टी-२० वर्ल्डकपआधीच पाकिस्तान संघात फूट?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 11 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिकसारख्या बलाढ्य संघांनी आपल्या प्लेइंग ११ घोषणा केली आहे. मात्र पाकिस्तान संघाने अद्यापही संघाची घोषणा केलेली नाही. पाकिस्तानने इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीस संघाची घोषणा केली आहे. या १७ मधून १५ खेळाडूंची टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. या संघात इमाद वसीम आणि मोहम्मद आमिरला देखील स्थान देण्यात आलं आहे.

मोहम्मद आमिर हा पाकिस्तान संघातील अनुभवी गोलंदाज आहे. तसेच इमाद वसीमलाही चांगला अनुभव आहे. दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी दोघांनीही पाकिस्तान संघात कमबॅक केलं आणि संघात स्थानही मिळवलं. मुख्य बाब म्हणजे दोघेही कर्णधार बाबर आझमच्या फार जवळचे नाहीत. दरम्यान सराव करत असताना पाकिस्तान संघात फुट पडली असल्याचं दिसून आलं आहे.

सोशल मीडियावर पाकिस्तान संघाचा सराव करत असतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये किती सत्य आहे, हे समजू शकलेलं नाही. या व्हिडिओमध्ये बाबर आझम फलंदाजी करताना दिसतोय. तर इमाद वसीन हुज्जत घालताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत इमाद वसीमने सांगितलं होतं की, त्याला बाबर आझमकडून कुठलाही त्रास नाही.

काय म्हणाला होता इमाद वसीम?
इमाद वसीमने मुलाखतीत म्हटले होते की,' आम्हाला बाबर आझमकडून काही एक त्रास नाही. तो आमच्या संघाचा कर्णधार आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देतोय. तो आम्हाला वर्ल्डकप जिंकून देऊ शकतो, म्हणून त्याला पुन्हा एकदा कर्णधार बनवण्यात आलं असावं.' भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पाकिस्तानला सेमीफायनलमध्येही प्रवेश करता आला नव्हता. त्यानंतर बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा त्याच्याकडे पाकिस्तान संघाची धूरा सोपवण्यात आली आहे.