टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा सामना पार पडला. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह गुणांचे खातेही उघडले. या विजयामुळे पाकिस्तानने स्पर्धेतील आव्हान कायम राखलं आहे.
या सामन्यात कॅनडाने पाकिस्तानसमोर 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तानने 17.3 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. पाकिस्तानच्या विजयात मोहम्मद रिझवानने अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला.
पाकिस्तानकडून रिझवानसह साइम आयुबने सलामीला फलंदाजी केली. या दोघांनी संयमी खेळी केली होती. पण पाचव्या षटकात आयुबला ६ धावांवर बाद केले. पण त्यानंतर रिझवानला कर्णधार बाबर आझमने भक्कम साथ दिली. या दोघांनी मिळून 63 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पाकिस्तानसाठी विजयाचा मार्ग सोपा झाला.
दरम्यान, पाकिस्तान विजयाच्या जवळ आलेला असताना बाबर ३३ धावांवर बाद झाला. त्याला डीलॉन हेलिगरने बाद केले. यानंतरही रिझवानने डाव पुढे नेत अर्धशतक केले, मात्र फखर जमानही 4 धावांवर 18 व्या षटकात बाद झाला. पण तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 3 धावांचीत गरज होती.
या तीन धावा रिझवान आणि उस्मान खानने पूर्ण केल्या आणि या स्पर्धेतील पाकिस्तानच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रिझवान 53 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 53 धावांवर नाबाद राहिला.
कॅनडाकडून डीलॉन हेलिगरने 2 विकेट्स घेतल्या, तर जेरेमी गोर्डनने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कॅनडा प्रथम फलंदाजीसाठी उतरले. कॅनडाला ऍरॉन जॉन्सनने आक्रमक सुरुवात दिली होती. मात्र, नंतर त्याला कोणाची साथ मिळाली नाही.
कॅनडाची वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाज खेळपट्टीवर फक्त हजेरी लावून बाद झाले. मात्र, यावेळी जॉन्ससनने एकट्याने झुंज देताना अर्धशतक झळकावले. मात्र त्याला 14 व्या षटकात नसीम शाहने त्रिफळाचीत केले. जॉन्सनने 44 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावांची खेळी केली.
तो बाद झाल्यानंतर कर्णधार साद बिन झाफर (10), कलिम सना (13*) आणि डीलॉन हेलिगर (9*) यांनी कॅनडाला 100 धावांचा टप्पा पार करून दिला. कॅनडाने 20 षटकात 7 बाद 106 धावा केल्या.
पाकिस्तानकडून मोहम्मद अमीर आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच शाहिन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.