नागरिकत्व प्रमाणपत्र वितरणाचा शुभारंभ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 5 Months ago
अजय कुमार भल्ला सीएए प्रमाणपत्र प्रदान करताना
अजय कुमार भल्ला सीएए प्रमाणपत्र प्रदान करताना

 

केंद्र सरकारकडून देशभरात लोकसभा निवडणुका सुरु असतानाच नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात १४ लोकांना ही प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या नव्या कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र कोणाला मिळालं? जाणून घ्या. 


केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीएएची प्रमाणपत्रांचं वाटप सुरु झालं असून बुधवारी पहिल्या टप्प्यात १४ जणांना ही प्रमाणपत्रे देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत या प्रमाणपत्रांचं वाटप केलं. दोन महिन्यांपूर्वी गृहमंत्रालयानं सीएए कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचं नोटिफिकेशन काढलं होतं. प्रमाणपत्रे वाटप झाल्यानंतर गृहसचिवांनी लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं. तसेच या कायद्यातील महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या.

सन २०१९ मध्ये हा कायदा संसदेत मंजूर झाला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. या कायद्यामुळं पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या भारताशेजारील मुस्लिम राष्ट्रांमधून जे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक भारतात दाखल झाले आहेत. त्यांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व प्रदान केलं जाणार आहे. यामध्ये हे लोक ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात वास्तव्यास असणं आवश्यक आहे. या कायद्यात ही देखील तरतूद आहे की, जर यातील कोणत्या नियमाचं उल्लंघन झालं तर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाच्या कार्डधारकांची नोंदणी रद्द केली जाईल.

काय म्हणाले गृहमंत्री अमित शाह
 
 
 
याविषयी ट्वीट करत अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी देशाने बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान मोदींमुळे हे वचन पूर्ण झाले. शहा यांनी या सर्व निर्वासितांना आश्वासन दिले की मोदी सरकार CAA द्वारे प्रत्येक निर्वासिताला भारतीय नागरिकत्व देईल.