इस्राइलने राफावर केलेल्या हल्ल्यामध्ये ४५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. यावरुन इस्राइलच्या पंतप्रधानांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ही एक दुर्दैवी घटना आहे. राफामध्ये स्थलांतरित पॅलेस्टिनींच्या टेंटमध्ये आग लागली. आमचा पूर्ण प्रयत्न असतो की सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही. मात्र, मागील दिवशी झालेली घटना दुर्दैवी आहे, असं बेंजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत. तसेच याप्रकरणी तपास केला जाणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
राफावरील हल्ल्यानंतर इस्राइलवर टीकेची झोड उठली होती. अनेक देशांनी इस्राइवर टीका केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन होणाऱ्या या टीकेनंतर नेतान्याहू यांनी काही प्रमाणात नमतं घेतलं. मात्र, त्यांनी युद्ध सुरुच ठेवण्याची शपथ घेतली आहे. जोपर्यंत आमचा विजय होत नाही तोपर्यंत आम्ही पांढरा झेंडा फडकवणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
इस्राइल गेल्या काही दिवासांपासून गाझामध्ये भीषण हल्ला करत आहे. राफामध्ये मोठ्या प्रमाणात शरणार्थी आले आहेत. ते छावणीमध्ये राहत आहेत. राफा शहराला देखील इस्राइने लक्ष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाने राफामधील युद्ध थांबवण्यास सांगितलं आहे. पण, इस्राइलने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा आदेश मान्य करण्यास नकार दिला आहे. आम्हाला सुरक्षित राहायचं आहे. त्यासाठी सर्व हमास अतिरेक्यांचा खात्मा हा एकमेव पर्याय आहे, असं इस्राइलने म्हटलं आहे.
इस्राइलचा दावा आहे की, ज्या ठिकाणी हमासचे अतिरेकी लपून बसले आहेत. त्याच ठिकाणी ते हल्ले करत आहेत. पण, गाझा प्रशासनाचा दावा आहे की, 'इस्राइलच्या हल्ल्यामध्ये सामान्य नागरिक मरत आहेत. यात जास्त करुन महिला, मुलं आणि वृद्ध लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये इतक्या मोठ्या संख्येने हमासचे दहशतवादी राहात नाहीत.'
इस्लाइलने राफामध्ये केलेल्या हल्ल्यात काही महिला, आठ मुलं आणि तीन वृद्ध व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. यात तीन मुलांना ओळखणं देखील शक्य नव्हतं. दरम्यान, राफा इजिप्तच्या सीमेवरील गाझामधील महत्त्वाचे शहर आहे. येथे १० लाखांपेक्षा जास्त लोक राहतात. गाझावरील हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी राफा शहरामध्येच आश्रय घेतला होता.