काढा आम्ही जर अपयशी ठरलो तर आमच्यावर टीका करा," असे आवाहन युनूस यांनी येथील हिंदू समुदायाला दिलेल्या भेटीवेळी केले.
 
युनूस यांनी मंगळवारी ढाकेश्वरी देवीच्या मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील पुजाऱ्यांच्या समितीचे अधिकारी, मंदिर व्यवस्थापन समिती आणि भाविकांशी संवाद साधला. "लोकशाहीची अपेक्षा असणाऱ्या आपण सर्वांनी एकमेकांकडे हिंदू, मुस्लिम किंवा बौद्ध म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहायला हवे, आपण सर्व एकच, तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे" असे युनूस म्हणाले.
 
"बांगला देशातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेला आणि सामाजिक परिस्थिला, व्यवस्थेत निर्माण झालेले दोष कारणीभूत आहेत," असा दावा युनूस यांनी केला. देशातील ही व्यवस्था. बदलण्याची आवश्यकता आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी युनूस यांच्याबरोबर बांगलादेशातील हंगामी सरकारमधील कायदाविषयक सल्लागार असिफ नझरुल आणि धर्मिक विषयाचे सल्लागार खालिद हुसेन हे देखील उपस्थित होते.

भारत बांगलादेश संबंधांवर परिणाम नाही
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या भारतात वास्तव्यास असल्या तरी भारत व बांगलादेश यांच्यातील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्ररराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान, बांगलादेशातील व्हिसा कार्यालयात मंगळवारी मर्यादित सेवा सुरू केल्या आहेत. याबाबत तेथील व्हिसा अॅप्लिकेशन सेंटरच्या वतीने निवदेन जारी करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांचे राजीनामे कायदेशीरदृष्ट्या योग्य 
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांनी राजीनामा देणे हे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे, असे मत बांगलादेशातील हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी व्यक्त केले आहे. बांगलादेशातील राजकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी शेख हसीना यांच्या सरकार विरोधात आंदोलन पुकारले होते. अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील असे ते म्हणाले. हसीना यांनी देश सोडल्यानंतर मागील आठवड्यात बांगलादेशातील मुख्य न्यायाधीश, पाच न्यायाधीश व सेंट्रल बँकेचे गव्हर्नर या सर्वांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, हसीना यांच्या कार्यकाळात युनूस यांच्यावर दाखल असलेले सर्व खटले रद्द करण्याचा निर्णय बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.