कमला हॅरिस-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 'कांटे की टक्कर'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
Kamala Harris VS Donald Trump
Kamala Harris VS Donald Trump

 

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत सुरू आहे. नॉर्थ कैरोलिना आणि जॉर्जियामध्ये हॅरिस यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनियामध्ये हॅरिस यांची आघाडी मोडून काढली असून अरिझोनामध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरला अमेरिकेचा अध्यक्ष कोण होणार, याची उत्कंठा वाढली आहे.लढाईत डेमॉक्रॅटिकच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने आहेत. अत्यंत अटीतटीची लढत असून निवडणुकीच्या निकालासाठी काही तास शिल्लक असताना हॅरिस आणि ट्रम्प मतदारांना शेवटपर्यंत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. पाठिंब्यासाठी देशवासीयांना आवाहन करताना दिसत आहेत. सात राज्यांमध्ये कोणत्याच उमेदवाराला निर्णायक आघाडी नसल्याचे दिसत आहे.

उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी विस्कॉनसिन येथील प्रचारसभेत आम्हीच जिंकणार, असा विश्वास व्यक्त करताना अमेरिकेत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन केले. विस्कॉनसिन आणि उत्तर कॅरोलिनामध्ये शनिवारी हॅरिस यांनी जोरदार प्रचार केला. रविवारी आणि सोमवारी त्या मिशिगन, जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनियामध्ये असतील. ट्रम्प यांनी व्हर्जिनिया येथील प्रचाराचा शनिवारी समारोप केला.

सालेममधील समर्थकांना संबोधित करताना त्यांनी देशात शांतता आणि समृद्धी आणण्याची ग्वाही दिली. या वेळी त्यांनी हॅरिस यांच्यावर उदारमतवादी डावे कट्टरपंथी असल्याचा हल्लाबोल केला.

हॅरिस यांची किंचित आघाडी
ट्रम्प पुढील दोन दिवस मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि उत्तर कॅरोलिनाच्या युद्धभूमीत असतील. त्यांना अरिझोना, नेवाडा, विस्कॉनसिन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, उत्तर कॅरोलिना आणि जॉर्जिया या प्रमुख युद्धभूमीत जिंकण्यासाठी २७२ मतांची गरज आहे. 272towin.comनुसार हॅरिस यांना २२६ मतांची, तर ट्रम्प यांना २१९ मतांची खात्री आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी हॅरिस यांना ४४ मतांची, तर ट्रम्प यांना ५१ मतांची गरज आहे.