प्रतिष्ठित लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 5 Months ago
शाहरुख खान
शाहरुख खान

 

अभिनेता शाहरुख खानचा २०२४ सालच्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवारी, महोत्सवाच्या आयोजकांनी ही बातमी शेअर केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील शाहरुखच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शाहरुखला 10 ऑगस्ट रोजी ओपन-एअर व्हेन्यू पियाझा ग्रांडे येथे हा पुरस्कार दिला जाईल. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा त्यांचा सर्वात प्रतिष्ठित चित्रपट देखील महोत्सवादरम्यान प्रदर्शित केला जाणार आहे.

या सन्मानाबद्दल बोलताना, जिओना ए. नाझारो, आर्टिस्टिक डायरेक्टर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "शाहरुख खानसारख्या जिवंत दिग्गजाचे लोकार्नो येथे स्वागत करणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे! भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान अभूतपूर्व आहे. खान एक धाडसी कलाकार आहेत ज्यांनी प्रेक्षकांशी कधीही संपर्क गमावला नाही, त्यांचे चाहते त्यांच्याकडून ज्या अपेक्षा करतात त्या ते देण्यास तयार असतात. अतिशय आधुनिक आणि नम्र कलाकार असलेले शाहरुख खान आपल्या काळातील एक दंतकथा आहे."

२०२३ हे वर्ष शाहरुख साठी खूप महत्त्वाचं होतं. या वर्षात त्याचे रिलीज झालेले पठाण, जवान आणि डंकी हे सिनेमे सुपरहिट झाले. या यशाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखला मिळालेला हा पुरस्कार खूप महत्त्वाचा ठरतो.
शाहरुख आता लवकरच 'किंग' या त्याच्या आगामी सिनेमावर काम करतो आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये किंग या आगामी सिनेमाची स्क्रिप्ट एका बाजूला ठेवलेली अनेक चाहत्यांनी पाहिली होती. या सिनेमात त्याची मुलगी आणि अभिनेत्री सुहाना सुद्धा काम करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुजॉय घोष या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

सोशल मीडियावर शाहरुखवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अनेकांनी कमेंट्स करत शाहरुखचं या पुरस्कारासाठी अभिनंदन केलं आहे. या पुरस्कारामुळे शाहरुखच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेलाय.