निवडणूकीच्या धुमश्चक्रीत नेतेमंडळी 'अशी' घेत आहेत आरोग्याची काळजी

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 16 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

लोकसभा निवडणूक आता तिसऱ्या टप्प्यात आलेली असताना प्रचार शिगेला पोचला आहे. एप्रिल मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात होणाऱ्या सभांसाठी मातब्बर नेते फिरताहेत. आहाराबाबत सजगता बाळगत नेते प्रचारसभा घेत आहेत.

योग्य आहार, भरपूर पाणी पिणे आणि जमेल तेवढी झोप घेणे याची सांगड घालत नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराचा धडाका लावला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे एकेका दिवशी किमान चार सभा, मेळावे पत्रपरिषदा घेत आहेत.

त्या त्या गावी मुक्काम करून सभेनंतर महत्त्वाच्या मंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी फिरत आहेत. ते आहाराबाबत अत्यंत जागरुक आहेत. ते मोजकेच पदार्थ घेतात.

प्रचारादरम्यान कुटुंबातील एक व्यक्ती त्यांच्या समवेत असते. अनेकदा पत्नी रश्मी असतात, कधी धाकटा मुलगा तेजस तर कधी सचिव मिलिंद नार्वेकर हे सोबत असतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रचाराच्या दिवसात तेलकट पदार्थ घेण्याचे टाळतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सदैव सज्ज असतात. एकेका ठिकाणी ठाण मांडून प्रश्‍न निकाली काढतात आणि वादावर तोडगा काढतात. ते कोल्हापूर येथे दोन दिवस मुक्कामी होते.

राज्यभर प्रचार करत असतानाही मुख्यमंत्री शिंदे मध्येच मुंबई ठाण्याचा दौराही करतात. रात्री सभा घेतात व त्यानंतरही लोकांना भेटतात. या काळात ते थोडाफार आहार करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला तीन ते पाच सभा घेतात.

सध्या ते केवळ एकवेळ जेवतात.न्याहारी भरपूर घेतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. सकाळी सात वाजता संपर्क दौरा सुरु होतो. बारामतीतून वर्धा ,अकोला अशा जागी सभा घेऊन परत येतात.

या नेत्यांच्या दिमतीला विमाने, वाहने हजर आहेत. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अतिश्रम आणि उन्हामुळे चक्कर आली. मात्र त्यांनी काही वेळातच भाषण देऊन प्रचारातील उत्साह दाखवून दिला. चाळीसच्या आसपास तापमान असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.