मुंबईमध्ये रात्री ११ पर्यंत चालली मतदान प्रक्रिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
मतदानासाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगा
मतदानासाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगा

 

राज्यातील अंतिम आणि मुंबईसह १३ ठिकाणच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या संथगतीमुळे सोमवारी रात्री ११ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबईतील अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी ५४.३३वर पाेचली.

मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, नाशिक, दिंडोरी या मतदार संघांत सोमवारी (ता. २०) मतदान झाले. शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया चर्चेत आली ती संथगतीमुळे. मुंबई शहरात संथगतीने मतदान झाल्यामुळे सायंकाळी सहापर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सहानंतर मतदानासाठी निवडणूक यंत्रणेने टोकन दिले होते. टोकन घेतलेल्या मतदारांनी मतदान करण्यासाठी अखेरपर्यंत रांग लावली. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली.

शहरी मतदार मतदार मतदानाकडे पाठ फिरवतो, हा समज फोल ठरवत सोमवारी मुंबईसह ठाणे आणि कल्याणमधील मतदारांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने अनेकांनी मतदान करून कामावर जाण्याला प्राधान्य दिले, मात्र बॅग आणि मोबाइल घेऊन मतदान केंद्रात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने काहीजण मतदान न करताच कामावर गेले. तसेच काही ठिकाणी पिण्याचे पाणी, मंडप नसल्याने ज्येष्ठ नागरिक घरी गेले. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहिल्याने आकडेवारीसही विलंब लागला.

रस्ते खोदकामाने ‘स्ट्राँग रुम’ अंधारात
ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेली यंत्रे ठेवलेल्या ‘स्ट्राँग रूम’ परिसरातील विद्युत प्रवाह खंडित केल्याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. मनाई असतानाही रस्ते खोदकामामुळे हा प्रकार घडला होता. मतदान संपल्यानंतर कासारवडवली येथील ‘स्ट्राँग रूम’मध्ये सर्व मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत येथील वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये, अशी सूचना महावितरणने केली होती.