पाकिस्तानी सुपरस्टार आणि दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण करणारा अभिनेता फवाद खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, फवाद लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असून अभिनेत्री वाणी कपूरबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार या सिनेमाचं शीर्षक अजून ठरलं नसून याचं चित्रीकरण युकेमध्ये पार पडणार आहे. हा एक रॉमकॉम सिनेमा असून आरती बागडी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. फवाद हा मार्व्हल युनिव्हर्सचा देखील एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आणि या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच दक्षिण आशियातील सगळ्यात लोकप्रिय कलाकारांपैकी फवाद एक कलाकार असल्यामुळे या सिनेमासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. सिनेमाविषयीचे डिटेल्स अजून उघड करण्यात आले नसून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.
फवादने २००७ साली रिलीज झालेल्या खूबसूरत या बॉलिवूड सिनेमातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमात त्याने अभिनेत्री सोनम कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा रेखा यांच्या गाजलेल्या 'खूबसूरत' सिनेमाचा रिमेक होता. त्यानंतर फवादने 'कपूर अँड सन्स' या सिनेमात काम केलं. त्याचा हा सिनेमाही खूप गाजला. यातील त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका होत्या.
फवादला भारतात खरी प्रसिद्धी मिळाली ती करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या सिनेमामुळे. अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्या गाजलेल्या या सिनेमात फवादने डीजे अली ही छोटीशी भूमिका साकारली होती. पण या लहान भूमिकेतही तो भाव खाऊन गेला. पण त्यानंतर उरी हल्ल्याच्या निषेधार्थ निर्माता संघटनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारतात येऊन काम करण्यावर बंदी घातली त्यामुळे बराच काळ फवादने कोणत्याच बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं नव्हतं.
फवादच्या काही मालिकाही भारतात लोकप्रिय आहेत. जिंदगी गुलजार है, हमसफर या त्याच्या पाकिस्तानी मालिका भारतातही लोकप्रिय ठरल्या होत्या. तर वाणी कपूरने आतापर्यंत 'शुद्ध देसी रोमान्स', 'बेफिक्रे', 'वॉर', 'शमशेरा' या सिनेमांमध्ये काम केला आहे.