आज पहाटे पासून राज्यातील अनेक शहरांना पावसाचा फटका बसला. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाऊस झाला. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातील आंबेडकर रोड या ठिकाणी दुकानांत पाणी शिरल्यामुळे नुकसान झालं आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
किल्ले रायगडावर ढग फुटी प्रमाणे पाऊस-
रविवारी संध्याकाळी किल्ले रायगडावर ढग फुटी प्रमाणे पाऊस झाला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. पर्यटकांना अडचणीत येत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्यात आली.
रेल्वेसेवा विस्कळीत
मुंबईत रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. केवळ ठाणे ते कल्याण या ठिकाणी सेवा सुरू आहे. मागील एक तासापासून सेवा बंद आहे. कर्जत, कसाऱ्याकडून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा फक्त ठाण्यापर्यंतच सुरू आहे. कर्जत बदलापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती-
रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत. हवामान विभागाने आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईतील स्थिती-
मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण मुंबईत पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. भांडुप रेल्वे स्थानक पाण्याखाली गेलं असून, सीएसएमटीवरून ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे आणि दिवा स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग आणि अलिबागमधील स्थिती-
मुंबई-गोवा महामार्ग ठप्प आहे. कुडाळ पावशी येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद आहे. अलिबाग तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून, घरातील वस्तूंचं नुकसान झालं आहे.
३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद -
मुंबईत आज सकाळी १ ते सकाळी ७ या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. काही सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
विदर्भातील स्थिती-
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.