कलम ३७० हटवून मोदींनी देशातील दहशतवाद संपवला - अमित शाह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 13 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भाजपला देशातील जनतेने दहा वर्षांची सेवा करण्यास संधी दिली. या काळात देशातील दहशतवाद संपविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ३७० कलम रद्द करण्यास काँग्रेसने विरोध केला. काश्मीर देशासाठी अभिमानाचा असताना काँग्रेसवाल्यांना तो नको आहे, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी हुक्केरी ) येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

आपल्या २६ मिनिटांच्या भाषणात शहा यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. तब्बल १२ मिनिटे त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. अमित शहा म्हणाले, ‘काश्मीर आपले असतानाही काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे म्हणतात की, कर्नाटकात व राजस्थानात काश्मीरचा विषय कशासाठी? काश्मीर हा देशासाठी अस्मितेचा विषय आहे. कर्नाटक, राजस्थान नव्हे, तर चिक्कोडीतील युवकही काश्मीरसाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. काँग्रेस केवळ विशिष्ट मतांसाठी राजकारण करीत आहे.

आतापर्यंत केवळ एका गटासाठीच त्यांनी देशाची सत्ता चालविली. ७० वर्षांत केवळ काश्मीरमधील ३७० कलमाचा वापर करून घेतला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी हे कलम रद्द करण्याचे त्‍यांनी धाडस केले. या निर्णयावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे म्हटले होते. कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीर किती शांत आहे, हे देश पाहत आहे.’

भाजप सरकारच्या आधी मनमोहन सिंह यांच्या सरकारपर्यंत देशात कुठेही व कधीही बॉम्बस्फोट व्हायचे. आता दहा वर्षांत हे सर्व बंद झाले आहे. जशास तसे उत्तर दिले जात असल्याने कुठेही अशांतता नाही. पीएफआयवर बंदी घातली असताना त्याच पीएफआयचे समर्थन काँग्रेसचे नेते करीत आहेत. काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर आल्यावर लागलीच अशा कारवाया सुरू झाल्या. त्यातूनच बंगळूरमध्ये बॉम्बस्फोट होऊ लागले. इतके होऊनही काँग्रेस नेते याला ‘सिलिंडर स्फोट’ म्हणतात. एनआयएने चौकशी केल्यावर सगळे पुढे आले आहे. अयोध्येतील राम मंदिर काँग्रेसवाल्यांना नको होते. म्हणूनच निमंत्रण देऊनही त्यांचे नेते तिकडे आले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

नेहा हिरेमठ हत्येच्या संदर्भात संताप व्यक्त करताना शहा म्हणाले, धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकून त्याला जुमानले नसल्याने युवतीचा खून करण्यात आला. कर्नाटकातील सरकारने याची चौकशी केली नाही तर ही चौकशी सीबीआयला द्यावी. यामध्ये सर्व सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.

व्यासपीठावर उमेदवार अण्णासाहेब जोल्ले, माजी खासदार रमेश कत्ती, आमदार शशिकला जोल्ले, आमदार निखिल कत्ती, खासदार इराण्णा कडाडी, राजेंद्र पाटील, पी. एच. पुजारी, आमदार दुर्योधन ऐहोळे, बसवराज हुंदरी, मारुती अष्टगी, बाळासाहेब वड्डर, महांतेश कवटगीमठ, चंद्रशेखर कवटगी, सच्चिदानंद खोत, सतीश आप्पाजीगोळ, संजय शिरकोळी, वृषभ जैन, सविता सावंत, राचय्या हिरेमठ, रामचंद्र जोशी, गुरुराज कुलकर्णी, राजेश नेर्ली, आदी उपस्थित होते.

देश तिसऱ्या क्रमांकांवर येईल
काँग्रेसने राज्याला पुन्हा मागे नेले आहे. दहा वर्षांपूर्वी जगात ११ व्या क्रमांकावर असलेला देश आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यास देश तिसऱ्या क्रमांकांवर जाईल. त्यासाठी चिक्कोडीत भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांना मते देऊन तिसऱ्यांदा मोदी यांना साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.