पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान भारताकडे येणारी दोन एलपीजी (LPG) जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे पुढे गेली आहेत. मात्र, याच धोरणात्मक सागरी मार्गाजवळ हल्ल्याचा बळी ठरल्याने एका भारतीय जहाजाला जलसमाधी मिळाली आहे. ओमान तटरक्षक दलाने जहाजावरील सर्व १४ खलाशांची सुखरूप सुटका केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
'सिमी' (Symi) या एलपीजी जहाजाने १३ मे रोजी सामुद्रधुनी पार केली, तर 'एनव्ही सनशाईन' (NV Sunshine) हे जहाज गुरुवारी सुरक्षितपणे पुढे निघाले. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ हा मार्ग बंद होता. आतापर्यंत एकूण १३ भारतीय जहाजांनी हा सागरी मार्ग पार केला आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले की, 'सिमी' हे जहाज १६ मे रोजी गुजरातच्या कांडला बंदरात, तर 'एनव्ही सनशाईन' १८ मे रोजी न्यू मंगळूरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या दोन्ही जहाजांवरील माल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा (IOC) आहे.
सोमालियावरून यूएईमधील शारजाकडे जाणाऱ्या 'हाजी अली' या भारतीय मालवाहू जहाजावर (Dhow) बुधवारी पहाटे ओमानच्या सागरी हद्दीत हल्ला झाला. या हल्ल्यामुळे लाकडी जहाजाला आग लागली आणि ते बुडाले. मंगल यांनी माहिती दिली की, जहाजावरील सर्व १४ खलाशांची ओमान तटरक्षक दलाकडून सुरक्षितपणे सुटका करण्यात आली असून ते सध्या ओमानच्या दिब्बा बंदरात आहेत.
भारत सरकार ओमान सरकार, भारतीय दूतावास आणि संबंधित सागरी संस्थांच्या सतत संपर्कात असून लवकरच या खलाशांना भारतात परत आणले जाईल, असेही मंगल यांनी स्पष्ट केले. ५७ मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असलेले हे लाकडी जहाज प्रामुख्याने हिंदी महासागरातील व्यापारासाठी वापरले जात होते.