पौषातील चैत्रपालवी !

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 6 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

प्रजासत्ताक दिनास केवळ तीन दिवस असताना अवघ्या भारतवर्षाने सोमवारी ‘रामसत्ताक दिन’ उदंड उत्साहात साजरा केला. खरे तर पौष शुद्ध द्वादशीच्या या शुभदिनी आपला देश रामनवमी, दीपावली आणि प्रजासत्ताक दिन असे तीन सण एकाच वेळी साजरे करण्यात दंग झाला होता. निमित्त होते अर्थातच अयोध्येत होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या या ‘प्राणप्रतिष्ठा सोहळ्या’चे दर्शन टीव्हीच्या शेकडो चॅनेल्सवरून घेताना भारावून गेली होती. या उत्साहित जनतेचे चेहरेच त्यामुळे शेकडो वर्षांपासूनचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगत होते. लोकसभा निवडणुकांना अवघे तीन-चार महिने बाकी असताना, हा मंदिर सोहळा विधिवत पार पाडण्यात यशस्वी झालेल्या भारतीय जनता पक्षासाठी तर ही निवडणूक प्रचाराची नांदीच होती! आता हे मंदिर यथावकाश पूर्णांशाने उभे राहील आणि याच सोहळ्याची गुंज भाजप तसेच मोदी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणूक प्रचारात अखेरपर्यंत वाजत राहील, हे सांगण्यास कोणत्याही होरारत्नाची गरज नाही.

जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्दबातल करण्यात मोदी सरकार यापूर्वीच यशस्वी झाले आहे आणि आता ‘रामलल्ला हम आऍंगे; मंदिर वहीं बनाऍंगे!’ ही भाजपने १९८०च्या दशकात दिलेली घोषणाही पूर्णत्वास जात आहे. आता जनसंघाच्या स्थापनेपासूनच जाहीर केलेल्या कार्यक्रमातील ‘समान नागरी कायदा’ एवढ्याच एका आश्वासनाची पूर्ती होणे बाकी आहे. मात्र, सोमवारच्या सोहळ्यास मिळालेल्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे हे आश्वासनही भविष्यात पूर्ण होणार, याची साक्षच मिळाली आहे.

‘प्राणप्रतिष्ठा सोहळ्या’च्या या दिमाखदार ‘इव्हेंट’मधील मुख्य आकर्षण हे अर्थातच पंतप्रधान मोदी यांचे भाषण होते आणि त्यांनीही भाषणात नेहमीच्या राजकीय शैलीला दूर सारून जनतेला गाढा विश्वास देण्याचेच काम केले. ‘राम ही ऊर्जा आहे आणि राम हे शांततेचे प्रतीक आहे...राम केवल वर्तमान नहीं, राम भविष्य नहीं, राम अनंतकाल है...’ असे सांगतानाच, त्यांनी हा दिवस विजयोत्सवाचा नव्हे तर आपण नम्रतेने वागण्याची शिकवण देणारा आहे, हा मुद्दाही अधोरेखित केला. त्यांच्या ३५ मिनिटांच्या भाषणातील हे सारेच मुद्दे भाजप कार्यकर्त्यांना एक नवा धडा देणारे होते. त्यास राममंदिरासाठी लालकृष्ण अडवानी यांनी १९९० मध्ये ‘सोमनाथ से अयोध्या’ या मार्गावरून काढलेल्या ‘रथयात्रे’ची आणि त्यानंतर झालेल्या हिंसक दंगलींची पार्श्वभूमी होती. या ‘रामजन्मभूमी आंदोलना’त बळी गेलेल्या अनेक करसेवकांची आठवण मोदी यांच्याबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या सर्वांनीच जागवली. डॉ. भागवत यांनी गेल्याच आठवड्यात एका भाषणात समाजात विद्वेषाची भावना वाढत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हा विद्वेष जागविणाऱ्या आणि विखारी उन्माद दाखवणाऱ्या सर्वांचीच ही मोदी तसेच डॉ. भागवत यांनी एका अर्थाने घेतलेली ही शिकवणीच होती, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला लागेल.

या सर्व कटू इतिहासावर मात करून मोदी यांनी देशातील एका मोठ्या जनसमूहाचे हे स्वप्न साकार करून दाखविले, याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. मात्र, खुद्द मोदी यांनीच सांगितल्याप्रमाणे आता रामशक्तीपासून मिळणाऱ्या ऊर्जेतून नवभारत निर्माणाचा विचार व्हायला हवा. ‘अब भारत का भविष्य अतीत से भी सुंदर होगा!’ अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिलीच आहे. त्यामुळे आता मंदिराच्या पलीकडे जाऊन, आपणा सर्वांनाच या भविष्याचा विचार करावा लागणार आहे. एकीकडे विज्ञान ज्ञान आणि माहितीची नवनवी कवाडे उघडत आहे. त्यावर श्रद्धा ठेवतानाच, अंधश्रद्धांना मूठमाती द्यावी लागणार आहे.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रामनामाचा गजर ज्या ऊर्जेतून देशभर झाला, तीच ऊर्जा आता देशहिताच्या विधायक कामांच्या दिशेने वळविण्याची जबाबदारी पंतप्रधान या नात्याने मोदी यांच्यावर आली आहे. राममंदिराच्या उभारणीमुळे एक स्वप्न साकार झाले आहे आणि त्याचबरोबर भाजपलाही तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी एक नवा विषय हाती आला आहे. मात्र, मोदी यांच्या या अ-राजकीय भाषणामुळे ‘अयोध्येतील राममंदिर’ हा विषय राजकारणापलीकडला आहे, हेही स्पष्ट झाले आहे. सर्वपक्षीय राजकारण्यांनीही हे लक्षात घ्यायला हवे; कारण ‘राम हा देशाचा आत्मा आहे!’ असे मोदी यांनीच सांगून टाकले आहे. राजकारण हे विकासाच्या मुद्यावर व्हायला हवे, जात-धर्माच्या नव्हे; हे सर्वपक्षीय राजकारणी लक्षात घेतील तरच यानिमित्ताने पंतप्रधानांनी देशवासीयांना दाखवलेले नवनिर्माणाचे स्वप्न प्रत्यक्षात या भूमीवर अवतरेल, याबाबत आता संदेह उरलेला नाही.

रामशक्तीपासून मिळणाऱ्या ऊर्जेतून नवभारत निर्माणाचा विचार व्हायला हवा. आता मंदिराच्या पलीकडे जाऊन, आपणा सर्वांनाच या भविष्याचा विचार करावा लागणार आहे.