लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 12 d ago
लोकसभा निवडणुक
लोकसभा निवडणुक

 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (मंगळवारी) पार पडत असून १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांचा फैसला या टप्प्यात होणार आहे.

राज्यातील बारामती, सांगली, कोल्हापूर, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, माढा, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हातकणंगले या ११ मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. देशात ९३ मतदारसंघांत एकूण १,३५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील २६ पैकी २५ जागांसाठी मतदान होईल. सुरतमध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने याठिकाणी मतदान होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अहमदाबाद येथे मतदान करणार आहेत. एकूण ११ राज्यांतील ९१ जागांबरोबरच दादरा नगर हवेली तसेच दमण-दीव मतदारसंघांसाठीही मंगळवारी मतदान पार पडणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरीमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. मात्र याठिकाणची निवडणूक २५ मे रोजी घेतली जाणार आहे. मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. मात्र बसप उमेदवाराच्या निधनामुळे येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. याठिकाणी मंगळवारी मतदान होणार आहे.

कर्नाटकात चिक्कोडी, बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड, दावणगेरे आणि शिमोगा या मतदारसंघांत मतदान होईल. मध्य प्रदेशात भिंड, भोपाळ, गुणा, ग्वाल्हेर, मोरेना, राजगड, सागर, विदिशा, बैतूल येथे मतदान होईल.

प्रमुख उमेदवार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (गांधीनगर), केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (गुणा), मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (विदिशा), खासदार सुप्रिया सुळे (बारामती), केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (धारवाड), सप नेत्या डिंपल यादव (मैनपुरी), उदयनराजे भोसले (सातारा), नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग).