सोलापूर : बारा ईमाम चौकात सुन्नी दावत मुआशरा कार्यक्रमात बोलताना सादीक रझवी.
सोलापूर : "नव्या पिढीला चांगल्या शिक्षणाची संधी देऊन विविध क्षेत्रात यश मिळवण्याची संधी द्यायला हवी. तसेच तरुणाईला व्यसनमुक्त सुसंस्कारीत जीवनाचा आदर्श घालून द्यावा," असे मत सुन्नी दावते इस्लामीचे प्रमुख मौलाना सादीक रजवी (मुंबई) यांनी येथे व्यक्त केले.
येथील बारा ईमाम चौकात सुन्नी दावते इस्लामी मुआशरा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहर काझी म. अमजदअली, सुन्नी दावतचे शहराध्यक्ष अय्युब कुरेशी, काली मशीदचे ईमाम हाफीज बाकर हुसेन, अफजल शेख, मदीना मजीदचे इमाम हाफीज महमद अली, सुन्नी दावतचे कार्यकर्ते नौशाद जेलर यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, "कुटुंबात वागताना वडीलधाऱ्यांनी मुलांसमोर आदर्श निर्माण होईल अशी वागणूक ठेवावी. मुलांचा आदर ठेवून त्यांना चांगल्या पध्दतीने मार्गदर्शन करावे. नियमित पाचवेळा नमाज केल्यास मुलांवर देखील त्याचे चांगले संस्कार होतात. लहान मुले ही मोठ्यांचे अनुकरण करत असल्याने वडीलधाऱ्यांनी योग्य काळजी घ्यावी. मुलांना चांगले शिक्षण द्यावे. त्यांना मोबाईलचा वापरापासून दूर ठेवावे. नवी पिढी व्यसनमुक्त असावी यासाठी समाजात चांगले प्रयत्न केले जावेत.
आजकाल वाढदिवस साजरा करायची जी पध्दत दिसून येते ती चुकीची आहे. आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहीजे." वाढदिवसाची परंपरा पाळण्याची गरज नाही असेही त्यांनी नमूद केले. यावेळी शहर काझी मो.अमजदअली यांनी देशकल्याण व शांततेसाठी प्रार्थना केली. मान्यवरांचे स्वागत पानगल मशीदचे अध्यक्ष ईमाम दरुद व समाजसेवक मकबूल मोहोळकर यांनी केले. नौशाद जेलर यांनी आभार मानले.