इंडोनेशियाच्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा ठरणार प्रभावी

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
गान्जार प्रणोवो, प्रबोवो सुबिआन्तो आणि अनिस बासवेदान
गान्जार प्रणोवो, प्रबोवो सुबिआन्तो आणि अनिस बासवेदान

 

सुधीर देवरे 
 
इंडोनेशियात १४ फेब्रुवारीला राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबरोबर संसदेसहीत सर्व प्रांतातल्या विधानसभा, गव्हर्नरची पदे, शहरातले महापौर, इतर क्षेत्रीय संस्था आदींसाठीही मतदान होणार आहे. अर्थातच राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीला सर्वात अधिक महत्त्व आहे. इंडोनेशिया हा जगातला लोकसंख्येने चौथ्या क्रमांकाचा देश. या निवडणुकीत २० कोटी ५० लाख लोक मतदानासाठी पात्र असणार आहेत व त्यांत ४० वषपिक्षा कमी असलेल्या व्यक्तींची संख्या ६० टक्के आहे.
 
पूर्वेकडून पश्चिमेकडे सुमारे पाच हजार किलोमीटर पसरलेल्या हजारो बेटांच्या देशात निवडणूक घडवून आणणे हे मोठे आव्हान आहे. १९९८ मध्ये झालेल्या जनतेच्या उठावानंतर राष्ट्राध्यक्ष सुहातों यांची १९६५ पासून चालत आलेली लष्करी राजवट संपुष्टात आली व इंडोनेशियाने लोकशाहीचा मार्ग पुन्हा स्वीकारला. गेल्या २५ वर्षात येथे लोकशाहीचा प्रवास झपाटयाने झाला आहे. देशाच्या घटनादुरुस्तीनंतर २००४पासून राष्ट्राध्यक्षांची थेट निवडणूक करण्याचे ठरवले गेले. तसेच एका व्यक्तीला फक्त दोनदाच राष्ट्राध्यक्षाच्या पदावर राहण्याचा आहे. या नियमानुसार सध्याचे कमालीचे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो (जोकोवी) यांची कारकीर्द ऑक्टोबरमध्ये संपेल.त्यांच्या जागी स्थानापन्न होण्यासाठी चुरशीचा सामना सुरु आहे. 

येथे राष्ट्राध्यक्षाची निवडणूक काही टप्प्यांत होते. राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवारास मतदारांच्या संख्येपैकी ५० टक्के मते व देशातल्या ३८ प्रांतापैकी १९ प्रांतात कमीत कमी २० टक्के मिळवणे आवश्यक असते. या दोन्ही अटी पहिल्याच टप्प्यात पूर्ण झाल्या तर त्याची राष्ट्राध्यक्ष म्हणून लगेचच निवड होते. अन्यथा पुन्हा जून महिन्यात पहिल्या दोन उमेदवारांमध्ये सामना होऊन जो वरील दोन्ही बार्बीमध्ये पात्र होईल त्याला राष्ट्राध्यक्ष ठरवले जाते. अशा अनेक टप्प्यांना वेळ मिळावा म्हणून अंतिम निर्णयासाठी ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली जाते. १४ फेब्रुवारीला पहिल्या फेरीतील निवडणूक आहे. या निवडणुकीत तीन नेत्यांच्या जोड्या रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी प्रबोवो सुबिआन्तो व उपराष्ट्रपतिसाठी त्यांचे साथी जिब्रान राकाबुनिला तसेच गान्जार प्रणोवो व महाफुड व अनिस बासवेदान व मुहामिन इस्कंदर या तीन जोड्यांत निवडणूक होत आहे. माजी लष्करप्रमुख असलेले प्रणोवो गेल्या पाच वर्षात जोकोवींच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. गान्जार हे मध्य जावा या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रांताचे माजी गर्व्हर्नर आहेत. बासवेदान हे माजी शिक्षणमंत्री व जाकार्ताचे गव्हर्नर तिघांनीही उपराष्ट्रपतिपदासाठी सहकारी निवडण्यात राजकीय चातुर्य दाखवले आहे.

प्रयोवो यांनी राष्ट्राध्यक्ष जोकोवींच्या ४० वर्षांच्या जिब्रान या मुलाला आपला साथी म्हणून निवडले आहे. या निर्णयाबाबत इंडोनेशियात मोठे वादळ उठले. कायद्यानुसार ४० वषपिक्षा अधिक वयाचा उमेदवार या पदासाठी उभा राहू शकतो. सुशकर्ता या पूर्व जावातल्या शहराचा महापौर म्हणून निवडून आला असल्याने जिब्रान या अटीत बसू शकतो. इंडोनेशियन जनतेला ही सगळी मखलाशी घराणेशाहीला पाठिंबा देणारी असल्याने खटकली आहे.

या निवडणुकीवर राष्ट्राध्यक्ष जोकोवी यांच्या चमकदार कारकीदांची छाप पडली आहे. कोणतीही राजकीय किंवा लप्करी क्षेत्रातली पार्श्वभूमी नसलेल्या एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीने गेल्या दोन कालखंडात इंडोनेशियाची अर्थव्यवस्था व पायाभूत सुधारणा यात केलेल्या भरीव कामगिरीमुळे देशात आज त्यांची अतिशय लोकप्रिय अशी प्रतिमा आहे. त्यांना जवळजवळ ७७ टक्के जनतेची मान्यता आहे. त्यांनी देशातले दळणवळण, रस्ते, रेल्वे, सरकारी कारखान्यांची क्षमता इ.वर भर देऊन केलेली प्रगती तसेच जकार्ता-बान्टुंग अतिगतिवान रेल्वे हा त्यांच्या कारकिदींतला मानबिंदू आहे.

सर्वेक्षणाचा अंदाज
अशा अनेक बाबींमुळे जोकोवींना आपला वारसा पुढे नेईल अशा व्यक्तीला पाठिंया द्यावा, असे वाटत असावे व त्याचमुळे ते गेरिन्ट्रा या दुसऱ्या पक्षाच्या प्रबोवोंच्या मागे उभे राहिले असावेत. प्रबोवो अर्थातच या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरे दोन उमेदवारदेखील आपली बाजू प्रभावीपणे मांडताना दिसत आहेत. गान्जार प्रणोवो यांची मध्य जावाचे गर्व्हर्नर व पी.डी.आय.पी. पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून मोठी प्रतिष्ठा आहे. तर अनिस यांनी जकार्ताचे गव्हर्नर म्हणून केलेले काम व त्याशिवाय देशातल्या पायाभूत बांधणीच्या उपक्रमात वाढलेल्या आर्थिक व सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांची चाललेली धडपड जनतेच्या डोळ्यासमोर आहे. शिवाय अनिस यांनी आपल्या उपराष्ट्रपतिपदाचा साथी म्हणून मुहामिन इस्कंदर या नादलातुल उलामा या इंडोनेशियातल्या जुन्या, अतिशय प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या वरिष्ठ नेत्याला निवडल्याने या संस्थेशी निगडित असलेल्या जनतेचाही त्यांना पाठिंवा मिळू शकेल. या संस्थेची सभासदसंख्या सात ते आठ कोटी आहे.

आजच्या मितीला या तिहेरी चुरशीत प्रबोवो-जिब्रान जोडीला ४५ टक्के मते मिळतील असा एका सर्वेक्षणाचा अंदाज आहे. तर अनिस - इस्कंदर यांना व गान्जार- माहफुड यांना प्रत्येकी २५ टक्क्यांच्या आसपास मते मिळावीत अशी अपेक्षा आहे. यावरून एखाद्या जोडीला पहिल्या फेरीत ५० टक्के मते मिळतीलच असे दिसत नाही. पण प्रबोवो-जिब्रान शेवटी यशस्वी होतील असे मात्र वाटते.

या निवडणुकीत जनतेचा कौल केवळ इंडोनेशियाने केलेली आर्थिक प्रगती, विशेषतः पायाभूत क्षेत्रातले यश किंवा देशातल्या सोशल मीडिया व डिजिटायझेशनचा प्रसार यावरच होणार का असा प्रश्न उभा राहतो. धार्मिक प्रश्नही या देशाच्या समाजात तणाव निर्माण करतात. इंडोनेशियात पंचशीला ही घटना आहे. पंचशीलात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे व पाच धर्मांना मान्यता दिली आहे. पण कोणताही एक धर्म हा राज्यधर्म मानलेला नाही. या निवडणुकीत कोणताही उमेदवार राष्ट्राध्यक्ष झाला तरी भारताबरोबरचे इंडोनेशियाचे वाढते राजकीय, व्यापारी, सांस्कृतिक संबंध वृद्धिंगतच होतील. जोकोवींनी आपल्या कारकीदींत इंडोनेशियाच्या सागरी सुरक्षा व विकास यावर भर दिला होता. भारताच्या सामुद्रिक धोरणाशी ती नीती निकटची असल्याने दोन्ही देशांचे संबंध जवळचे झाले. संरक्षण क्षेत्रात नवीन राष्ट्राध्यक्षांच्या काळात ते घनिष्ठ होऊ शकतील.

-सुधीर देवरे 
(लेखक भारताचे इंडोनेशियातील माजी राजदूत आहेत.)