गुजरातमध्ये राष्ट्रीय पक्षांकडून मुस्लिमांकडे दुर्लक्ष?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 12 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गुजरातमधील २६ मतदारसंघांमधून यंदा ३५ मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने या वेळी प्रथमच एकाही मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिलेली नाही. राष्ट्रीय पक्षांपैकी केवळ बहुजन समाज पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला आहे.

मुस्लीमबहुल असलेल्या भरूच मतदारसंघातून दरवेळी काँग्रेसकडून मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. यंदा जागावाटपात हा मतदारसंघ आम आदमी पक्षाकडे गेल्याने मुस्लिम उमेदवार देता आला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहे. दुसऱ्या एका मतदारसंघातून मुस्लिम व्यक्तीला

उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेथे विजयाची शक्यता अजिबातच नसल्याने मुस्लिम समुदायाने हा प्रस्ताव फेटाळला, असा दावाही काँग्रेसच्या नेत्यांनी केला. मागील दोन निवडणुकांमध्ये राज्यातील सर्व जागा जिंकणाऱ्या भाजपनेही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. 

सुरतमधील निवडणूक बिनविरोध झाल्याने आता केवळ २५ जागांसाठी लढत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मतदारसंघ असलेल्या गांधीनगर येथून बहुजन समाज पक्षाने मुस्लिम व्यक्तीला संधी दिली आहे. मागील निवडणुकीत मुस्लिम समुदायातील ४३ व्यक्ती गुजरातेतून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. यंदा ही संख्या कमी झाली आहे. बसपतर्फे उभा असलेला एक उमेदवार वगळता उर्वरित ३४ जण एकतर अपक्ष आहेत, किंवा फार प्रसिद्ध नसलेल्या स्थानिक पक्षांचे उमेदवार आहेत. यापूर्वी अनेकदा

कमिसनेच गुजरातमधून मुस्लीम व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. १९७७ मध्ये एहसान जाफरी आणि अहमद पटेल हे दोघे निवडूनही आले होते. पटेल नंतरही दोन निवडणुका जिंकले. 

गुजरातमधील मुस्लिम उमेदवार
  • सर्वाधिक आठ उमेदवार गांधीनगर मतदारसंघातून रिंगणात
  • जामनगर व नवसारीमधून पाच उमेदवार
  • याशिवाय पाटण, भरूच (प्रत्येकी चार), पोरबंदर आणि खेडा (प्रत्येकी दोन), पूर्व अहमदाबाद, बानसकांठा, जुनागड, पंचमहल आणि साबरकांठा (प्रत्येकी एक) उमेदवार

अनेक जण अपक्ष म्हणून रिंगणात
  • काही जण 'राइट टू रिकॉल पाटर्टी', 'भारतीय जननायक पार्टी', 'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी', 'गरीब कल्याण पार्टी', 'लोग पार्टी' यांच्याकडून उभे.