संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची सियाचिनला भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
संरक्षण मंत्री राजनाथसिंह
संरक्षण मंत्री राजनाथसिंह

 

जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी भेट दिली. या भागातील भारताच्या लष्करी तयारीचा आढावा त्यांनी घेतला. काराकोम पर्वतरांगेत २० हजार फूट उंचीवरील सियाचीन ग्लेशियरवर मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात जवानांना संरक्षणमंत्र्यांनी वंदन केले.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशात भारतीय लष्कर सज्जतेला गेल्या आठवड्यात ४० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त राजनाथसिंह आज सियाचीनला आले होते. त्यांच्याबरोबर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हेही होते. सियाचीनमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथे तैनात जवानांशी सिंह यांनी संवाद साधला. त्यांना मिठाई वाटून मनोधैर्य वाढविले.

राजनाथसिंह म्हणाले, की सियाचीनमधील ‘ऑपरेशन मेघदूत’चे यश सर्व भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. जगातील सर्वांत उंचावरील या युद्धभूमीवर आपल्या सैन्याने जो पराक्रम केला, त्याचा आम्हाला अभिमान आहे. जवानांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘देशांच्या सीमांच्या सुरक्षेसाठी तुम्ही सर्व काही पणाला लावण्यास कायम तत्पर असतात. तुमचे देशप्रेम आम्हा सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.’’