काश्मीरमध्ये सर्व आघाड्यांवर होत आहेत आश्वासक बदल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 12 d ago
IAS शाह फैसल
IAS शाह फैसल

 

पाच वर्षांपूर्वी म्हणजे ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत कलम ३७० रद्द केले. काश्मीरसाठी ही घटना ऐतिहासिक ठरली. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले. मुळचे काश्मीरचे असलेले आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी 'न्यू इंडिया जंक्शन'च्या अनन्या अवस्थी यांच्याशी बदलत्या काश्मीरविषयी खास संवाद साधला.

काश्मीरच्या विकासाला अधोरेखित करणारी काही उदाहरणे यावेळी फैसल यांनी दिली. ते म्हणाले. "काश्मीरमध्ये आता शांतता आहे, त्यामुळे तरुणांची प्रगतीला चालना मिळत आहे.तब्बल ३५ वर्षांनंतर  जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना मोहरमची मिरवणूक काढता आली. एकेकाळी कुप्रसिद्ध असलेल्या लाल चौकाला आता उत्सवी स्वरूप आले आहे.  आता तिथे लोक एकत्र जमतात आणि उत्सव साजरा करतात."

ते पुढे म्हणाले, "काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया, प्रक्षोभक घोषणाबाजी, दगडफेक यांसारख्या घटना संपुष्टात आल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्याने विकासाची गगनभरारी घेतली आहे. आता काश्मीर पूर्णपणे बदलले आहे. आता खोऱ्यात केवळ सौंदर्य आणि विकासच दिसत आहे."

प्रगतीपथावर आहेत काश्मिरी तरुण
या खास मुलाखतीत शाह फैसल पुढे म्हणाले, "पूर्वी तुम्ही गुगलवर काश्मिरी तरुण सर्च करायचा तेव्हा तुम्हाला दगडफेक, घोषणाबाजी आणि निषेध यांशिवाय काहीच दिसायचे नाही. पण आज काश्मीरची तरुणाई बदलत आहे. तरुण आता शिक्षणाला प्राधान्य देऊ लागले आहेत. ते स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत. काश्मीरमधील अनेकजण आज सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर म्हणून नावारुपाला आले असून, त्यातून ते चांगली कमाई करत आहेत. काश्मीरमध्ये नवीन स्टार्टअप सुरू होत आहेत. अनेक नवीन कॅफेटेरिया इथे उघडली आहेत. कित्येक दशकांनी इथे सिनेमा हॉल सुरू झाले आहेत आणि ते हाऊसफुल्ल आहेत. बदलते काश्मीर आणि बदलती तरुणाई यांची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील." 

काश्मीरमध्ये होत आहे परदेशी गुंतवणूक 
"आता काश्मीरकडे स्वतःचे नवीन औद्योगिक धोरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना काश्मीरमध्ये गुंतवणूक करणे सोपे जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरसोबतच देशामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक होताना आपण पाहात आहोत. काश्मीरमध्ये झालेल्या G-20 शिखर परिषदेत परकीय गुंतवणूकदारांनी काश्मीरमध्ये गुंतवणुकीत प्रचंड स्वारस्य दाखवले. ऐतिहासिकदृष्ट्या काश्मीरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची व्यावसायिक प्रगती होत आहे.सध्या जमिनीवर तिचे तितकेसे प्रतिबिंब दिसत नसले तरी येणाऱ्या काळात ही पायाभरणी काश्मीरला नवीन परिमाण प्राप्त करून देईल", अशा विश्वास फैसल यांनी यावेळी व्यक्त केला. 

आयुष्मान भारत योजना आणि निरोगी काश्मीर
मुलाखतीत शाह फैसल यांनी काश्मीरमधील आरोग्य क्षेत्रातील सुधारणांची माहिती दिली. ते म्हणाले, "आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक काश्मिरीला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळतो. ही काश्मिरींना निरोगी आणि उत्साही राहण्यास मोठी फायदेशीर ठरली आहे. या गोल्डन कार्डमुळे त्यांचे जीवनमान सुधारले आहे. या कार्डमुळे आरोग्य व्यवस्था त्यांच्या खिशात आली आहे."  

ते पुढे सांगतात, "इतर ठिकाणी केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकांनाच (बीपीएल कार्ड असलेल्यांनाच) आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळतो. पण काश्मीरमधील प्रत्येकाकडे या  योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचा विमा आहे. हा सर्वांत महत्त्वाच्या  बदलांपैकी एक आहे. आता काश्मीरमधील लोक घाबरलेले नाहीत. या लाभदायक योजनेमुळे आता त्यांना वेळेवर उपचार मिळू लागले आहेत."

काश्मीरमध्ये वाढत आहे पर्यटन
यावेळी फैसल यांनी काश्मीरमधील वाढत्या पर्यटनाविषयीही भाष्य केले. ते म्हणाले, "काश्मीरमध्ये लोलाब व्हॅली, बँगल्स व्हॅली आणि यासंसारखी इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. इथे आता सामान्य माणूस कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय फिरायला जाऊ शकतो आणि तिथे कुटुंबियांसमवेत मूल्यवान वेळ व्यतीत करू शकतो. काश्मीर अतिशय सुंदर प्रदेश आहे आणि आता परदेशी नागरिकही काश्मीरचा प्रत्येक कानाकोपरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच दरवर्षी काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे."

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरी जनता आनंदात​  
कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील सकारात्मक बदलांविषयी फैसल म्हणाले, "आता इथे कोणालाही विनाकारण ताब्यात घेतले जात नाही. आता दहशतवाद्यांना मोकळे रान नाही की घोषणाबाजी, दगडफेकही होत नाही. एकूणच  आता इथे कायदा आणि सुव्यवस्था यांचे राज्य आहे. आता एकाही काश्मिरी कुटुंबाला निर्वासित व्हावे लागणार नाही आणि हीच बाब काश्मीरी जनतेला अधिक सुखावणारी आहे." 

काश्मीरमधील बदलेल्या प्रशासकिय आणि राजकीय परिस्थितीविषयी शाह फैसल म्हणाले, "आता जम्मू-काश्मीरचा भौगोलिक नकाशा नक्कीच बदलला आहे. मतदारसंघांचे चित्रही बदलले आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा २०१९ अंतर्गत, जम्मू आणि काश्मीर राज्य जम्मू- काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. जम्मू-काश्मीरचे स्वतःचा ध्वज आणि संविधान ही व्यवस्थाही आता संपुष्टात आली आहे."

शाह फैसल शेवटी म्हणाले, "पूर्वी केंद्रातील कोणताही कायदा येथे लागू नव्हता. मात्र आता देशातले सर्व कायदे येथे लागू होतात. बंद आणि दगडफेक आता कुणाला आठवतही नाही. जम्मू-काश्मीरमधून दुहेरी नागरिकत्वही आता रद्द करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांना आता टाळे लागलेले नाहीत. काही भागातील शैक्षणिक संस्थेतील जाळपोळीच्या घटनाही आता थांबल्या आहेत.जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर या प्रदेशाची विकासाच्या मार्गावर घोडदौड सुरू झाली आहे." 

- ओनिका माहेश्वरी

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter