बुद्धिबळपटू गुकेशची १७व्या वर्षी ऐतिहासिक चाल

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 10 d ago
डी. गुकेश
डी. गुकेश

 

भारताच्या डी. गुकेश याने वयाच्या १७ व्या वर्षी ऐतिहासिक चाल रचली. त्याने आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील अखेरच्या, १४ व्या फेरीत हिकारू नाकामुरा याला ड्रॉ वर रोखले. या फेरीत विजय मिळवता आला नसला तरी गुकेशने एकूण नऊ गुणांसह या स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला. याप्रसंगी गुकेश हा लहान वयामध्ये आव्हानवीरांची स्पर्धा जिंकणारा, तसेच जागतिक स्पर्धेतील आव्हानवीर ठरला. ४० वर्षांपूर्वी महान खेळाडू गॅरी कॅस्पारोव यांनी रचलेला विक्रम गुकेश याने रविवारी मोडीत काढला.

डी. गुकेश-हिकारू नाकामुरा आणि इयान नेपोनियात्ची-फॅबियानो कॅरुअना या दोन लढतींच्या निकालांवर आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता ठरणार होता. गुकेशने नाकामुरा याला बरोबरीत रोखले. गुकेशने या लढतीत प्रत्येक टप्प्यावर प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. नाकामुराला गुकेशचे आव्हान परतवून लावणे शक्य झाले नाही. अखेर ७१ चालींनंतर ही लढत ड्रॉ राहिली.

इयान नेपोनियात्ची व फॅबियानो कॅरुअना यांच्यामधील लढतीचा निकाल लागला असता तर गुकेशला टायब्रेकरची लढत खेळावी लागली असती. फॅबियानो याने इयान याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. फॅबियानोकडे विजय मिळवण्याची संधीही होती. दोन वेळा त्याला संधीचा फायदा घेता आला नाही. अखेर इयानने दबावाखाली आपला खेळ उंचावला. दोन खेळाडूंमधील ही लढत ड्रॉ राहिली. गुकेश नऊ गुणांसह विजेता ठरला व जागतिक स्पर्धेतील आव्हानवीराचा मानही त्याने संपादन केला. नाकामुरा, इयान व फॅबियानो यांनी प्रत्येकी ८.५ गुणांची कमाई केली. त्यामुळे या तीनही खेळाडूंना विजेतेपदापासून दूरच रहावे लागले.

प्रज्ञानंद, गुजराथीचे अपयश
आर. प्रज्ञानंद व विदित गुजराथी या भारतीय खेळाडूंना आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अपयशाला सामोरे जावे लागले. प्रज्ञानंदने तीन विजयांसह सात गुणांची कमाई केली. विदितने तीन विजयांसह सहा गुणांची कमाई केली. एलिरेझा फिरॉझा याला पाच गुणांवर समाधान मानावे लागले. निजात एबासोव ३.५ गुणांसह तळाच्या स्थानावर राहिला.

महिला विभागात टॅन विजयी
महिलांच्या आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या टॅन झोंगयी हिने नऊ गुणांसह विजेतेपदावर मोहोर उमटवली. भारताच्या कोनेरु हम्पी व आर. वैशाली यांनीही चमकदार खेळ केला. दोघींना या स्पर्धेत विजयी होता आले नाही, पण अखेरच्या काही लढतींमध्ये त्यांच्याकडून चमकदार खेळ झाला. हम्पी व वैशाली यांनी प्रत्येकी ७.५ गुणांची कमाई केली.

आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम गुणतालिका
१) डी. गुकेश- ९ गुण, २) हिकारू नाकामुरा- ८.५ गुण, ३) इयान नेपोनियात्ची- ८.५ गुण, ४) फॅबियानो कॅरुअना- ८.५ गुण, ५) आर. प्रज्ञानंद- ७ गुण, ६) विदित गुजराथी- ६ गुण, ७) एलिरेझा फिरॉझा- ५ गुण, ८) निजात एबासोव- ३.५ गुण.

यावेळी डी. गुकेश म्हणाला, "फॅबियानो कॅरुअना-इयान नेपोनियात्ची यांच्यामधील लढतीवर माझे लक्ष होते. ती पंधरा मिनिटे संपूर्ण स्पर्धेतील आव्हानात्मक ठरली, पण ती लढत ड्रॉ राहिली व सुटकेचा नि:श्‍वास टाकला. माझे कुटुंब, सहाय्यक या सर्वांच्या सहकार्यामुळे मला यश संपादन करता आले आहे. जागतिक स्पर्धेतील लढतीचा आता विचार करीत नाही."