एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये 'हा' असतो फरक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 27 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशात सध्या लोकसभा निवडणुका होत आहेत. आतापर्यंत सहा टप्प्यात मतदान झाले आहे. यातच सातव्या आणि शेवटच्या फेरीचे मतदान 1 जून रोजी आहे. गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. अशातच 542 जागांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. मात्र विविध माध्यम वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांद्वारे 1 जून रोजी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केले जातील. देशात कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज या पोलमध्ये सांगितला जाणार आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की एक्झिट पोल काय आहे? मतमोजणीआधीच सरकार कोण स्थापन करणार, याचा दावा यातून कसा काय केला जातो? याचा इतिहास काय आहे? एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक्झिट पोल काय आहे?
एक्झिट पोल हा एक प्रकारचा निवडणूक सर्वेक्षण आहे. मतदानाच्या दिवशी मतदार मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडतो तेव्हा विविध सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांचे लोक तिथे उपस्थित असतात. ते मतदाराला मतदानाबाबत प्रश्न विचारतात. यामध्ये त्यांना विचारले जाते की, त्यांनी कोणाला मतदान केले? अशा प्रकारे प्रत्येक विधानसभेच्या वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरून मतदारांना प्रश्न विचारले जातात.

मतदान संपेपर्यंत अशा प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला जातो. ही आकडेवारी गोळा करून त्यांच्या उत्तरांनुसार जनतेचा मूड काय आहे? याचा अंदाज बांधला जातो. याच गणिताच्या आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे मोजले जाते? पुढे मतदान संपल्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली जाते.

किती लोकांना प्रश्न विचारले जातात?
एक्झिट पोल काढण्यासाठी सर्वेक्षण संस्था किंवा वृत्तवाहिनीचा रिपोर्टर अचानक एखाद्या बूथवर जातात आणि तिथल्या लोकांशी संवाद साधतात. ते कोणाला प्रश्न विचारणार, हे आधीच ठरलेलं नसतं. मतदारांचा योग्य कल ओळखण्यासाठी 30-35 हजार ते एक लाख मतदारांशी संवाद साधून प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्रदेशनिहाय प्रत्येक विभागातील लोकांचा समावेश करण्यात येतो.

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये काय आहे फरक?
ओपिनियन पोल: सर्वेक्षण संस्था निवडणुकीआधी ओपिनियन पोल घेतात आणि त्यात सर्व लोकांचा समावेश केला जातो. मग तो मतदार असो, वा नसो. जनमत चाचण्यांच्या निकालांसाठी, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या अंतर्गत प्रत्येक क्षेत्रात जनता सरकारवर नाराज आहे की, त्यांच्या कामावर समाधानी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

एक्झिट पोल: मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल घेतला जातो, ज्यामध्ये फक्त मतदारांचा समावेश केला जातो. एक्झिट पोलमध्ये फक्त अशाच लोकांना समाविष्ट केले जाते, जे मतदान केल्यानंतर बाहेर पडतात. निर्णायक टप्प्यात एक्झिट पोल होतो. यावरून लोकांनी कोणत्या पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे, याची माहिती जाणून घेतली जाते. मतदान पूर्ण झाल्यानंतरच एक्झिट पोल प्रसारित केले जातात. सातव्या फेरीचे मतदान 1 जून रोजी संपल्यानंतर एक्झिट पोल दाखवले जातील.

काय आहे एक्झिट पोलचा इतिहास?
मिळालेल्या माहितीनुसार, डच समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोल सुरू केला होता. वॉन डॅमने 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिल्यांदा याचा वापर केला. त्यावेळी नेदरलँडमध्ये झालेल्या निवडणुकांबाबत त्यांनी केलेले आकलन अगदी अचूक होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे (IIPU) प्रमुख एरिक डी'कोस्टा यांनी भारतातील एक्झिट पोल सुरू केले होते. 1996 मध्ये एक्झिट पोलची सर्वाधिक चर्चा झाली होती. त्यावेळी दूरदर्शनने सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजला (CSDS) देशभरातील एक्झिट पोल घेण्यास परवानगी दिली होती. 1998 मध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.