सत्यासाठी प्राणार्पण करणारे इमाम हुसैन - इतिहास आणि संस्कृती

Story by  Sameer D. Shaikh | Published by  sameer shaikh • 9 Months ago
१९व्या शतकातील मोहरम मिरवणूक
१९व्या शतकातील मोहरम मिरवणूक

 

तब्बल चौदाशे वर्षांपासून एकत्र राहूनही मुस्लिम समाजातील धार्मिक परंपरा, महापुरुष, त्यांचा धार्मिक आणि सामाजिक इतिहास यांच्याविषयी सर्वसामान्यांना फार कमी माहिती असते.  हिंदू-मुस्लिम यांच्यातील अविश्वासाचे आणि संघर्षाचे हे ही एक मह्त्त्वाचे कारण आहे. कोणत्याही मुस्लीम राजाचा उल्लेख झाला की आपल्यासमोर पहिल्यांदा औरंगजेबच येतो. पण चांगली आणि वाईट माणसे सर्व समाजात नेहमीच अस्तित्वात असतात आणि यापुढेही राहतील. मुस्लिमांमध्येही परोपकारी व्यक्ती, महान योद्धे, सत्प्रवृत्त आत्मा आणि  न्यायप्रेमी सम्राट झाले आहेत. एखाद्या समाजातील महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास त्या समाजाविषयी आत्मीयतेला जन्म देतो यात शंका नाही.

इस्लामी कालगणनेला हिजरी सन असे म्हणतात. मोहरम हा हिजरी दिनदर्शिकेतील पहिला महिना. नुकताच हा मोहरमचा महिना सुरु झालाय. इस्लाम धर्मामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्याच्या दहा तारखेला 'यौम-ए-आशुरा' म्हणजे आशुराचा दिवस असं म्हणतात. या महिन्यात विशेषतः आशुऱ्याच्या दिवशी अनेक अनन्यसाधारण घटना घडल्या. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली असे मुस्लीम मानतात. ज्यू धर्मियांचे प्रेषित मोजेस उर्फ मुसा यांना याच दिवशी ईश्वरी ग्रंथ 'तौरात'देण्यात आला आणि याच दिवशी हजरत इसा म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याचे इस्लाम सांगतो.  

आशूरा मुहर्रमचा पवित्र दहावा दिवस म्हणून आणि मुहर्रम हा सृष्टी उत्पत्तीचा महिना म्हणून सुन्नी मुसलमानांना पवित्र वाटतो. इस्लामचे प्रेषित मुहंमद यांनी आपल्या अनुयायांना आशूरा या दिवशी उपवास करण्यास व प्रार्थना करण्यासंबंधी आदेश दिला. या दिवशी स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे, डोळ्यात सुर्मा लावणे, अत्तर-सुगंध लावणे हे श्रेयस्कर असल्याचे सांगितेले आहे. शत्रूंशी शांततेचा तह करणे, सत्संग राखणे, अनाथांना आश्रय देणे व दानधर्म करणे यासंबंधीही त्यांनी आज्ञा केली. प्रेषितांनी आशूराच्या उपवासाची विशेषेकरून महती सांगितलेली आहे.

अशा प्रकारे अनेक सुखद  आणि काही दुःखद घटनांची पार्श्‍वभूमी या महिन्याला आहे. मात्र इस्लामी इतिहासतील एक अतिशय दुर्दैवी आणि हृद्य पिळवटून टाकणारी घटनाही याच महिन्यात घडली. मुहम्मद पैगंबरांचे लहान नातू हजरत इमाम हुसैन यांना त्यांच्या कुटुंबियांसह याच दिवशी इराकमधील करबला या शहरात झालेल्या लढाईत शहीद करण्यात आले. त्यांच्या हुतात्म्याचे स्मरून मुसलमान या महिन्यात विशेषतः पहिले दहा दिवस दुखवटा पाळतात. बहुसंख्य मुसलमान या महिन्यात शुभकार्ये, लग्नसमारंभ इत्यादी टाळतात.

करबलाचा इतिहास 
अरबस्तानात कुरैश नावाचे मोठे घराणे होते. त्या घराण्यात हाशिम आणि उमैया नावाचे दोन पराक्रमी पुरुष होऊन गेले. हाशिम, उमैया काका-पुतणे होते. दोघांच्या नावावरून बनी हाशिम व बनी उमैया अशा दोन शाखा निर्माण झाल्या. (अरबीमध्ये बनी/ बिन याचा अर्थ होतो मुलगा) या पैकी बनी हाशिम शाखेमध्ये हजरत मुहम्मद  यांचा जन्म झाला. त्यांचे जावई हजरत अली हे सुद्धा याच शाखेशी संबंधित होते आणि त्यांची दोन मुले हजरत इमाम हसन व हजरत इमाम हुसैन  अर्थातच याच शाखेचे होते. बनी हाशिम व बनी उमैया या दोन शाखांमध्ये पिढीजात वैर होते.

हजरत मुहम्मद  यांच्या निधनानंतर 'खलिफा'पदी निवडण्यात आलेले हजरत अबू बकर व हजरत उमर  हे दोघेही कुरैश घराण्यातीलच होते, पण त्यांचा बनी हाशिम व बनी उमैया शाखांशी संबंध नव्हता. तिसरे खलिफा हजरत उस्मान  हे बनी उमैया शाखेचे होते. हजरत उस्मान  नंतर बनी हाशिम शाखेचे हजरत अली  यांना बहुसंख्य मुसलमानांनी चौथा खलिफा म्हणून निवडले; परंतु कुरैश घराण्यातील मुआवियाला हा निर्णय मान्य नव्हता. परिणामी वाद सुरू झाला. शेवटी असे ठरले की, सीरियामध्ये व त्याच्या पश्‍चिमेकडील मुस्लिम प्रवेशावर मुआवियाने राज्य करावे आणि पूर्वेकडील भाग हजरत अली  यांच्या अधिपत्याखाली राहावा.

हजरत अली मारले गेले तेव्हा बहुसंख्य मुसलमानांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्र हजरत इमाम हसन  यांना खलिफा म्हणून निवडले; परंतु मुआवियाला ते मान्य नव्हते. इमाम हसन  शांतताप्रिय होते. त्यांना आपापसात सत्तेसाठी युद्ध मुळीच अवडत नव्हते. म्हणून त्यांनी मुआवियाशी तह केला. यात एक अट अशी होती की, मुआवियाच्या मृत्यूनंतर इमाम हसन यांना किंवा त्यांच्या नात्यातील जवळच्या व्यक्तीला खिलाफत मिळावी. हा तह झाल्यानंतर हजरत इमाम हसन केवळ सहा महिने जिवंत राहिले. त्यांना विष देऊन मारण्यात आले, असे समजले जाते. 

इकडे मुआवियाच्या मृत्यूनंतर तहाच्या अटीप्रमाणे खिलाफत हजरत इमाम हसन यांचे बंधू हजरत इमाम हुसैन यांना मिळावयास हवी होती; परंतु मुआवियाने आपल्या जिवंतपणीच अनेकांकडून आपल्या मुलाला अर्थात 'यजीद'ला खलीफा मानू असे वदवून घेतले. आतापर्यंत एकमताने खलीफा पदाची जी निवड होत होती, त्याला मुआवियाने वंशपरंपरागत करून एक नवीन लोकशाहीविरोधी प्रथा पाडली. कारस्थानी यजीदच्या हाती सत्ता आल्यामुळे तो इस्लामी जगाचा खलीफा बनला. अशा पद्धतीने त्याने इमाम हुसैन  यांचा अधिकार हिरावून घेतला.

खलीफा झाल्यानंतर यझिदला हुसेन यांचीच सर्वाधिक भीती वाटत होती. हुसेन हे हजरत अलीचे पुत्र आणि  मुहम्मद पैगंबर यांचे नातू असल्यामुळे साहजिकच यझिदवर या गोष्टींचा नैतिक दबाव होता. हुसेन स्वच्छ चारित्र्याचे होते. शांत स्वभावाचे होते. त्यांच्या व्यक्तीमत्त्वात नम्रता आणि सहनशीलता होती. ते ज्ञानी होते, उदार मनाचेही होते.  त्यांची बरोबरी करू शकेल असा कुणी शूरवीर अरबस्तानमध्ये नव्हता. पण राजकारणातील शाह-कटशाह, छळ-कपट  यांबाबत ते अनभिज्ञ होते. याउलट यझिद या सर्व गोष्टींमध्ये पारंगत होता. त्याने आपले वडील अमीर मुआविया यांच्याकडून मुत्सद्देगिरीचे धडे घेतले होते. त्याच्या टोळीतील सर्वजणच याबाबतीत पारंगत होते. धर्माचा उपयोग ते केवळ स्वार्थासाठी करत. यझिदला ऐशोआरामाची गोडी लागली होती. पापभिरू सत्यवर्ती हुसेन यांना  साधनसुचिता नसलेल्या अशा भोगी व्यक्तींचे नेतृत्व कसे मान्य होईल बरे?  

यझिदने मदिना येथील सुभेदाराला लिहिले की, 'हुसेनकडून माझा खलीफा असणे त्यांना मान्य आहे हे वदवून घे. तशी त्यांच्याकडून शपथ घे.' साहजिकच हुसेन यांनी असे करायला साफ नकार दिला. हुसेन यांच्या नकाराला यझिदने बंड म्हणून बघितले. त्यांच्याशी लढण्यासाठी त्याने संसाधनांची जमवाजमव करायला सुरवात केली. इराकमधील कुफा प्रांतातील रहिवाशांचे हुसेनवर प्रेम होते. ते हुसेन यांना खलीफा बनवण्याच्या बाजूने होते. यझिदला हे कळाले तेव्हा त्याने कुफातील जनतेला आणि नेत्यांना धमकवायला सुरुवात केली. तो त्यांना विविध प्रकारचे त्रास देऊ लागला.  कुफाच्या रहिवाशांनी हुसेन यांच्याकडे निरोप पाठवला. 'तुम्ही कुफाला या आणि आम्हाला या संकटातून मुक्त करा.' हुसेन यांना खलिफाशी म्हणजे इस्लामी राज्याशी बंडखोरी करून रक्त सांडायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. मात्र इकडे कुफामध्ये हुसेन प्रेमींची संख्या वाढू लागली. हुसेन यांना खलिफा करा अशी मागणी करणाऱ्या या लोकांची संख्या वीस हजारांवर जाऊन पोहोचली. त्यांनी  हुसेन यांना  आणखी दोन संदेश पाठवले. मात्र हुसेन यांनी त्यालाही उत्तर दिले नाही. सरतेशेवटी, कुफावासीयांनी  अतिशय विनवणी करणारे पत्र हुसेन यांना लिहिले. त्यामध्ये मुहम्मद पैगंबर आणि इस्लाम यांचे दाखले देत हुसेन यांना मदत करण्यासाठी बोलावले. त्यात आर्जवाच्या सुरात लिहिले होते, 'कयामतच्या दिवशी ईश्वरासमोर आम्ही तुमचे गाऱ्हाणे मांडू. आम्ही ईश्वराला सांगू की आमच्यावर अत्याचार होत असताना हुसैन आमच्या मदतीला आले नाहित. हुसैन, तुम्ही त्यावेळी ईश्वराला काय उत्तर द्याल?'

हे पत्र वाचल्यावर हुसेन यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे हृदय गलबलून गेले. त्यांनी लागलीच कुफा वासियांना आश्वस्त करणारे पत्र लिहिले - "मी लवकरच तुमच्या मदतीला येईन." मुस्लीम नावाच्या आपल्या चुलतभावाकरवी त्यांनी हे पत्र पाठवले. हुसैन यांचे पत्र घेऊन मुस्लीम कुफा येथे पोहोचल्याची बातमी यझिदला कळताच त्याने फा येथे आणखी एक सुभेदार नेमला. त्याचं नाव होतं 'ओबैद बिन-झियाद'. तो अतिशय निर्दयी आणि कुटिल स्वभावाचा मनुष्य होता. पद स्वीकारताच त्याने कुफा येथे एक सभा घेतली. 'यझिदचे नेतृत्व स्वीकारणाऱ्यांवर कृपा होईल, मात्र हुसैनचे नेतृत्व मानणाऱ्यांची संपत्ती जप्त करून त्यांना मृत्युदंड दिला जाईल' असा इशारावजा आदेशच त्याने या सभेतून दिला. या घोषणेने वारेच फिरले. कुफावासीयांची मने भीतीने हादरून गेली. झियादच्या क्रूरतेशी ते चांगलेच परिचित होते. कुफावासियांकडे हुसैन यांचा संदेश घेऊन आली त्यांचे चुलत भाऊ मुस्लीम त्या दिवशी मशिदीत नमाजचे नेतृत्व करत होते. मात्र त्यांच्या मागे एकही कुफावासी नमाजसाठी उभा राहिला नाही. हुसैन यांना पत्र पाठवणाऱ्यांपैकी कुणीही तिथे दिसत नव्हते. मुस्लीम यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने झियाद घेरले. तेव्हा त्याने कुफावासियांना णखी एक घोषणावजा इशारा दिला. 'यझिदला मदत करणार्‍यांना जहागीर दिली जाईल; आणि बंडखोरांना अशी शिक्षा दिली जाईल की त्यांच्यासाठी रडणाराही शिल्लक राहणार नाही.' ही धमकी ऐकून कुफावासीय आणि त्यांचे नेते भयभीत झाले. हळूहळू सगळेच मुस्लिमची साथ सोडू लागले. मुस्लिम एकटे पडले. कसाबसा त्यांनी एका वृद्ध महिलेच्या घरात आसरा घेतला. मात्र त्यांना गाठण्यात आले व तिथेच शहीद करण्यात आले.

हुसेन, त्यांच्या पूज्य वडिलांप्रमाणे, साधूचे साधे जीवन जगण्यासाठी बनवले गेले. राज्याच्या ऐहिक उपभोगासाठी रणांगणात उतरून धार्मिकतेला ते दूषित करू इच्छित नव्हते. आत्मशुद्धी आणि अध्यात्मिक जीवन हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते. कुफा येथे जाऊन खलिफत स्थापन करण्यासाठी ते त्यासाठीच उत्सुक नव्हते. मात्र तिथल्या लोकांच्या दुखाकडेही ते दुर्लक्ष करू शकत नव्हते. युध्द करण्याची मनीषा नसल्यामुळे त्यांनी सोबत सैन्यही घेतले नव्हते. मुठभर सहकारी आणि नातेवाईक यांच्यासह कुफाकडे कूच करत असतानाच 'आपण शहीद होणार असल्याची' जाणीव त्यांना होती. त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितले होते. यावेळी त्यांनी एका स्वप्नाचाही उल्लेख केला. आजोबा मुहम्मद पैगंबर यांनी त्यांना स्वर्गाचे आमंत्रण दिले आहे, हे पडलेले स्वप्न त्यांनी बोलूनही दाखवले. 

यझिद मद्यपी होता, व्यभिचारी होता. इस्लामचे नियम पाळत नव्हता. त्यामुळे हुसैन त्याचे नेतृत्व स्वीकारत नव्हते. यझिद त्यांच्या जीवावर उठला नसता तर त्यांनी आपले आयुष्य शांतपणे मदिनामध्ये व्यतीत केले असते. मात्र  हुसैन यांचे जिवंत असणे यझिदसाठी धोक्याचे होते. खिलाफत ही धार्मिक व्यवस्था असल्यामुळे त्यात नैतिकता महत्त्वाची होती. हुसैन यांचे नैतिक बळ यझिदहून मोठे होते. त्यामुळे हुसैन यांना मार्गातून बाजूला करणे त्याच्यासाठी अत्यंत आवश्यक होते. 

आपली बायका-मुले, काही जवळचे नातेवाईक व थोडेसे सैन्य घेऊन इमाम हुसैन कुफ्काला जाण्यास निघाले. ते मेसोपोटेनियातील युफ्रॅटीस नदीवरील करबला गावी मोहरम महिन्याच्या पहिल्या तारखेला पोहोचले. येथेसुद्धा त्यांचा विरोध करण्यासाठी यजीदने आपले सैन्य पाठविले. सैन्याने हजरत इमाम हुसैन  यांच्या तंबूभोवती वेढा घातला. हजरत इमाम हुसैन  त्यांचे कुटुंबीय व सैन्य यांना पाणीसुद्धा मिळू नये, अशी व्यवस्था यजीदने केली. परिणामी बायका व विशेषतः मुलांचे हाल सुरू झाले. असेच हे सगळे नऊ दिवस सुरु होते.  त्यांचे हाल न पाहवल्यामुळे हजरत इमाम हुसैन  यांनी तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. यजीदला तेही मान्य नव्हते. यजीदच्या सैन्याने त्यांच्यावर स्वारी केली.

नवव्या रात्री हुसेन यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबीयांना समोर बोलावले. त्यांना उद्देशून हुसैन म्हणाले,  'उद्या या युद्धाचा निर्णायक  दिवस असेल. उद्या ही भूमी माझ्या रक्ताने माखणार आहे. तुम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही माझी साथ दिलीत याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो की तो तुम्हाला याचे पुण्य देवो. तुमच्याहून अधिक पुण्यवान आणि श्रेष्ठ वीर या संसारात नसतील. मी तुम्हाला एक प्रेमपूर्वक विनंती करू इच्छितो. आपण संख्येने अगदी नगण्य आहोत. आपल्या वाट्याला हौतात्म्य येणे क्रमप्राप्त आहे. तुमच्यापैकी कोणाला युद्धातून माघार घ्यावी आणि इथून निघून जावे असे वाटत असेल तर त्यांनी अगदी नी:संकोचपणे जावे. पण जाताना आपल्या सोबत एक- एक सहकाऱ्यालाही घेऊन जावे.यझिद केवळ माझ्या रक्ताचा भुकेला आहे.  

यानंतर हुसेन यांनी त्यांच्यासमोर असलेला दिवा विझवला जेणेकरून ज्याला जायचे असेल त्यांना संकोच वाटणार नाही. मात्र त्यांचे वाक्य संपते न संपते तोच सगळे एक मुखाने म्हणू लागले,  'आम्ही असे करू शकत नाही. आम्ही तुमच्या शिवाय जगू इच्छित नाही. आम्ही इतरांना काय तोंड दाखवू? आम्ही कसे सांगू की आम्ही आमच्या स्वामीला, आमच्या बंधूंना आणि आमच्या कुटुंबीयांना शत्रूच्या तावडीत सोडून पळून आलो? आम्ही आपल्याला एकटे सोडू सोडणार नाही . आम्ही स्वतःला, स्वतःच्या संपत्तीला,  स्वतःच्या कुटुंबीयांना तुमच्या चरणी अर्पण करत आहोत. मोहरमच्या नवव्या तारखेचा शेवटचा प्रहार झाला. हुसैन आणि त्यांचे सहकारी  ईश्वरभक्तीत लीन झाले. प्रातःकाळी सगळ्यांनी ईश्वराकडे मुक्तीची दुवा मागितली.

दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडले त्याला मानवी इतिहासात तोड नाही. एकीकडे यझिदचे हजारोंचे सैन्य. तर दुसरीकडे हुसैन आणि त्यांचे ७२ सहकारी. मात्र हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर द्वेष नव्हता की भीतीही नव्हती. क्षणार्धात आपण धारातीर्थी पडणार आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. मात्र तरीही ते हिमालयाप्रमाणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पैगंबर मुहम्मद यांनी  सांगितलेल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी प्राणही पणाला लावले. 

हुसेन यांचे एक-एक सहकारी युद्धात शहीद होऊ लागले. आता हुसेन यांनी शत्रुसेनेला उद्देशून शेवटचे ओजस्वी भाषण केले. ते म्हणाले, 'ईश्वराची शपथ मी जीवाच्या भीतीने तुम्हाला शरण जाणार नाही की यझिदची खिलाफतही स्वीकारणार नाही. खुदाच्या बंद्यांनो, मी ईश्वराकडे शांतीची प्रार्थना करतो. गर्वाने आंधळे झालेल्या लोकांपासून सर्वांचे रक्षण कर अशी मी त्याला विनंती करतो. 

हुसैन आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांना हौतात्म्य आले. कुटुंबियांना आणि लहानग्यांवरही तलवार चालवली गेली. एवढ्यावर त्यांची क्रूरता थांबली नाही. त्यांच्या देहाची विटंबना केली गेली. त्यांचे मस्तक भाल्यावर ठेवून मिरवणुका काढल्या. हजरत इमाम हुसैन  मोहरम महिन्याच्या दहा तारखेस शहीद झाले. मोहरमच्या एक तारखेपासून इमाम हुसैन  करबला येथे तळ देऊन होते. म्हणून एक तारखेपासूनच मोहरमच्या कार्यक्रमांची सुरवात होते. मोहरमच्या सात, आठ व नऊ तारखेस इमामसाहेबांच्या लोकांना पाणी न मिळाल्यामुळे त्यांचे भयंकर हाल झाले होते. म्हणून या तारखांनाही महत्त्व आहे. नऊ व दहा तारखेच्या मधील रात्र कत्तलची रात्र समजली जाते. या दिवशी रात्री इमाम हुसैन  यांनी आपल्या सहकाऱ्यांना उपदेश करून त्यांचे सांत्वन केले होते. म्हणून तिचेही महत्त्व आहे.

या घटनेनंतर काही वर्षांनी यजीदची खिलाफत गेली. नंतर सुमारे चारशे वर्षे सुन्नी पंथीय मुसलमानांचे प्राबल्य होते. त्यामुळे शीया पंथीय लोक उघडपणे शोक व्यक्त करू शकत नव्हते. पुढे अकराव्या शतकात शीया पंथीय प्रबल झाले आणि त्यांनी शोकोत्सव करण्याची प्रथा सुरू केली. ती आजपर्यंत चालू आहे. इराणमध्ये बहुसंख्य शीया पंथीय आहेत. भारतातसुद्धा शीया पंथीयांची संख्या लक्षणीय आहे. मोहरमच्या दहा तारखेस हे लोक काळे कपडे परिधान करून मातम (शोक) करतात. मात्र अनेक देशांमध्ये विशेषतः भारतामध्ये शियांप्रमाणेच बरेलवी विचारधारेचे सुन्नीदेखील मोहरमच्या या काळात दुखवटा पाळतात.  

मर्सिया काव्य : मर्सिया म्हणजे शोक काव्य. करबलाच्या दुर्दैवी घटनेत शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ ही शोक काव्ये गायली जातात. अरबी सोबतच फारसी आणि उर्दू मध्ये 'मर्सिया'ची मोठी परंपरा राहिली आहे. त्यामुळे या भाषांमध्ये  मर्सिया नावाचा एक नवा काव्य प्रकार अस्तित्वात आला. मीर बबर अली अनीस, मीर मूनिस, मिर्जा सलामत अली दबीर, मीर ज़मीर, अली हैदर तबातबाई यांच्या सारख्या अनेक कवींनी लिहेलेल्या 'मर्सिया' लोकप्रिय ठरल्या आणि आजही गायल्या जातात.

ताजीयाची (ताबूत) प्रथा : मोहरममधील करबलाची दुर्दैवी घटना  मोहंमद पैगंबरांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी घडली असल्यामुळे मूळ धर्मामध्ये याला आधार नाही. मात्र या घटनेचे स्मरण म्हणून भारतात विशेषतः महाराष्ट्रात मोहरमच्या काळात ताबुतांची मिरवणूक निघते. हे ताबूत लाकडापासून बनवले जातात. अनेक ठिकाणी एका काठीला अनेक रंगांचे कपडे गुंडाळून ताबूत बनविले जातात, रंगीबेरंगी कागद लावून सुशोभीत केले जातात आणि पहिले नऊ दिवस ताजिये वा ताबूत यांची स्थापना होते.  दहाव्या दिवशी मिरवणूकीनंतर या ताबुतांचे विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमला निघणाऱ्या या ताबुतांच्या मिरवणुकीत हिंदूंच्या सहभागाची जुनी परंपरा आहे.

महाराष्ट्रात मोहरम : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण पाळला जातो. ताजीये, पंजे बसतात, मिरवणुका निघतात. यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो. यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले. कडेगाव (जि. सांगली) येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याची दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मोहरमच्या मिरवणुका प्रसिद्ध आहेत. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याला लाखो लोक हजेरी लावतात. दोनशे वर्षांपूर्वी येथे गगनचुंबी ताबूत भेटीची सुरवात हिंदू समाजातील संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरू केली. ती परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे येथील मोहरम राज्यासह कर्नाटक सीमा भागात प्रसिद्ध आहे. मोहरम हा मुस्लिम समाजाचा सण असला तरी येथे या सणाचा मान हिंदूंना आहे.मोहरमनिमित्त येथे एकूण चौदा गगनचुंबी तांबूत उभारले जातात. त्यापैकी सात ताबूत हिंदूंचे असतात तर सात ताबूत मुस्लिम समाजाचे असतात. अलोट उत्साहात ताबूत भेटीवेळी उपस्थित भाविकांनी 'दुला दुला' व 'मौला अली झिंदाबाद' असा जयघोष करतात. कडेगावचा मोहरम हा देशाला ऐक्याचा, शांतीचा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला आहे.

प्रेमचंद यांचे नाटक 'करबला'
प्रत्येक संवेदनशील व्यक्ती करबलातील क्रौर्याने शहारून जातो. साहजिकच साहित्यिकही या घटनेपासून कसे लांब राहतील? भारतीय साहित्यातील मेरुमणी म्हणवल्या जाणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांनी करबला आणि हुसैन यांच्या हौतात्म्यावर याच नावाने नाटक लिहले. आपल्या प्रस्तावनेत ते लिहितात, 'जगाच्या इतिहासात अशा काही महत्त्वाच्या घटना आहेत, ज्या साहित्यिक कल्पनाशक्तीला अनंतकाळपर्यंत उत्तेजित करत राहतात. साहित्यिक-समाज त्यांचा उल्लेख नवनव्या स्वरूपात करत राहतात. कथा, कविता, गाणी, नाटक, निबंध, म्हणी अशा अनेक मार्गांनी साहित्यिक हा इतिहासाची नव्याने सांगत राहतो. मात्र तरीही नव्या लेखकांना स्वतःची प्रतिभा दाखवण्याचा वाव त्यात मिळतोच. रामायण आणि महाभारताच्या कथा हिंदू इतिहासातील अशा घटना आहेत. मुस्लिमांच्या इतिहासात करबलाच्या लढाईलाही तेच स्थान आहे.'

- समीर शेख