आपल्या राजकीय भूमिकेविषयी मुस्लीम समुदायाने आत्मपरीक्षण करावे - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 12 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

एका खासगी वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मुस्लीम समाजाविषयी विस्तृतपणे टिप्पणी केली. इस्लामविरोधी किंवा मुस्लीमविरोधी नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. या मुलाखतीत त्यांनी मुस्लिमांशी संबंधित सामाजिक आणि राजकीय बाबींवर पहिल्यांदाच भाष्य केले.  

"मी याविषयी पहिल्यांदाच व्यक्त होत आहे.  मुस्लिम समाजाने आत्मपरीक्षण करायला हवं असं मला वाटतं... 'सत्तेत कोण येईल आणि कुणाचा पायउतार होईल, हे आम्हीच ठरवणार' असा विचार करत राहिलात तर तुम्ही आपल्या मुलांचे भविष्य खराब करतील.", असा सल्लेवजा इशारा त्यांनी यावेळी दिला.  

ते पुढे म्हणाले, "आखाती देशांमध्ये मला आणि सर्व भारतीयांना खूप आदर मिळतो. ते म्हणाले, "सौदी अरेबियाने त्यांच्या अभ्यासक्रमात योगाचा समावेश केला आहे. मी जेव्हा या देशांमध्ये जातो तेव्हा तेथील श्रीमंत आणि महत्त्वाच्या व्यक्ती मला योगाबद्दल आवर्जून विचारतात. कोणी म्हणतो की माझी पत्नी योग शिकण्यासाठी एक महिन्यासाठी भारतात जाते, कोणी मला योग शिकण्याची औपचारिक पद्धतीविषयी विचारतो. मात्र भारतामध्ये मात्र योगाला मुस्लिमविरोधी म्हटले जाते. ही दुर्दैवी बाब आहे."

तुम्हाला मुस्लीम विरोधी म्हटले जाते याविषयी काय वाटते असे विचारले असता पंतप्रधान मोदी म्हणाले, "आम्ही आणि व्यक्तिश: मी सुद्धा इस्लामविरोधी किंवा मुस्लीमविरोधी नाही. आम्ही विरोधी असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जाते, कारण त्यामुळे विरोधक मुस्लिमांसाठी काहीही न करता त्यांचे मित्र असल्याचा दावा करतात. त्यामुळे फायद्यासाठी त्यांनी हे भयाचे वातावरण बनवले आहे."

ते पुढे म्हणाले, "पण मुस्लीम समाज हुशार आहे. मी जेव्हा तीन तलाक सारख्या प्रथा संपवतो तेव्हा मुस्लीम महिलांना मनापासून वाटते हा माणूस प्रामाणिक आहे. मी जेव्हा त्यांना आयुष्यमान कार्ड, लसीकरण देतो तेव्हा हा समाज म्हणतो की हा माणूस खरा हे, हा अजिबात भेदभाव करत नाही." 

ते पुढे म्हणाले, " याने गर्भगळीत होऊन विरोधक भय पसरवतात की मोदी सत्तेवर आले तर मुस्लिमांचे वाईट होईल, अशी भीती मुस्लिमांमध्ये तयार केली जाते. त्यामुळे मी मुस्लिमांमधील सुशिक्षितांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन करतो."

ते पुढे म्हणाले, " मी दोन दशकांहून अधिक काळापासून आधी राज्याचा आणि आता देशाचा प्रमुख म्हणून काम करत आहे. गुजरातला १९व्या शतकापासून हिंदू मुस्लीम दंगलींचा इतिहास आहे. मात्र २००२ नंतर तिथे एकही दंगल घडलेली नाही. विचार करा याचे कारण काय असेल?"

मुस्लीम समाजाला आवाहन करत पंतप्रधान पुढे म्हणाले, "देश प्रगतीपथावर असताना तुम्ही मागे का याचा विचार करा. काँग्रेसच्या राजवटीत मुस्लीम समाजाला सरकारी योजनांचा लाभ का मिळाला नाही याचाही विचार करा. कोणत्याही समाजाने (एकाच पक्षीय विचाराचे) मानसिक गुलाम व्हावे अशी माझी इच्छा नाही."

मुस्लीम समुदायाला साद घालत पंतप्रधान मोदी म्हणाले, "मुस्लिमांनी भाजपला आंधळेपणाने विरोध करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांची कार्यप्रणाली समजून घ्यावी. पक्षाच्या बैठकांमध्ये सामील व्हा, गटागटाने पक्षकार्यालयाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद करा. मी तर हे म्हणेन की तुम्ही या आणि भाजपचे कार्यालय काबीज करा."

निवडणूक प्रचारामध्ये यापूर्वीही पंतप्रधानांकडून मुस्लीम समुदायाचा उल्लेख
लोकसभेच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींनी मुस्लीम समाजावर अनेकवेळा भाष्य केले आहे. सीतापूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान म्हणाले होते, "केंद्र सरकारच्या सर्व योजनांने मुस्लिम समाजासह सर्वजण लाभार्थी आहेत. पीएम आवास योजना, नळजोड योजना, उज्ज्वला गॅस योजना यांसारख्या सर्व योजना कोणत्याही भेदभावाविना सर्वांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत."

ते पुढे म्हणाले होते, "मुस्लीम समाजालाही कळून चुकले आहे की काँग्रेस आणि इंडिया आघाडीने त्यांचा केवळ वापर करून घेत आहे. या फसव्या राजकारणातून आणि व्होटबँकेच्या ठेकेदारांकडून   मुस्लीम समाजही स्वतःची सुटका करून घेत आहे. यामुळेच ही व्होट बँक वाचवण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीने डाव खेळायला सुरुवात केली आहे आणि ते मुस्लीम तुष्टीकरणात धन्यता मानत आहेत.  त्यामुळेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले होते, “इंडिया आघाडीने तुष्टीकरणात एक पाऊल पुढे टाकले आहे. जेव्हा राज्यघटना बनवली जात होती तेव्हा'आरक्षण धर्माच्या आधारावर दिले जाणार नाही' यावर एकमत होते.  मात्र इंडिया आघाडी धर्माच्या आधारे आरक्षण देण्यावर ठाम आहे. ते आरक्षण नष्ट करण्याची तयारीच करत आहे."

काँग्रेसवर कर्नाटकमध्ये मागच्या दरवाजाने सरसकट सर्व मुस्लिमांचा समावेश ओबिसी यादीत केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. मुस्लिमांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करत एका रात्रीत एका सहीने सर्व मुस्लिमांना ओबीसी ठरवण्यात आले. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा अधिकार छुप्या आणि बेकायदेशीरपणे काढून घेऊन मुस्लिमांना दिला गेला, असे ते यावेळी म्हणाले होते.

संविधानाचे रक्षण करण्याचे आश्वासन देत मोदी म्हणाले होते,  "जोवर मोदी जिवंत आहे तोवर त्यांना देशाच्या संविधानाशी खेळू देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत धर्माच्या आधारवर आरक्षण देऊ  देणार नाही."

शेवटी ते म्हणाले होते, "एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण मी कुणालाही चोरू देणार नाही. भाजप सर्व योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. 'सबका साथ, सबका विश्वास' हाच आमचा मूलमंत्र आहे."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter