दोन दिवसांपूर्वी सिंगापूर आणि हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा नियामकांनी गुणवत्तेच्या चिंतेमुळे MDH आणि Everest या भारतीय ब्रँडच्या काही मसाल्यांवर बंदी घातली आहे. हाँगकाँगच्या फूड रेग्युलेटर सेंटर फॉर फूड सेफ्टी (सीएफएस) ने सांगितले होते की, या मसाल्यांमध्ये कीटकनाशक, इथिलीन ऑक्साईड असते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका असतो.
दरम्यान या प्रकरणी भारत सरकारही गंभीर झाले असून, त्यांनी सिंगापूर आणि हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा नियामकांकडून या प्रकरणाचा तपशील मागितला आहे. एका सरकारी सूत्राने सांगितले की, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशभरातील MDH आणि एव्हरेस्टसह सर्व ब्रँडच्या मसाल्याच्या पावडरचे नमुने घेणे सुरू केले आहे. असे असले तरी FSSAI निर्यात केलेल्या मसाल्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवत नाही.
सरकारी सूत्रांनी सांगितले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारे FSSAI, आता देशांतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या मसाल्यांचा दर्जा तपासणार आहे. देशातील सर्व अन्न आयुक्तांना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान देशांतर्गत बाजारातील मसाल्यांचे नमुने गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीन ते चार दिवसांत देशातील सर्व मसाला उत्पादक युनिटमधून नमुने गोळा केले जातील. केवळ एमडीएच आणि एव्हरेस्टच नव्हे तर सर्व मसाल्यांच्या कंपन्यांकडून नमुने घेतले जातील. त्यानंतर सुमारे 20 दिवसांनी प्रयोगशाळेतून अहवाल येईल.
भारत हा जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार देश आहे. 2022-23 आर्थिक वर्षात, देशातून जवळपास 32,000 कोटी रुपयांच्या मसाल्यांची निर्यात झाली आहे. भारतातून मिरची, जिरे, मसाला तेल आणि ओलिओरेसिन, हळद, कढीपत्ता आणि वेलची हे प्रमुख मसाले निर्यात केले जातात.