पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गगनयान मोहिमेवर पाठवल्या जाणाऱ्या ४ अंतराळवीरांची जगाला ओळख करून दिली. तिरुअनंतपुरम येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींनी आज ४ अंतराळवीरांची भेट घेतलीय. अंतराळवीर म्हणून ग्रुप कमांडर प्रशांत बालकृष्णन नायर,अंगद प्रताप, अजित कृष्णन, विंग कमांडर शुभांशू शुक्ला हे अंतराळात जातील. हे चारही भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक आहेत. या मोहिमेसाठी चौघांनी रशियाला जाऊन प्रशिक्षण घेतले आहे. सध्या हे चौघे अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत.
या ४ अंतराळवीरांची ओळख देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "प्रत्येकाने उभे राहून आमच्या अंतराळवीरांना अभिवादन करावे, अशी माझी इच्छा आहे." "आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आहोत. काही काळापूर्वी देशाला पहिल्यांदाच आपल्या ४ गगनयान प्रवाशांची ओळख झाली. ही फक्त ४ नावे आणि ४ व्यक्ती नाहीत तर १४० कोटी आकांक्षा अवकाशात घेऊन जाणाऱ्या ४ शक्ती असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
प्रशांत बालाकृष्णन नायर
ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर केरळचे आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर (४७) यांनी कुवेतमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलंय. त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA)मधून बॅचलर डिग्री घेतलीय. त्यावेळी उत्कृष्ट कामगिरी करत 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' मिळवलाय. १९९९ मध्ये ते हवाई दलात कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू झाले. पायलट म्हणून त्यांनी सुखोई युद्धविमानही उडवलंय.
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन यांचा जन्म १९ एप्रिल १९८२ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ते एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना वायुसेना अकादमीमध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक आणि सन्मानाची तलवार मिळालीय. २१ जून २००३ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि चाचणी पायलट आहेत. त्यांना अंदाजे २९०० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Dornier, An-32 अशी विमाने उडवली आहेत. ते DSSC, वेलिंग्टनचा माजी विद्यार्थी देखील आहेत.
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांचा जन्म १७ जुलै १९८२ मध्ये प्रयागराज येथे झाला होता. ते एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. ते १८ डिसेंबर २००४ रोजी भारतीय वायुसेनेत लढाऊ विभागात नियुक्त झालेत. ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि चाचणी पायलट आहेत. त्यांच्याकडे सुमारे २००० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, An-32 अशी अनेक प्रकारची विमाने उडवलीत.
विंग कमांडर शुभांशू शुक्ला
विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांचा जन्म यूपी येथील लखनौ मध्ये १० ऑक्टोबर १९८५ रोजी झाला होता. ते एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत आणि १७ जून २००६ रोजी त्यांची नियुक्ती भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत झाली होती. ते एक फायटर कॉम्बॅट लीडर आहेत. त्यांच्याकडे अंदाजे २००० तासांच्या उड्डाणाचा अनुभव असून ते चाचणी पायलट आहेत. त्यांनी Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, An-32 अशी विविध विमाने उडवली आहेत.
गगनयान मिशन काय आहे?
भारताची अशी ही पहिलीच अंतराळ मोहीम असणार आहे. यात अंतराळवीरांना काही काळ कमी कक्षेत अंतराळात नेले जाईल. गगनयान मिशनला २०२५ ला लॉन्च केलं जाईल आणि या अंतर्गत दोन ते तीन अंतराळवीरांना ४०० किलोमीटरच्या निम्न कक्षेतील अंतराळात पाठवलं जाईल. दोन ते तीन दिवस अंतराळात घालवल्यानंतर त्यांना पुन्हा हिंद महासागरात सुरक्षितपणे समुद्राखाली उतरवले जाणार आहे. या अंतर्गत हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून या वर्षात मिशनशी संबंधित अनेक चाचणी उड्डाणे पूर्ण होणार आहेत.
कठोर चाचण्यांनंतर अंतराळवीरांची निवड
'गगनयान'साठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन पी. बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर एस. शुक्ला हे चारही अंतराळवीर विशेष मोहिमेसाठी पाठविले जाणारे भारतीय हवाई दलाचे वैमानिक आहेत. देशातील सर्व प्रकारच्या लढाऊ विमानांतून या चौघांनी उड्डाण केलेले असून, सर्व लढाऊ विमानांची वैशिष्ट्ये आणि उणिवा त्यांना चांगल्या माहीत आहेत. म्हणूनच गगनयान अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी या चौघांची निवड करण्यात आली.
या चौघांचे रशियात प्रशिक्षण झालेले आहे. सध्या बंगळूरमधील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. गगनयान मोहिमेसाठी शेकडो वैमानिकांच्या चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर १२ जणांची निवड प्राथमिक पातळीवर करण्यात आली. 'इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन' (आयएएम) कडून ही निवड झाली. निवड प्रक्रियेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर 'इस्रो' आणि हवाई दलाने अंतिम टप्प्यात या चार वैमानिकांची निवड मोहिमेसाठी केली.
प्रशिक्षणाचा प्रवास
■ प्राथमिक प्रशिक्षणासाठी या चौघांना २०२० च्या सुरुवातीला रशियाला पाठविले
■ परतल्यावर चौघांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.
■ 'इस्रो'च्या 'ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर' (एचएसएफसी) मध्ये अनेक प्रकारच्या
■ सिम्युलेटरवर हे अंतराळवीर सराव करीत आहेत.
■ 'इस्रो'कडून 'क्रू-मॉडेल'ची अति उंचावर उतरण्याची चाचणी.
■ गगनयान पृथ्वीवर उतरल्यानंतर समुद्रातून ते बाहेर काढण्यासाठी भारतीय नौदल आणि 'इस्रो' 'सर्कायव्हल' चाचण्या घेत आहे.
अशी आहे भारताची गगनयान मोहीम
■ पहिली मानवी अंतराळ मोहीम, २०२४-२५ मध्ये ती प्रत्यक्षात येणार
■ या मोहिमेत तीन अंतराळवीर पृथ्वीपासून ४०० किलोमीटरवरील कक्षेत तीन
■ दिवस यानातून परिभ्रमण करणार आहेत