-प्रज्ञा शिंदे,
आपण जगातील विविध देशांबद्दल अनेकदा मनोरंजक तथ्ये ऐकतो आणि वाचतो, परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला भावनिकदृष्ट्या प्रभावित करतात. धर्माच्या बाबतीत जगभर वेगवेगळे विचार असले तरी काही देश असे आहेत की ज्यांचा आपल्याला अभिमान वाटतो. अशाच एका देशाचे नाव आहे इंडोनेशिया. हा जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश मानला जातो. इथल्या चलनालाही 'रुपिया' असेच नाव आहे, जे भारताच्या 'रुपया' चलनाशी साधर्म्य दाखवते.
आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाच्या चलनी नोटांवर हिंदू आणि भारतात पूजनीय असलेल्या श्री गणेशाचे चित्र आहे. इंडोनेशिया हा एक असा देश आहे जिथे ८७.५ % लोक मुस्लिम धर्मावर विश्वास ठेवतात, तर फक्त ३% लोक हिंदू आहेत. तरीही, त्यांच्या चलनी नोटांवर गणपती विराजमान आहेत.
इंडोनेशिया हे सांस्कृतिक एकात्मता आणि धार्मिक सहिष्णुता कशा प्रकारे साजरी केली जाऊ शकते याच एक उत्तम उदाहरण आहे. येथील हिंदू-मुस्लिम संबंधांचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, त्या देशात कोणताही धार्मिक संघर्ष आढळत नाही. मुस्लिमबहुल असतानाही, हिंदू संस्कृतीशी एकरूप झालेल्या समता आणि बंधुतेचे अनेक उदाहरणे इंडोनेशियामध्ये दिसतात. चलनी नोटांवर गणेशाचे चित्र छापणे हा त्याचा एक लक्षणीय भाग आहे, जो जगातील इतर देशांना हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे एक आदर्श उदाहरण म्हणून प्रेरणा देतो.
बंधुत्वाचे उदाहरण
नोटांव्यतिरिक्त, इतर अनेक पुरावे आहेत जे दर्शवतात की इंडोनेशियातील प्रत्येक स्तरात सामंजस्याचे वातावरण आहे. संपूर्ण इंडोनेशियात विविध ठिकाणी हिंदू चिन्हे आणि पुतळे आदराने ठेवलेले आढळतात. देशात ८७ टक्क्यांहून अधिक मुस्लिम असतानाही, त्यांची आस्था आणि आदर हिंदू संस्कृतीप्रति स्पष्टपणे दिसून येतो. हे पाहून कुणालाही जाणवणार नाही की ते एका मुस्लिमबहुल देशात आहेत. २०१० मध्ये, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा अनुभवही असाच होता. इंडोनेशियाला भेट दिल्यावर तेथील हिंदू-मुस्लिम बंधुभाव आणि धार्मिक सहिष्णुता पाहून ते थक्क झाले होते.
सांस्कृतिक वारसा
इंडोनेशियाच्या चलनाला 'रुपिया' असे म्हणतात. २० हजार रुपयांच्या नोटेवर नजर टाकल्यास, आपल्याला गणेशजींचा फोटो दिसतो, ज्याच्या शेजारी इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवंत्रा यांचा फोटो आहे. नोटच्या मागील बाजूस एका वर्गखोलीचे चित्र आहे, ज्यामध्ये मुले अभ्यास करताना दिसतात. असे मानले जाते की, पूर्वी इंडोनेशियावर हिंदू राजवटीचा प्रभाव होता. पहिल्या शतकात येथे हिंदू राज्यकर्त्यांनी राज्य केले, त्यामुळे त्यांच्या धर्म आणि संस्कृतीत हिंदूंचा ठसा ठळकपणे उमटलेला आहे. आजही, इंडोनेशियाच्या विविध ठिकाणी सांस्कृतिक वारशाचे प्रतिक असणाऱ्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे आढळतात.
गणेशजींचे चित्र
इंडोनेशियाने आपल्या नोटेवर गणेशजी आणि हजर देवंत्राला समान स्थान दिले आहे, ज्यामध्ये एक विशेष संदेश आहे. गणेशजींना कला, विज्ञान, आणि बुद्धिमत्तेची देवता मानले जाते, तर हजर देवंत्रा हे इंडोनेशियाचे स्वातंत्र्यसैनिक ही होते, ज्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेचा पाया घातला. त्या काळात इंडोनेशिया डच वसाहतीच्या प्रभावाखाली होता. या नोटेच्या मागील बाजूस असलेल्या वर्गखोलीच्या चित्रातून, शिक्षणाला दिलेले महत्त्व स्पष्ट होते. हे महत्त्व गणेशजींच्या बुद्धिमत्तेप्रमाणेच देवांतराच्या शिक्षणविषयक योगदानाशी समतुल्य मानले गेले आहे.
इंडोनेशियातील रामायण-महाभारत
इंडोनेशियातील हिंदू प्रेमाचे उदाहरण रामायण आणि महाभारतातूनही दिसून येते. तिथे रामायण आणि महाभारताची कथा प्रत्येक घरात सांगितली जाते. रामायण आणि महाभारतावर आधारित लीला आणि नाटकेही आयोजित केली जातात. जकार्ता चौकात कृष्ण-अर्जुनाचा पुतळा बसवला आहे. इंडोनेशियन सैन्य हनुमानजींना आपला गुरु मानते. बाली पर्यटनाचा लोगो पाहिल्यास त्यात प्राचीन हिंदू कथांचा संपूर्ण समावेश केलेला दिसेल. बँगडोंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडोनेशियामध्ये खूप प्रसिद्ध आहे ज्याचा लोगो भगवान गणेशावर आधारित आहे.
नोटेवर गणेशजी का आहे?
असे म्हणतात की काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि तिथल्या राष्ट्रीय आर्थिक विचारवंतांनी खूप विचार करून २० हजार रुपयांची नवी नोट जारी केली आणि त्यावर श्रीगणेशाचे चित्र छापण्यात आले. तेव्हापासून तिथली अर्थव्यवस्था मजबूत झाली असा लोकांचा विश्वास आहे.
इंडोनेशियन सरकार अधिकृतपणे सहा धर्मांना मान्यता देते. इस्लाम, प्रोटेस्टंट, रोमन कॅथलिक, हिंदू, बौद्ध आणि कन्फ्यूशियन धर्म. या देशातील केवळ १.७ टक्के लोकसंख्या हिंदू आहे. तरीसुद्धा, देशाला हिंदू धर्माचा सुंदर इतिहास आहे आणि त्याचबरोबर धार्मिक सौहार्द ही टिकून आहे.