इस्राईलच्या सैनिकांनी आज पश्चिम किनारपट्टी (वेस्ट बँक) परिसरात मोठी लष्करी कारवाई करत जेनिन शहराची नाकाबंदी केली. यावेळी झालेल्या संघर्षात नऊ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा इस्राईलने केला आहे.
हमासबरोबर युद्ध सुरू झाल्यापासून इस्राईलने वेस्टबँक परिसरात सातत्याने छापे टाकत कारवाई केली आहे. या परिसरातील जेनिन शहर हे हमासच्या दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचा इस्राईलचा दावा आहे.
तसेच, येथील तुल्कारेम आणि अल फारा या दोन निर्वासित छावण्यांमध्येही दहशतवादी लपून बसत असल्याचे या देशाचे म्हणणे आहे. या दोन्ही छावण्या १९४८ पासून अस्तित्वात आहेत. हमासविरोधातील कारवाईचा भाग म्हणून इस्रायली सैनिकांनी आज या दोन्ही छावण्यांवर छापे टाकत शोधमोहीम राबविली.
त्याशिवाय हवाई हल्लेही केले. या हल्ल्यांत नऊ दहशतवादी मारले गेल्याचा दावा इस्राईलने केला आहे. मात्र, हे सर्व जण सामान्य पॅलेस्टिनी नागरिक होते, असा दावा पॅलेस्टाइनने केला आहे.
इस्राईलच्या सैनिकांनी जेनिन शहराला वेढा दिला असून या शहराची पूर्ण नाकाबंदी केली आहे. या शहरातील रुग्णालयांचाही ताबा सैनिकांनी घेतला असून रुग्णालयांच्या दिशेने जाणारे रस्तेही बंद केले आहेत.
दहशतवाद्यांनी रुग्णालयांचा आसरा घेऊ नये, म्हणून ही नाकाबंदी केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील सशस्त्र गट आणि सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे. या शहरातील नागरिकांचे विस्थापन करण्याचा कोणताही इरादा नसल्याचे इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.
एका ओलिसाची सुटका
इस्राईलने मंगळवारी रात्री गाझा शहरातील एका भुयारात डांबून ठेवलेल्या ओलिसाची सुटका केली. मागील वर्षी सात ऑक्टोबरला हमासने हल्ला करत अपहरण केलेल्या नागरिकांपैकी हा एक जण आहे. अद्यापही सुमारे शंभर जण हमासच्या ताब्यात आहेत.
अमेरिका-कतार चर्चा
वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे सल्लागार ब्रेट मॅकगर्क यांनी आज कतारचे पंतप्रधान शेख महंमद बिन अब्दुलरहमान अल थानी यांच्यासह विविध मंत्र्यांची भेट घेत इस्राईल-हमास यांच्यातील संभाव्य शस्त्रसंधीबाबत चर्चा केली. संपूर्ण शस्त्रसंधी होऊन सर्व ओलिसांची सुटका व्हावी, यासाठी अमेरिका, कतार आणि इजिप्त हे देश प्रयत्न करत आहेत.