नोबेल सन्मान विजेते मोहम्मद युनूस यांनी ८ ऑगस्ट ला बांगलादेशातील हंगामी सरकारच्या प्रमुखपदाची शपथ घेतली. राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान बंगभवन या प्रेसिडेन्शियल पॅलेस येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित सोहळ्यात ८४ वर्षीय मोहम्मद युनूस यांना बांगलादेशाचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी प्रमुखपदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यानंतर नोबेल विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे हंगामी पंतप्रधान बनले आहेत.
शेख हसीना यांनी देशातील वाढती अराजकता पाहून पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि तेथून परांगदा होत भारतात आश्रय घेतला. त्यामुळे देशातील स्थिती सावरण्यासाठी अर्थतज्ज्ञ आणि ज्येष्ठ नेते मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. युनूस यांना २००६ मध्ये नोबेल सन्मानाने गौरविण्यात आले होते.
दरम्यान, दुबईहून परतल्यानंतर ढाका विमानतळावरील पत्रकार परिषदेत बोलताना युनूस यांनी हसीना यांच्याविरोधातील आंदोलन यशस्वी केल्याबद्दल तरुणांचे आभार मानले. मोहम्मद युनूस म्हणाले, आपल्याला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्याला स्वातंत्र्याचे संरक्षण करायचे आहे. देश आता आपल्या (तरुणांच्या) हातात आहे. आपल्याला सर्वांच्या आशा आकांक्षानुसार देशाची पुनर्रचना करायची आहे. देशाच्या उभारणीसाठी तुमच्या कौशल्याचा वापर करावा लागेल. तुम्ही स्वातंत्र्य मिळवले आहे.”
आंदोलक विद्यार्थी आणि हिंदू व्यक्तीला मिळाले नव्या मंत्रीमंडळात स्थान
आंदोलक विद्यार्थी आणि हिंदू व्यक्तीला नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये बांगलादेश मधील अराजकतेच्या बातम्या झळकत आहेत. याच पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळात आंदोलक विद्यार्थी आणि हिंदू व्यक्तीला स्थान देत सरकारने सामाजिक एकोप्याचे चित्र स्पष्ट केले आहे.
या अंतरिम सरकारच्या १६ पैकी १३ सल्लागारांनी शपथ घेतली.यामध्ये सालेह उद्दीन अहमद, आसिफ नजरुल, आदिलुर रहमान खान, हसन आरिफ, तौहीद हुसेन, सय्यदा रिजवाना हसन, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम. सखावत हुसेन, सुप्रदीप चकमा, फरीदा अख्तर, बिधान रंजन रॉय, एएफएम खालिद हुसैन, नूरजहाँ बेगम, शर्मीन मुर्शिद, मो. नाहिद इस्लाम (विद्यार्थी प्रतिनिधी), आसिफ महमूद साजीब भुईया (विद्यार्थी प्रतिनिधी) आणि फारुकी आझम यांचा समावेश आहे.