गर्जा महाराष्ट्र माझा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 14 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ चौसष्ट वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. तिथून पुढे सुरू झालेले मराठी माणसाचे राज्य आज वेगळ्याच स्थित्यंतरासाठी सज्ज होत आहे. वास्तविक हा मंगल दिन. एकदिलाने आणि एकमुखाने मऱ्हाटी राज्याचा सण साजरा करण्याचा दिवस.

परंतु, यंदा तो ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच आल्याने चित्र वेगळेच दिसते आहे. ते आहे हमरीतुमरीचे. बिघडलेल्या राजकीय बोलांचे. ढळलेल्या तोलाचे. एकमेकांतच संघर्ष करण्यात धन्यता मानणाऱ्यांसाठी तर तो ‘मंगल कलश’ आणला नव्हता.

मग केवळ राजकीय विरोधासाठी एवढी टोकाची भाषा कशासाठी? अशा स्थितीत दोन-चार गोड गोड शब्द बोलून वेळ मारून न्यावी, की परखड आत्मचिंतनाचा मार्ग स्वीकारावा? या संभ्रमात कुठलाही सुजाण मराठी माणूस सापडलेला असेल.

महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हाचे चित्र लोभस होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जोरदार झगडा महाराष्ट्रात सुरू होता आणि त्याचवेळी महागुजरातसाठी तिथल्या प्रांतातही निदर्शने, आंदोलने झडत होती.

एकाच दिवशी जन्मलेली ही दोन राज्ये. एक राज्य ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमत होते, आणि दुसरे ‘गर्वी गुजरात’चा उद्घोष करत होते. मुंबई कोणाची? हा ज्वलंत सवाल तेव्हाही धगधगत होता.

राज्य-स्थापनेनंतर अवघ्या तीनेक महिन्यातच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ची स्थापना केली. विशेष म्हणजे त्याचे प्रकाशन यशवंतरावांच्या हस्तेच झाले होते! आता या दोन्ही राज्यांतून ‘बुलेट ट्रेन’ दौडवण्याच्या योजना असल्या तरी सांस्कृतिक झगडा काही अजून थांबलेला नाही.

अर्थात त्यात बव्हंशी राजकीय हेतूच दडलेले आहेत, हा भाग वेगळा. १९६२ मध्ये महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा बॅ. अंतुले, शंकरराव चव्हाण असे दिग्गज निवडून आले. पुढे हे दोघे मुख्यमंत्री झाले.

दादर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तेव्हा साक्षात आचार्य अत्रे करत होते, आणि ख्यातनाम साहित्यिका सरोजिनी बाबर यादेखील सदस्य होत्या. बाळासाहेब भारदे यांच्यासारखा नामवंत विद्वान विधानसभेच्या अध्यक्षपदी बसला होता.

चीनविरुद्धच्या लढाईला तोंड फुटल्यानंतर सह्याद्री हिमालयाच्या साह्याला धावून गेला. म्हणजेच यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिल्लीला गेल्यावर विदर्भातील मारुतराव कन्नमवार आणि वसंतराव नाईक यांनी राज्याची धुरा सांभाळली.

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राची उभारणी वेगाने होत राहिली. शंकरराव चव्हाण, बॅ. अंतुले, वसंतदादा पाटील, शरद पवार आदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकर्दीतही राज्याचा विकास हाच केंद्रबिंदू होता.

सहकार चळवळीने अभिमान वाटावा, असे मूळ धरले. हे राज्य प्रागतिक आणि सांस्कृतिक आहे, याचा विसर ना राज्यकर्त्यांना पडला, ना नागरिकांना. विरोधी पक्षनेतेही आपली भूमिका हिरीरीने बजावत होते. आपापल्या विचारधारा सांभाळून परस्परांविषयी आदरभाव बाळगण्याची संस्कृती तेव्हा विलयाला गेली नव्हती.

संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि तो अस्तित्वात आल्यावरही आचार्य अत्र्यांचा शाब्दिक तोफखाना धडाडत होता, पण त्यातही भाषावैभव होते. प्रसंगी त्यांच्या रोषाला बळी पडलेले काँग्रेसीजन घायाळ होत असत, पण तरीही जे काही घडत होते, ते आब राखून होते. सर्जनशीलता आटलेली नव्हती. तिला सर्व क्षेत्रात धुमारे फुटत होते.

‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ आपापल्या क्षेत्रात पाय रोवून काम करीत होते. द्रष्टे नेतृत्व औद्योगिक विकासाला महत्त्व देत होते. एकीकडे हे राज्य इतिहासाचे पोवाडे गाणारे, त्याचा अभिमान मिरवणारे होते आणि दुसरीकडे ते एकोणिसाव्या शतकात घडलेल्या प्रबोधनपर्वाशीही आपले नाते टिकवून होते. त्यातून मिळालेला वारसा राज्याच्या वाटचालीला ऊर्जा पुरवित होता आणि दिशाही देत होता.

चौसष्ट वर्षांनंतर चंद्रभागेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. आजची पुढाऱ्यांची भाषा, त्यांचे वर्तन, त्यांचे राजकारण हे सगळे पाहिल्यानंतर ‘प्रबोधना’चे बोट सोडून दिल्याची जाणीव होते. लता मंगेशकर यांची हीच कर्मभूमी असली तरी आता तिथं निराळेच बदसूर ऐकू येऊ लागले आहेत.

गाडगेबाबांचीदेखील हीच कर्मभूमी, पण तिथे घाणीचे साम्राज्य पसरु लागले आहे. समाजमाध्यमांचा उदय झाल्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक जीवन अक्षरश: ढवळून निघाले. जी मूल्ये शाश्वत वाटत होती, ती आता कवडीमोल वाटू लागली.

एखाद्याची बेधडक बदनामी करणे, हा काही फारसा गंभीर गुन्हा नव्हे, अशी मानसिकता बोकाळू लागली. निवडणुकीच्या सध्याच्या हंगामात तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन काळजी वाटावी, अशा प्रकृतीचे झाले आहे.

‘वचनि लेखनिहि मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनि वसो’ असे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या महाराष्ट्रगीतात म्हटले आहे. पण ही मराठी गिरा म्हणजेच भाषा आज अस्तित्वाची लढाई लढते आहे.

बोटावरची शाई महत्त्वाची आहेच, पण त्या शाईचे इतरही अनेक सदुपयोग आहेत, हे विसरावे कसे? आजच्या महाराष्ट्र दिनी या राज्याचे सर्वक्षेत्रीय वैभव पुन्हा मिळविण्याचा संकल्प सर्वांनी सोडायला हवा. प्रामाणिक प्रयत्न केले, तर हे ध्येय गाठणे अशक्य नाही.