गौतम गंभीर बनला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 12 d ago
गौतम गंभीर
गौतम गंभीर

 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची अधिकृतरित्या नियुक्ती केली आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

जय शाह यांनी ट्वीट केले आहे की 'मी गंभीरचे भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मनापासून स्वागत करतो. मॉर्डन-डे क्रिकेट सातत्याने बदल आहेत, हे बदल गंभीरने जवळून पाहिले आहेत. त्याच्या संपूर्ण कारकि‍र्दीत त्याने विविध भूमिका निभावल्या आहेत आणि उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मला विश्वास आहे की गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आदर्श व्यक्ती आहे.'

'भारतीय संघासाठी त्याचे स्पष्ट विचार, अफाट अनुभव त्याला ही रोमांचक आणि सर्वाधिक मागणी असलेली प्रशिक्षकासाठी भूमिका पार पाडण्यासाठी सर्वाधिक पात्र ठरवते. बीसीसीआयकडून त्याला नव्या प्रवासासाठी पूर्ण पाठिंबा आहे.'

खरंतर राहुल द्रविडचा टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आहे. तसेच तो ही जबाबदारी पुढे कायम करण्यास तयार नव्हता. त्यामुळे भारतीय संघाला नवा प्रशिक्षक टी२० वर्ल्ड कपनंतर मिळणार हे निश्चित होते.

या पदासाठी अनेक नावं चर्चेत होती. पण त्यातही गंभीरचे नाव आघाडीवर होते. गंभीरने या पदासाठी बीसीसीआयच्या सल्लागार समीतीला मुलाखतही दिली होती. त्यानंतर अखेर गंभीरच्या नावावर या पदासाठी शिक्कामोर्तब झाले आहे.

आता गंभीर जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय संघाशी जोडला जाईल. त्याचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून डिसेंबर २०२७ पर्यंत कार्यकाळ असणार आहे.

त्यामुळे आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, कसोटी चॅम्पियनशीप, टी२० वर्ल्ड कप २०२६, वनडे वर्ल्ड कप २०२७ अशा महत्त्वाच्या स्पर्धा भारतीय संघ त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसेल.

गंभीरचे भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान राहिले आहे. २००७ साली टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता, तेव्हा गंभीरने त्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला होता.

दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात गंभीर भारताकडून सर्वोच्च खेळी करणारा खेळाडू होता. गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.