शहिद अब्दुल हमीद यांच्यावरील पुस्तकाचे सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते प्रकाशन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 21 d ago
अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मोहन भागवत
अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना मोहन भागवत

 

वाराणसी

परमवीरचक्र विजेते शहिद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त आज (१ जुलै) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हमीद यांच्या गाझीपूर येथील घरी भेट दिली. यावेळी त्यांनी अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी  'मेरे पापा परम वीर' या पुस्तकाचे प्रकाशनही केले. 

यावेळी कॅप्टन मकसूद गाझीपुरी यांनी प्रकाशित केलेल्या भारत का मुस्लिम पुस्तकाचेही त्यांनी मंचावरून विमोचन केले. कॅप्टन मकसूद हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या ते अध्यक्षस्थानी होते.
 

डॉ रामचंद्रन श्रीनिवासन यांनी हे पुस्तक लिहिले आहेअब्दुल हमीद यांचा मोठा मुलगा जैनुल हसन हे माजी सैनिक आहे. शहीद होण्यापूर्वी वडिलांकडून जैनुल हसन यांनी ऐकलेले किस्से आणि युद्धक्षेत्रातील कथांवर आधारित हे पुस्तक आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सरसंघचालक भागवत यांना पुस्तक प्रकाशन करण्याची विनंती केली होती. भागवत यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याला आनंदाने समंती दिली होती. 

कार्यक्रमाचे निमंत्रक संतोष कुमार सिंह यादव म्हणाले की, जुलै २०२३ मध्ये हथियाराम मठाच्या भेटीदरम्यान, जैनुल हसन आणि त्यांच्या कुटुंबाने आरएसएस प्रमुखांना पुस्तक् प्रकाशन करण्याची विनंती केली होती. त्यामुळे अब्दुल हमीद यांच्या कुटुंबीयांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी संघ प्रमुख आले होते.
 
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानंतर, आरएसएस प्रमुख आरएसएस कार्यकर्त्याच्या घरी भेट देतील. मिर्झापूरला रवाना होण्यापूर्वी तेथे धार्मिक कार्यात भाग घेतील. मिर्झापूरमध्ये ते देवराह बाबा आश्रमाला भेट देणार आहेत.

धामुपूर येथील अब्दुल हमीद यांच्या मूळ गावात होणाऱ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या व्यवस्थेत व्यस्त असलेल्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांच्या कार्यक्रमात राजकारण किंवा संघटनात्मक कार्यक्रमाचा समावेश नाही. मात्र, भागवत गाझीपूरमध्ये सुमारे २००० लोकांच्या मेळाव्याला संबोधित करणार असल्याने, नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालांवर ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काही भाष्य करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
कोण होते अब्दुल हमीद?
कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद इद्रिशी पीव्हीसी हे  भारतीय सैनिक होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान, परमवीर चक्र मरणोत्तर देण्यात आला.

हमीद डिसेंबर १९५४मध्ये सैन्यात दाखल झाले. त्यांची नियुक्ती ग्रेनेडियर्स रेजिमेंटच्या ४थ्या बटालियनमध्ये झाली. चीन-भारत युद्धादरम्यान, त्यांच्या बटालियनने चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी विरुद्ध नामका चूच्या लढाईत भाग घेतला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांच्या ४ ग्रेनेडियर्स बटालियनला खेम करण - भिखीविंड मार्गावरील चिमा गावाजवळील एक व्यूहात्मक जागेचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली गेली. ९-१० सप्टेंबर ला झालेल्या असल उत्तरच्या लढाईत हमीदने आठ पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले आणि नवव्या रणगाड्याचा धुव्वा उडवत असताना त्यांना वीरमरण आले.