दिल्ली बॉम्बस्फोट : मुस्लिम राष्ट्रांचा दहशतवादाविरोधात एकमुखाने निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. या भीषण कार बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देश शोक व्यक्त करत आहे. तसेच जगभरातून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सौदी अरेबिया, इराण, कतार, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आणि मालदीव यांसह अनेक मुस्लिम देशांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.

सौदी अरेबियाचा तीव्र निषेध

सौदी अरेबियाने दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रति आणि पीडित कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संयुक्त अरब अमिरातीने (UAE) देखील या दुःखाच्या प्रसंगी भारताला पाठिंबा दिला. UAE च्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील कार स्फोटाचा तीव्र निषेध केला. ते म्हटले की, ते कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवाया आणि हिंसाचाराचे समर्थन करत नाही.

मालदीव, इराण आणि कतारकडूनही दुःख व्यक्त

सौदी आणि UAE नंतर कतार, मालदीव आणि इराणनेही भारताला पाठिंबा देत या कार स्फोटाचा निषेध केला आहे. नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने लाल किल्ला कार स्फोटावर एक निवेदन जारी केले. या निवेदनात लाल किल्ला कार स्फोटात मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांप्रति दुःख व्यक्त केले. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्याची आणि पीडित कुटुंबांसाठी संयमाची प्रार्थना केली.

मालदीवच्या राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

लाल किल्ला कार स्फोटानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये मुइझ्झू यांनी लिहिले की, दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात मारल्या गेलेल्या लोकांच्या बातमीने ते दुःखी आहेत. त्यांनी पीडित कुटुंबांप्रती संवेदनाही व्यक्त केली.

 

लाल किल्ला कार स्फोटानंतर तपास यंत्रणा पुरावे गोळा करत आहेत. लवकरच या घटनेमागील सत्य देश आणि जगासमोर आणले जाईल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter